इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमासाजरी केली जाते.
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी ही परंपरा आहे.
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.
बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.
– स्नेहल आपटे