एकविसाव्या शतकात महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण भौतिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित केले. मानवी सुखांची परिभाषा साधनांच्या आधारे कमी कष्टात जास्त लाभ अशी झाली. पैसा केंद्रस्थानी ठेवून विचार करणे आले. यामुळे वेग वेग आणि वेग, या वेगावर स्वार झाल्याने आपल्या मौल्यवान शाश्वत गोष्टींचा विसर पडु लागला.
शाश्वत विकास याचा स्पष्ट अर्थ टिकाऊ विकास असा होतो. भौतिक सुविधांचा अमर्याद वापर करून, शरीर मनाच्या अनावश्यक गरजा, ज्यांना चैन म्हटले जाते, त्या पुरवत बसणे म्हणजे भोगवाद! असे भोग पुरवण्यासाठी केला जाणारा विकास हा शाश्वत विकास नसतो. तर चालू पिढीच्या शारीरिक, मानसिक, भौतिक आणि भावनिक गरजा पूर्ण करुन पुढच्या पिढीला एक सुसंस्कृत विकासवाट सुपुर्त करणे म्हणजे शाश्वत विकास. यासाठी आपल्या सुखाची, समृद्धीची बैठक शाश्वत असली पाहिजे. आध्यात्मिकता हा भारताचा वारसा आहे. यातील बोधसाहित्य काळानुसार समजुन घेणे गरजेचे आहे.
महाभारतात विदुर प्रधानमंत्री म्हणुन उल्लेखित आहेत. विदुर हे महाप्रज्ञ, परमनीतिज्ञ, सत्यनिष्ठ तसेच धर्माचे मर्म जाणकार होते. संजयने युधिष्ठीर आणि श्रीकृष्णाचा संदेश धृतराष्ट्रास सांगितला , ‘पांडवांना त्यांचा उचित भाग दिला नाही तर युध्द अटळ आहे.’ यावर संतप्त धृतराष्ट्रास विदुर कल्याणकारी, धर्मयुक्त उपदेश करतात. हा संवाद म्हणजे धृतराष्ट्राचे जिज्ञासापूर्ण प्रश्न आणि विदुराची सारगर्भित उत्तरे होत. विदुरनीती म्हणुन हा भाग महाभारतात प्रसिद्ध आहे. उद्योग पर्वात ३३ पासुन ४० पर्यंतचे आठ अध्याय या प्रसंगाचे आहेत.
यामध्ये पंडित लक्षण, मूर्खलक्षण, सदाचारी लक्षण, व्यवहार, सुखदुःख प्राप्ती साधन ग्राह्य त्याज्य कर्मांचा निर्णय आदि गोष्टींचे वर्णन सहज भाषेत केले आहे. ही विदुर नीती म्हणजे त्रिकालाबाधित सत्ये आहेत. अपठित, विद्वान, विद्यार्थी, प्रजा, शासक, सुखी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ही उपयुक्त आहे. कालजयी ठरलेली ही विदुर नीती आपण नव्याने पाहु.
– गीताग्रजा (डॉ. वैशाली काळे गलांडे)