चित्र ज्ञानेश्वरी: पुस्तक परिचय

८०० वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना संस्कृत समजण्यात येणाऱ्या अडचणीमुळे जो तोटा येत होता तोच तोटा आज आपल्याला प्राकृत मराठीचा परिचय नसल्यामुळे होतोय. एका मोठ्या भांडाराच्या चाव्यांसाठी आपले हात चाचपडत आहेत. अशावेळी मदत होते ती ज्ञानेश्वरीवरचे निरूपण, भाष्य, टीका म्हणून असणाऱ्या पुस्तकांची. परंतु एवढे मोठे ग्रंथ चट्कन हातात घ्यायला सामान्य वाचक बिचकतात. अशा वेळेस आवश्यकता भासते ती त्या राजमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या एखाद्या पाऊलवाटेची. अशी पाऊलवाट जी योग्य दिशेकडे बोट दाखवून किमान वाचकाचे कुतूहल जागवायला प्रवृत्त करते. आणि अशा पाऊलवाटेवर सुंदरसे देखावेसुद्धा असतील तर प्रवास किती आनंद देऊन जाईल नाही? अशीच दोन छोटेखानी पुस्तकं अलीकडेच वाचनात आली. खरं तर एकच पुस्तक, फक्त दोन भागांमध्ये विभागलेलं असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वरीच्या भव्य अवकाशाचा छोटा तुकडा एका नक्षीकाम केलेल्या गवाक्षातून दाखवणारं हे पुस्तक फार सुखद अनुभव देणारं ठरलं, याचं कारण ते नुसतं वाचण्याचं नसून पाहण्याचंही पुस्तक आहे.

ओव्यांकडे नेणारी शब्दवाट
‘महा तरुण भारत’ पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या ‘ओवी लाइव्ह’ आणि ‘आकाशाशी जडले नाते’ या सदरांद्वारे आपल्याला परिचित झालेल्या चित्रलेखिका दीपाली पाटवदकर यांचे ‘चित्र ज्ञानेश्वरी’ नावाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये काही निवडक ओव्या उलगडून सांगितल्या आहेत. भाग १ च्या सुरुवातीला कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाच्या प्रसंगापासून या पुस्तकाची सुरुवात होते. पुढे ‘माऊलींच्या नंतरच्या काळात ज्ञानेश्वरीमध्ये अतिउत्साही मंडळींनी प्रक्षिप्त केलेल्या ओव्या वगळून ज्ञानेश्वरीचा पुनरभ्यास करून संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली’ ही फारशी परिचित नसलेली माहिती मिळते. त्यानंतर मग एकेका पानावर एक ओवी तिच्या अर्थासह याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे काही पापुद्रे अलगद उलगडून दाखवले आहेत. यामध्ये एक वेगळेपण म्हणजे ओवीचा भावार्थ हा मराठीसोबत इंग्रजीमध्येही आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की त्या इंग्रजी मजकुरात मराठी भावानुवादाचे इंग्रजी भाषांतर अशा स्वरूपाचा कृत्रिमपणा येऊ दिलेला नाहीये. अनेक ठिकाणी ओवीशी संबंधित इंग्रजी मजकुरामध्ये काही स्वतंत्र उदाहरणं किंवा ओवीच्या अर्थाला अनुसरून काही विचारवंतांची अवतरणे उद्घृत केली आहेत, जी मराठी विवेचनामध्ये असतीलच असे नाही. मराठीसोबतच इंग्रजीमध्येही विवेचन दिल्यामुळे या पुस्तकाचा वाचकवर्ग विस्तारणे आपोआपच शक्य झाले आहे.

चित्रवाट
पण पुस्तक लक्षवेधी होण्याचं कारण हे केवळ त्यातले विवेचन नाही. हे पुस्तक वाचनीय सोबतच प्रेक्षणीयही झालं आहे याचं कारण यातली रेखाचित्रं ! चांदण्या रात्री तलाव जसा मुठीमुठी चांदीचे रुपये उधळल्यासारखा चमचमावा तसं हे पुस्तक म्हणजे रेषांची आणि बिंदूंची उधळण आहे. या पुस्तकात एकेक ओवी लेखिकेला जशी आकळली तसे त्याचे दोन प्रवाह होऊन कागदावर ओघळले आहेत, एक अक्षरांचा आणि एक रेषांचा. एकाच ओवीचे उजव्या पानावरचे शब्दबिंब (तेही दोन भाषांमध्ये !) आणि डाव्या पानावर त्याचे चित्रप्रतिबिंब अशी पुस्तकाची मांडणी डोळ्यांना दुहेरी आनंद देऊन जाते. पुस्तकात वेगवेगळ्या शैली वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रेखाटायला किचकट असा Stippling (बिंदूचित्र) हा चित्रप्रकार सर्वाधिक वापरला आहे. (चित्र ज्ञानेश्वरी भाग १ चे मुखपृष्ठ हा त्या शैलीचा सर्वोच्च आविष्कार म्हणावा लागेल कारण या चित्रात रंगदेखील भरलेले आहेत) त्याशिवाय Miniature, Line Art हे चित्रप्रकारही पुस्तकात हाताळले आहेत . त्यामुळेच पुस्तक परिपूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेतली असेल याची कल्पना येऊ शकते. माणसं, निसर्गाची रूपं, चिन्हं आणि प्रतिमा यांच्या रेखाटनात प्रयोग केलेले आहेतच शिवाय पहिल्या भागाच्या मुखपृष्ठाच्या आतल्या बाजूस निळा रंग आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफीचं एक छानसं कॉम्बिनेशनही दिसतं. पुस्तकात अधिक रंगीत चित्रं असायला हवी होती असं प्रकर्षाने वाटत राहतं. उठावदार सजावट, स्पष्ट छपाई आणि उत्कृष्ट दर्जाची पाने यामुळे पुस्तकाला संग्रहमूल्य प्राप्त झालेलं आहे.

चित्रलेखक
एकाच गोष्टीला जेव्हा एकाहून अधिक कला भिडतात तेव्हा त्या गोष्टीचे प्रकटन प्रत्येक कलेत सारखेच होत नाही… किंबहुना होऊच शकत नाही. कारण चित्रकार त्या गोष्टीकडे रंग आणि रेषांच्या चष्म्यातून पाहतो, मूर्तिकार छिन्नी हातोड्याच्या आणि लेखक शब्दांच्या…. पण जेव्हा एकच माणूस एकाहून अधिक कलांच्या चष्म्यातून एकाच गोष्टीकडे पाहतो तेव्हा त्यातून जे साकारतं ते पाहणं फार fascinating असतं कारण ती गोष्ट आपल्याला एकाहून अधिक कोनांतून दिसते आणि कदाचित त्यामुळेच अधिक जास्त भिडते. आपल्या लिखाणाला पूरक अशी चित्रं स्वत:च रेखाटणारे मनस्वी कलाकार हे तसे दुर्मिळच. त्यामध्ये चट्कन नाव डोळ्यासमोर येतं ते अर्थातच माधुरी पुरंदरे यांचं. गतकाळामध्ये द. ग. गोडसे आणि अलीकडच्या काळात संजय पवार, प्रभाकर कोलते हेही यातले काही शिलेदार. दीपाली पाटवदकर यांचेही नाव या छोट्याश्या पण लक्षवेधी यादीत समाविष्ट करायला हरकत नाही हा विश्वास ‘चित्र ज्ञानेश्वरी’ने निर्माण केला आहे. कर्मयोगाप्रमाणेच आता ज्ञानेश्वरीतील अन्य ‘योगां’वरही दीपाली पाटवदकर यांच्याकडून अशीच रेखीव पुस्तकं येतील अशी आशा करूया. 

पुस्तकाचे नाव – चित्र ज्ञानेश्वरी – भाग १ व २
किंमत – प्रत्येकी १६० १०० रू. 
पृष्ठसंख्या – प्रत्येकी ४८
प्रकाशक – विरुपाक्ष प्रकाशन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s