गणपती हा – अक्षरांचा, लिखाणाचा आणि ग्रंथांचा देव आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर गणेशाला सर्व प्रकारच्या साहित्याचा अविष्कार मानतात! ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीचा जयजयकार करतांना ज्ञानेश्वर म्हणतात –
ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा || १.१ ||
देवा तूची गणेशु | सकलमतिप्रकाशु |
म्हणे निवृत्ती दासु | अवधारिजोजी || १.२ ||
ओंकाररूपी गणेशा, तुला माझा नमस्कार असो! तुझा जयजयकार असो! गणेशा, तू बुद्धीदायक आहेस! सकल जीवांना जे काही दिसते, कळते ते तू दिलेल्या ज्ञानप्रकाशाने.
तुझी मूर्ती साक्षात शब्दब्रह्म आहे. अक्षरं ही तुझी कांती आहे. चारी वेद तुझे शरीर आहे. द्वैत – अद्वैत मते ही तुझी गंडस्थळे आहेत. मला तर असे भासते की, पूर्व आणि उत्तर मीमांसा हे तुझे विशाल कान आहेत. दहा उपनिषदे तुझ्या मुकुटातील फुले आहेत! त्या फुलांमधून पाझरणारा ज्ञानसुवास सर्वत्र दरवळत आहे.
हे षड्भूज गणेशा, सहा दर्शने म्हणजे तुझे सहा हात आहेत. सहा दर्शनांचे सहा अभिप्राय हे तुझ्या हातातील शस्त्र आहेत. तुझा खंडित दात, हे बौद्धमत आहे. तर तुझा अखंड शुभ्र दात हा उत्कृष्ट संवाद आहे. उपनिषदे, गीता, महाभारत, पुराणे आणि इतर अनेक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ यातील गुरु-शिष्य संवादाचे प्रतिक आहे.
हे गणेशा, तुझ्या हातातील रसाळ मोदक हा वेदांत आहे. मोद देणारा अर्थात आनंद देणारा मोदक. ज्या ज्ञानाने कैवाल्यानंद प्राप्त होतो, तो वेदांत ज्ञानाचा मोदक देण्यासाठीच जणू तू बसला आहेस.
अठरा पुराणे तुझे अलंकार आहेत. त्यातील तत्त्वे आणि प्रमेय ही रत्ने आहेत.
व्यासांसारखे विद्वान जे या साहित्याचा अभ्यास करतात, त्यांची बुद्धी तुझी मेखला होय!
सुंदर काव्य आणि नाटक हे तुझ्या पैंजणातील लहान लहान घुंगरू आहेत. कालिदासाची, भासाची नाटके तुझ्या पैंजणातील एक एक घुंगरू आहे. त्यांच्या मधुर नादाने सामान्य जन प्रसन्न होतात.
अकार – उकार – मकार रूप धारण करणाऱ्या गणेशा, तुला माझा नमस्कार असो. गुरुकृपेने मी तुझे हे ओमकाररूप जाणले आहे! मी तुला म्हणजेच अथांग साहित्य सागराला प्रणाम करतो!
अकार चरण युगुल | उकार उदार विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे || १.१९ ||
ज्या ओंकाररूपी गणेशाचे रूप ज्ञानदेवांनी सांगितले आहे, ते प्राचीन नाण्यांवर दिसणारे ओंकाराचे चिन्ह असेल का?