अनुपमेय निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असणारा काश्मीर प्रांत आजही भारताचा मुकुटमणी आहे. गेल्या शतकापर्यंत काश्मीरचे हे अलौकिक सौंदर्य अनाघ्रात होते.
ही अनाघ्रात आणि विलक्षण भूमी ऋषी कश्यपांची निर्मिती मानली जाते. पुरातन काळात इथे एक अतिविशाल सरोवर होते. या सरोवरातील पाणी बाजूला काढून ऋषी कश्यपानी मनोरम काश्मीरची निर्मिती केली आणि काश्मीर आपल्या निसर्गदत्त आणि देवदत्त गुणांनी बहरले.
वागेश्र्वरी शारदा ही साक्षात काश्मीरपुर वासिनी! तिचे अतिशय प्राचीन असे शारदापीठ हे काश्मीर मधीलच. आज पाकव्याप्त काश्मीर मधील मुजफ्फराबाद पासून सुमारे १४० किमी अंतरावर नीलम नदीच्या किनाऱ्यावर हे शारदापीठ आहे. काश्मीरी पंडितांचे हे प्रमुख धर्मस्थळ आज दुर्लक्षित अवस्थेत कसबसे तग धरून आहे. या शारदा पीठास ५००० वर्षांचा इतिहास आहे असे म्हटले जाते. विद्येचे प्राचीन केंद्र असणारे हे शारदा पीठ पाणिनी आणि इतर व्याकरण तज्ज्ञांनी संशोधित केलेल्या ग्रंथांचे संग्रहालय होते. प्राचीन भारतातील सर्वात मोठे पुस्तकालय येथे होते अशी मान्यता आहे. देवी शारदेच्या आशीर्वादाने पुनित झालेला हा प्रांत प्राचीन काळी शारदा देश किंवा शारदा मंडल म्हणून ओळखला जाई.
अशा प्राचीन परंपरेची साक्ष देणारा काश्मीर प्रांत मात्र कायम उपेक्षित राहिला आहे. पण खरंतर काश्मीर हा असा एकच प्रांत असा आहे की ज्याचा सलग पाच हजार वर्षांचा इतिहास सलगपणे उपलब्ध आहे. अगदी पुरातत्त्वीय संशोधनाचा आधार घेऊन ही हा इतिहास आपल्या समोर येतो. श्रीनगर पासून २४ किमी वर असणाऱ्या बुर्झाहोम इथे नवाश्मयुगीन म्हणजे साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वीची जमिनीखालील (underground) घरे सापडतात.
हे आणि असे अनेक पुरावे आपल्याला काश्मीर च्या प्राचीन अस्तित्वाची जाणीव देतात. या जाणीवेच्या पाऊलखुणा आपल्याला कश्यप ऋषींच्या पुराणातील कथांमधून जशा दिसतात तशाच त्या बाराव्या शतकात कवि कल्हणाने रचलेल्या राजतरंगिणी या संस्कृत ग्रंथातील अनेक वंश आणि त्यांच्या सुरस चमत्कारिक कथांमधून ही आपल्यासमोर येतात. या ग्रंथातून कल्हणाने अनेक कथा सांगत काश्मीरचा साडेचार हजार वर्षांचा इतिहास मांडला आहे. आणि या कथा सांगताना तो काश्मीरच्या मोहमयी सौंदर्याचे वर्णन करायला विसरत नाही. तो म्हणतो –
इथे असणारी विशाल विद्याभवने, हिमाप्रमाणे असणारे शीतल जल आणि द्राक्षफळांसरख्या त्रिखंडात दुर्लभ असणाऱ्या गोष्टी साधारण समजल्या जातात.
तिन्ही लोकांत भुलोक श्रेष्ठ आहे. भूलोकात उत्तर दिशेची शोभा उत्तम आहे. तर त्यातही हिमालय पर्वत प्रशंसनीय आहे. आणि या पर्वतावर ही काश्मीर मंडल परमश्रेष्ठ आहे. (राजतरंगिणी प्रथम तरंग श्लोक ४२,४३- भावार्थ)
काश्मीर च्या समग्र इतिहासाला जिवंत करण्याचे अशक्यप्राय काम कवि कल्हणाने केले आहे. राजतरंगिणी अर्थात राजांची नदी( the river of the kings) यात एकूण आठ तरंग आहेत. यातील प्रत्येक तरंगातून काश्मीर मधील राजवंश आणि त्यांचे पराक्रम सांगितला आहे. महाभारत कालखंडापासून ते बाराव्या शतका पर्यंत काश्मीर मधील राजवंश यामध्ये आहेत.
या सर्व राज्यांच्या प्रभावळीमध्ये एक लखलखते रत्न आपल्या तेजःपुंज प्रकाशाने काश्मीरची अस्फुट प्रकाशातील परंपरा उजळून टाकते. हे रत्न म्हणजे राजा प्रतापदित्य आणि राणी नरेंद्रप्रभा यांचा पराक्रमी पुत्र लालितदित्य मुक्तपीड! प्राचीन भारताचा इतिहास लालितदित्याच्या पराक्रम गाथेशिवाय अपूर्ण आहे! त्याच्या असीम परक्रमाचे हे पर्व आपल्यासमोर उलगडायला च हवे!
– विनिता हिरेमठ
नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥
खरंच काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग … अभिमान. खूपच सुंदर लेखन केले आहेस या काश्मीर बद्दल . मस्तच 👌👌
धन्यवाद! सुंदर आणि समर्पक श्लोक!