हा लेख आहे अमी गणात्रा यांनी लिहिलेला. अमी गणात्रा यांनी अहमदाबादच्या आयआयएम मधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी ब्राझील, अमेरिका, इंग्लंड, होंगकोंग आदि देशांमध्ये काम केले आहे. त्या व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असून, योग प्रशिक्षक आहेत तसेच संस्कृत शिक्षिका पण आहेत. त्यांनी लिहिलेल्या सुंदर लेखाचा हा अनुवाद.
धर्म शास्त्राच्या ग्रंथातून “काय करावे व काय करु नये” यावर विस्ताराने लिहिले असते. पण वेदांनी यापेक्षा अगदी वेगळेच विषय हाताळले आहेत. त्यामध्ये निसर्ग, ब्रह्मांड, देवत्व, मन, जीवसृष्टी, संस्कार या सह अनेक विषय आहेत. तसेच सुखी जीवनाचा मार्ग, प्राचीन राजे आणि राज्यांच्या कथा देखील वेदांमध्ये समाविष्ट आहेत. वेदांतील सूक्त लिहिणारे ऋषी व ऋषिकांपैकी एक आहे सूर्या सावित्री. या ऋषिकेने एका सूक्तातून लग्नाची कथा सांगितली आहे. तिने लिहिलेले हे सुक्त “विवाह सूक्त” म्हणून ओळखले जाते. हे सुक्त ऋग्वेद (१०.८५) व अथर्व वेद (कांड १४) मध्ये समाविष्ट आहे. आजही या सूक्तातील श्लोक विवाहातील पाणिग्रहण सोहोळ्यात गायले जातात. ‘पाणी’ग्रहण अर्थात – वधूचा हात (पाणी) हातात घेऊन वर तिच्याकडून जन्मभरासाठी सोबत चालायचे वाचन मागतो. या सूक्तातील वर आणि वधू यांच्या एकत्र येण्यातील शुचिता आणि पावित्र्य मोहक आहे.
या सुक्ताची सुरुवात सूर्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या सोमच्या स्तुतीने होते. सूर्याला सुद्धा सोम मनोमन आवडत असतो. सूर्य-देव हा सूर्याचा पिता आहे, विवाहातील गायली जाणारी मंगल गाणी तिच्या सख्या आहेत. अश्विनी कुमारांनी तिच्या वतीने सोमाकडे सूर्याच्या लग्नाचा प्रस्ताव नेला आहे.
कन्या सासरी निघाल्यावर वडिलांचे कंठ दाटून येतो, तशी सूर्यदेवाची अवस्था झाली आहे. नवीन घरटे बांधण्यासाठी पिता तिला जड अंत:करणाने निरोप देतो. नवीन संसारासाठी तिला प्रेमाने अनेक आशीर्वाद देतो. नवीन घराची ती गृहस्वामिनी होवो अशी कामना करतो. तसेच नवीन घरात सर्वांशी आदरपूर्वक वाग, आपल्या कर्तव्यांविषयी जागरूक रहा असा उपदेश करायला तो विसरत नाही.
कॉर्पोरेट जगताप्रमाणेच प्रमाणेच, घरी सुद्धा, आदर आणि अधिकार मिळविण्यासाठी आपल्याला दिलेली भूमिका नेमेकेपणे आणि प्रभावीपणे पार पाडणे गरजेचे आहे. अधिकार हे जबाबदारी घेऊनच येतात. वधूचे वडील तिला सांगतात –
प्रेतो मुञ्चामि नामुतः सुबध्दाममुतस्करम् । यथेयममिन्द्र मीढ्वः सुपुत्रा सुभगासति॥१.१८॥ पित्याच्या प्रेमाची बंधने सैल सोडत मी तुझी पाठवणी करतो. जा मुली, नवऱ्यासोबत तुझ्या घरी प्रेमाने रहा! इंद्राच्या कृपेने तुला चांगली मुले होवोत! तुला सौभाग्य लाभो! भगदेव तुला रथाकडे घेऊन जावोत. अश्विनी कुमार तुला वराच्या घरी सोडून येवोत!
भगस्त्वेतो नयतु हस्तगृह्याश्विना त्वा प्र वहतां रथेन । गृहान् गच्छ गृहपत्नी यथासो वशिनी त्वं विदथमा वदासि ॥२०॥ सूर्या! तुझ्या पतीच्या घराची तू स्वामिनी होवोस. घरातील कर्ती स्त्री होऊन तू सर्वांशी प्रेमाने वाग, कटू बोलून कुणाचे अंत:करण दुखवू नकोस.
इह प्रियं प्रजायै ते समृध्यतामस्मिन् गृहे गार्हपत्याय जागृहि । एना पत्या तन्वं सं स्पृशस्वाथ जिर्विर्विदथमा वदासि ॥१.२१॥ अपत्यांसोबत तू आनंदी व समृद्ध जीवन जग. घरातील कर्तव्याबद्दल नेहमी जागरूक रहा. पतीशी एकरूप हो! तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो! तुमचे शब्द इतरांना प्रेरणा दायक होवोत!
आशासाना सौमनसं प्रजां सौभाग्यं रयिम् । पत्युरनुव्रता भूत्वा सं नह्यस्वामृताय कम् ॥४२॥ सम्राज्ञ्येधि श्वशुरेषु सम्राज्ञ्युत देवृषु । ननान्दुः सम्राज्ञ्येधि सम्राज्ञ्युत श्वश्र्वाः ॥१.४४॥ तुझ्यावर ज्या काही जबाबदाऱ्या पडतील त्या नीट पार पाड. नवऱ्याचा विश्वास तू संपादन कर. तुला सुख, समाधान व सौभाग्य लाभो! अमृत्त्वाच्या पथाने तुझी वाटचाल होवो. अशा प्रकारे वागल्याने तू नवीन घरातील सम्राज्ञी होशील!
हा उपदेश फक्त वधू साठी नाही, तर वरासाठी पण आहे. वराने वधूला अनुकूल असेच वागावे. ज्या प्रमाणे वधूला प्रेमाने सौजन्याने वागण्यास सांगितले आहे, तसेच वराने सुद्धा पत्नीला मान्य असेल अशा प्रकारे वागणे अपेक्षित आहे.
युवं भगं सं भरतं समृद्धमृतं वदन्तावृतोद्येषु । ब्रह्मणस्पते पतिमस्यै रोचय चारु संभलो वदतु वाचमेताम् ॥ १.३१॥ तुम्ही दोघेही मृदूभाषी व्हा! चांगले वागा! तुम्हाला भरपूर समृद्धी प्राप्त होवो! हे बृहस्पती! हा नवरा वधूशी प्रेमाने वागणारा व गोड बोलणारा होवो! तो तिच्याशी सहमत असणारा होवो!
जीवं रुदन्ति वि नयन्त्यध्वरं दीर्घामनु प्रसितिं दीध्युर्नरः । वामं पितृभ्यो य इदं समीरिरे मयः पतिभ्यो जनये परिष्वजे ॥१.४६॥) जे पती आपल्या पत्नीची काळजी घेतात, त्यांना धार्मिक कार्यात स्वत:बरोबर सामील करून घेतात, मुलांनी समृद्ध करतात, त्यांच्या बायका देखील त्यांना अनुकूल होतात.
आता वराने आपले विचार प्रदर्शित करण्याची वेळ येते. नवऱ्याची भूमिका तो उत्तम प्रकारे व उत्साहाने पार पाडेल असे वचन देतो. पाणीग्रहण सोहोळ्याच्या वेळी, वर म्हणतो –
येनाग्निरस्या भूम्या हस्तं जग्राह दक्षिणम् । तेन गृह्णामि ते हस्तं मा व्यथिष्ठा मया सह प्रजया च धनेन च ॥१.४८॥ अग्नीने ज्या धर्माच्या सहाय्याने पृथ्वीचा हात हातात धरला होता, तसे मी तुझा हात माझ्या हातात घेतो. माझ्या सोबत उभी रहा. आपण दोघे मिळून आपले घर उभे करूया.
गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्या जरदष्टिर्थासः। भगो अर्यमा सविता पुरंधिर्मह्यं त्वादुर्गार्हपत्याय देवाः ॥१.५०|| माझ्या सौभाग्याने मी तुझा हात धरला आहे! मला आयुष्यभर साथ दे! मी गृहस्थ धर्माची कर्तव्ये पार पाडावीत म्हणून देवाने मला तुझी साथ दिली, हे माझ्ये भाग्य आहे!
ममेयमस्तु पोष्या मह्यं त्वादाद्बृहस्पतिः । मया पत्या प्रजावति सं जीव शरदः शतम् ॥१५२॥ त्वष्टा वासो व्यदधाच्छुभे कं बृहस्पतेः प्रशिषा कवीनाम् । तेनेमां नारीं सविता भगश्च सूर्यामिव परि धत्तां प्रजया ॥१.५३॥ तू आणि मी मिळून अर्थ (आरोग्य व धनसंपदा) मिळवू. बृहस्पतीने माझ्यावर कृपा केली आहे की मला तू जोडीदार मिळालीस. आपल्यला चांगली मुले होवोत. तू व मी मिळून शंभर शरद ऋतू पाहू! सर्व देवता माझ्या वधूचे मंगल करोत!
अमोऽहमस्मि सा त्वं सामाहमस्म्यृक्त्वं द्यौरहं पृथिवी त्वम् । ताविह सं भवाव प्रजामा जनयावहै ॥२.७१॥ मी पुरुष तत्व तर तू प्रकृती आहेस! मी सामवेद तर तू ऋग्वेद आहेस! मी आकाश आणि तू माझी पृथ्वी आहेस! तू शब्द तर मी गीत आहे! आपण दोघे एकत्र येऊन सृजन करू.
सं पितरावृत्विये सृजेथां माता पिता च रेतसो भवाथः । मर्य इव योषामधि रोहयैनां प्रजां कृण्वाथामिह पुष्यतं रयिम् ॥२.३७॥) तुम्ही दोघे योग्य वेळी एकत्र या. ज्या योगे तुम्ही एका नवीन अंकुराचे माता-पिता व्हाल. तुम्हा दोघांना उत्तम संतती लाभो! तुमचा उत्कर्ष होवो!
भारतीय दृष्टीने स्त्री पुरुषाचे मिलन एक पवित्र व शुद्ध कार्य मानले आहे. उत्तम संतती तयार करणे हे धर्मकार्य मानले आहे. वधू वराचे मिलन हे पुरुष व प्रकृती, शिव व शक्ती यांच्या मिलनाप्रमाणे दैवी आहे. आपल्या अध्यात्मिक देवता पण पहा, सीता-राम, विष्णू-लक्ष्मी, शंकर-पार्वती अशा जोडीनेच येतात. स्त्री व पुरुष दोघेही या मिलनाचे समान भागीदार आहेत. त्यांची भूमिका भिन्न असली तरी अधिकार किंवा जबाबदारी समान आहे.
इहेमाविन्द्र सं नुद चक्रवाकेव दंपती । प्रजयैनौ स्वस्तकौ विश्वमायुर्व्यश्नुताम् ॥२.६४॥ हे इंद्र देवा! या दोघांना विवाह बंधनात बांध! मग ते चक्रवाक पक्ष्यांप्रमाणे सदैव सोबत राहतील. त्यांना आनंदाने सुखा समाधानाने जगू दे!
काळानुरूप पद्धती बदलतात आणि बदलत राहतील. पण वैदिक साहित्यातील ही विवाह गाथा व त्यामधील वधू वरच्या आणाभाका निश्चित मौल्यवान आहेत. त्या आणाभाका शाश्वत असल्यामुळेच अजूनही वापरत आहेत!
संग्रही असावा असा सुंदर लेख .
मला पण हा फार आवडलेला लेख आहे. – दीपाली.