इतिहास
अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिकापुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका ||
मोक्षदायिनी काञ्चीपुरीमध्ये असलेले एकमेव प्राचीन मंदिर म्हणजे कामाक्षी देवी मंदिर. वास्तविक या ठिकाणी कामाक्षी देवीचीच दोन मंदिरे आहेत. एक मंदिर म्हणजे आत्ताचे भव्य कामाक्षी मंदिर, जे कांचीकामकोटी पीठ म्हणूनही ओळखले जाते. तर दुसरे म्हणजे ‘आदी कामाक्षी’ मंदिर जे या मंदिराच्या बाजूस आहे आणि ते आदी पीठ म्हणूनही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की ‘आदी कामाक्षी’ मंदिर हेच मूळ मंदिर आहे आणि आदि शंकराचार्यांच्या आयुष्यातील घटना याच ठिकाणी घडल्या होत्या.
या दोन्ही मंदिरांचा काळ आणि कर्ता इतिहासाला अज्ञात आहेत परंतु स्थापत्यशैलीनुसार ही मंदिरे ६व्या – ७ व्या शतकात बांधली गेली असावीत, जेव्हा कांचीपूरम ही पल्लवांची राजधानी होती. परंतु कदाचित याही अगोदरपासून येथे कामाक्षी देवीची उपासना होत असावी. नंतरच्या काळात चालुक्य, चोल, पांड्य, विजयनगर इत्यादी राजांनी या मंदिराचा (नव्या) जीर्णोद्धार केला आणि याच्या मूळ बांधकामात भरदेखील घातली.
मंदिर आणि मूर्ती
सध्याचे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत असून नक्षीदार गोपुरांनी वेढलेले भव्य प्राकार, पुष्करिणी, अर्धमंडप, सभामंडप, गर्भगृह अशा सर्व घटकांनी युक्त आहे. कामाक्षीदेवीची मूर्ती पद्मासनात बसलेली असून ती चतुर्भुजा आहे. तिच्या पुढच्या दोन हातांमध्ये उसाचा दंड (धनुष्य) आणि पुष्पगुच्छ आहे तर मागील दोन हातात पाश आणि अंकुश आहेत. तिच्या हातातल्या पुष्पगुच्छावर पोपट बसलेला आहे. पोपट हा ‘प्रेम आणि कामना’ यांचे प्रतिक आहे तर उसाचे धनुष्य, तांत्रिक संप्रदायानुसार ‘काम’ किंवा आकांक्षांचे प्रतिक मानले जाते.
आख्यायिका
कामाक्षी देवीस परब्रह्मस्वरूपिणी असेही म्हटले जाते. या देवीच्या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात –
१) जेव्हा भगवान शिव आपल्या प्रिय पत्नीचे, सतीचे शव घेऊन हिमालयात निघाले होते तेव्हा त्या शवाचे भाग अनेक ठिकाणी गळून पडले. ज्या ठिकाणी हे भाग पडले ती ठिकाणे देवीची शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. अशी ५१ शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. कांची येथे सतीची नाभि गळून पडली त्यामुळे या स्थानास ‘नाभिस्थान’ असेही नाव आहे.
२) कोणे एके काळी भण्डासुर नावाच्या दैत्याने ब्रह्माकडून वरदान प्राप्त करून देवांना सळो की पळो करून सोडले होते. त्याच्या त्रासास कंटाळून सर्व देवगण शंकराकडे गेले आणि त्याचा वध करण्याची प्रार्थना केली. परंतु शिवाने त्यांना “कांची क्षेत्री जावे. तेथे पार्वतीच्या ‘श्री बाल त्रिपुर सुंदरी’ स्वरूपाने कामाक्षी म्हणून जन्म घेतला आहे आणि तीच भण्डासुराचा वध करण्यास समर्थ आहे” असे सांगितले. त्यावर सर्व देवगण कांची क्षेत्री आले आणि त्यांनी बालरूपातल्या कामाक्षीची मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन कामाक्षीने अत्यंत उग्र असे कालीमातेचे रूप धारण केले व भण्डासुराचा वध केला. दैत्याचा वध करूनही देवीचा क्रोध शांत झाला नाही तेव्हा देवांनी भीतभीतच देवीची आळवणी केली त्यावर मात्र देवीने पुन्हा कोमल, सुस्वरूप असे बालिकेचे रूप धारण केले. तिच्या चेहऱ्यावरची प्रभा पाहून देवही विस्मयचकित झाले. त्यांनी देवीला याच स्वरूपात येथे राहण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन तेव्हापासून देवी आजतागायत येथे भक्तांच्या कल्याणासाठी वास करून आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की कामाक्षी देवी केवळ आपल्या नेत्र कटाक्षानेच भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते.
३) नंतर कामाक्षीने वाळूचे शिवलिंग तयार करून शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपस्या आरंभिली. तिच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकराने कामाक्षीचा स्वीकार केला.
४) सरस्वती देवीच्या शापाने दग्ध झाल्यावर दुर्वास ऋषींनी कामाक्षी देवीची उपासना केली. जेव्हा दुर्वास ऋषी शापातून मुक्त झाले तेव्हा त्यांनी देवीसमोर श्रीयंत्राची स्थापना केली आणि ‘सौभाग्य कल्प चिंतामणी’ म्हणजेच दुर्वास संहितेची रचना केली. या ग्रंथात कामाक्षी देवीची आराधना कशी करावी याचे सविस्तर विवेचन आहे. आणि आजही याच ग्रंथाप्रमाणे देवीची पूजा अर्चा केली जाते
५) असे मानले जाते की मंदिर उभे राहण्याअगोदर पासून या ठिकाणी देवीची तांत्रिक स्वरूपात साधना प्रचलित होती. आदी शंकराचार्यांनी या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना करून येथील साधनेचे आणि देवीचे तांत्रिक, उग्र स्वरूप बदलून ते शांत, सौम्य केले.
या आणि अशा अनेक आख्यायिका एका गोष्टीकडे मात्र निर्देश करतात की हे मंदिर प्राचीन काळी शाक्त संप्रदायातल्या तंत्र साधनेचे प्रमुख केंद्र असावे परंतु नंतरच्या काळात मात्र ते शाक्त संप्रदायाच्या सात्विक उपासनेचे मुख्य अधिष्ठान बनले. आदी शंकराचार्यांनी येथे श्रीयंत्र स्थापन केल्याने शंकराचार्यांच्या शिष्यांपैकी एका शाखेने येथे मठ स्थापन केला. तेच हे कांचीकामकोटी पीठ होय. या शाखेच्या मतानुसार शंकराचार्यांनी याच ठिकाणी समाधी घेतली.
या मंदिरात कामाक्षी देवीची पाच रूपं पाहायला मिळतात – १) मूळ कामाक्षी २) तापस कामाक्षी ३) बंगारू (स्वर्ण) कामाक्षी ४) अंजना कामाक्षी (अरूप लक्ष्मी) ५) उत्सव कामाक्षी.
अशा अनेक आख्यायिका, देवीची विविध रूपे आणि ऐतिहासिक घटनांनी गुंफलेले हे मंदिर देवीच्या मूळ स्वरूपाचा म्हणजेच या विश्वाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या गूढ, अगम्य अशा प्रकृतीचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. दर वर्षी या मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यातही नवरात्र आणि ब्रह्मोत्सव प्रमुख म्हणता येईल. अशा या भक्तवत्सल कामाक्षी देवीस आमचे नमन असो.
कामारिकामां कमलासनस्थां
काम्यप्रदां कङ्कणचूडहस्तां |
काञ्चीनिवासां कनकप्रभासां
कामाक्षीदेवीं कलयामि चित्ते ||
– गिरिनाथ भारदे
©Ancient Trails.