मकरसंक्रांत

 

भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात. मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वर्षाचे कालमानाने 12 भाग केलेले आहेत. 12 महिने आहेत तशा 12 राशी देखील आहेत. त्या क्रमाने मेष, वृषभ इंत्यादी आहेत. आपल्याला पृथ्वीवरून सूर्य या 12 राशींच्या चक्रातून जाताना दिसतो.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून सूर्य सर्वात दक्षिणेकडे 22 डिसेंबर किंवा 1 पौष (भारतीय सौर कालगणने प्रमाणे) या दिवशी दिसतो. त्या दिवसानंतर तो उत्तरेकडे सरकताना दिसतो. 22 जून किंवा 1 आषाढ या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्तावर असतो. मग पुन्हा दक्षिणेकडे सरकायला लागतो. सहा महिन्यानंतर पुन्हा उत्तरेकडे. असे सूर्याचे आयन आपल्याला दिसते.

(खरं तर सूर्य स्थिर आहे. फिरणार्‍या पृथ्वीवरून आपण त्याला पाहतो म्हणून आपल्याला ‘तो’ फिरतो असे दिसते. यालाच म्हणतात – सूर्याचे भ्रमण दृगोत्तर होते.)

सूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार – ऊर्जा वाढणार – वनस्पतींना अन्न बनवायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार. आनंदाचे दिवस असले की – उत्साह वाढतो – उत्सव, सण करावासा वाटतो. पूर्वी कदाचित हाच दिवस मकर संक्रांत म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले.

ढोबळमानाने 150 वर्षात एक दिवसाचा फरक पडतो. असं कधी होईल का की मकर संक्रांत 22 जूनला येईल? सध्या मकर संक्रांत 14 जानेवारीला येत आहे. काही वर्षांनंतर ती 15 जानेवारीला येईल. भारतात – खरे तर भारतीय उपखंडातच मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत.

महाराष्ट्रात मकर संक्रांत किंवा संक्रांत म्हणतात. “तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणत तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू यांची देवाण-घेवाण करतात.

महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकातसुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासारखाच हा सण साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. ‘एल्लु’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्‍याचे काप आणि बेळ म्हणजे गुळाचे खडे; यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी सक्कर अच्चू म्हणजे बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देता-घेताना ‘एल्लू बेळ तिंडु झोल्ले मातंडी‘ म्हणजे ‘तिळगूळ खा चांगलेच बोला’ असं म्हणतात.

महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिक्की करतात. या मोसमात आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयू करतात. पतंग-उडविण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गानं शर्यतच लागलेली असते – सूर्यापर्यंत पोचायची

गोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा, प. बंगाल, बिहार, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मणिपूर या सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकर संक्रांत’ साजरी केली जाते.

आंध्र प्रदेशात हा सण चार दिवस असतो  – १. भोगी, २. पेट्टा पांडुगा ३. कणुमा आणि ४. मुक्कनुमा

हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये तिला ‘माघी ’ म्हणतात.

काश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात.

आसाममध्ये ‘माघी बिहु’ किंवा ‘भोगाली बिहु’ असं म्हणतात.

उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ म्हणतात.

दक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो.

तामिळनाडूत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.

केरळ प्रांतात ‘मकर विलु’ म्हणतात.

भारताबाहेर भारताजवळच्या देशांमध्येही हा सण साजरा होतो.

नेपाळमध्ये ‘तरुलोक – माघी’,

थायलंडमध्ये ‘सोंगक्रान’,

लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’,

म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’

तर कंबोडिआमध्ये ‘मोहा संक्रांत’ म्हणून हा सण साजरा होतो.

या सणाशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत

मकर राशीचा स्वामी शनि म्हंटला जातो – (शनि या शब्दाचा अर्थ हळू हळू सरकणारा) तो सूर्यापासून निर्माण झाला आणि खूप लांब गेला. वर्षातून एकदा एक महिनाभर सूर्य शनिला भेटतो, तो हा सण. (यात खगोलशास्त्रीय तथ्य किती – याचा शोध घेणार?)

या क्षणापासून देवतांचा दिवस सुरू होतो. (देव लोक वर – उत्तरेकडे राहातात असे मानतात. उत्तरीय ध्रुव प्रदेशात या क्षणानंतर सूर्य दिसायला सुरूवात होते)

या दिवशी भगीरथाने गंगा स्वर्गातून खाली आणली, विष्णूने असुरांचे निर्दालन करून त्यांना मेरू पर्वताखाली गाडले, भीष्माने देह ठेवला इत्यादी कथा प्रचलित आहेत. या कथांमधून वास्तव आणि अवास्तव यांची सरमिसळ झाली आहे.

– स्नेहल आपटे

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s