डियर समराट असोक,
शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष.
वळखलत ना सर, मला? म्या सोपोऱ्याचा दामू! तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न? माझी मागची पत्रे मिळाली असतीला. तुमच्या उत्तराची अमी दोघे लई दिसापासून वाट पहात हाय. पन स्वर्गात तुमी बीजी असाल असे बायडी म्हनाली. माझी. तसे पाहयलं तर तुमच्या पत्रांना आमी उत्तर दोन हजार वरसांनी उत्तर पाठीवलं. तर मग तुमी आमाच्या पत्अरालेजुन दोन महिन्यांनी उत्तर पाठीवलं तरी चालल. अमी काय रागावणार नाय. तुमी काळजी करू नगसा.
तर, आज तुमाले पत्र लीवायचं कारण असं हाय, की माझ्या बायकूने माझ्या संगट पैज लावलीया. ती माझ्या संग सारखी पैजा लावती. परत्येक येळी तीच जिंकती. या खेपेस मात्र म्याच जिंकणार असे वाटतंया. पण त्यासाठी तुमी माझ्या पत्राले उत्तर द्यायले पायजेल. स्वर्गात तेव्हढ येक रायटर शोधून मले ताबडतोप उत्तर पाठवा. अशी तुमास्नी इनंती हाय.
ते काय हाय, की तुमी तुमच्या समद्या ओपन लेटर्स मंदी लीव्हलंय की तुमी “देवानां पीय” हायसा. ते बद्दल आमच्या मनात काय बी डाउट नाय. इतकं चांगलं काम करनारा राजा, प्रजेच्या प्रश्नात लक्ष घालणारा राजा. जागोजागी दवाखाने काढनारा अन् जंगलातील प्रान्यांची सुदिक काळजी घेनारा राजा द्येवाले प्रियच असनार. असनार म्हंजी काय असनारच! नक्कीच असनार. (तुमास्नी म्हाईत नसल म्हनून सांगतो, आजकाल असे येकच वाक्य दोनदोनदा, तीनतीनदा लीव्हायची फ्याशन हाय.) तर प्रश्न तो न्हाय. प्रश्न असा हाय की तुमी कोनच्या देवाला प्रिय व्हता? तुमच्या द्येवाचे नाव काय?
म्हंजी तुमच्या काळात इंद्र देव लई पावरफुल व्हते. आनी इष्णू भगवान तर लईच पोपुलर व्हते. अन् महादेव तर समद्यामंदी ग्रेट व्हते. म्या म्हनतो, की तुमचा देव इंद्र तरी असनार नाईतर इष्णू तरी असनार. पन माझ्या बायडीला ते पटत नाय. तसे तिला माझं काईच पटत नाय. पन ते जौंद्या. माझी बायडी काय म्हन्ती? ती म्हनती की, “देवांना पीय म्हन्जी खूप देवांना पीय असलेला राजा. असा देवावानी कामे करनारा राजा येकाच देवाला का म्हनून प्रिय असल? त्यो राजा समद्या देवांना प्रिय असनार. ‘देवांना पीय’ म्हंजी समद्या तेत्तीस कोटी देवांना पीय, असा अर्थ असतोय!”
मला काय तुमच्या द्येवांमधील पोपुलारीटी बद्दल अजिबात म्हंजी अजिबात डाउट नाय. पण मले असे वाटते की तुमी येका द्येवाचे भक्त असनार. अन् म्हनून तुमी “देवांना पीय” जे लिव्हलंय ते तुमच्या देवाला आदराने लिव्हल असणार.
तर प्रश्न असा हाय की तुमचा देव कोन्चा? तुमी कोन्च्या द्येवाचा लाडके व्हता? या प्रश्नावर स्वर्गातून तेव्हढ जरा परकाश टाका. तुमी जर येक इंद्र किंवा इष्णू द्येव व्हता असे म्हनला, तर म्या पैज जिंकेन! अन् मले बायडी मुर्गा करून द्येईल. नायतर ती मले मुर्गा करून हूबं करील.
यवढी एक पैज जिंकून द्या राजं! मंग मी आयुक्षात पुन्हा कदीच कोंबड खानार नाय. द्येवाची आन घेऊन सांगतो!
तुमच्या पत्राची वाट पाहनारा,
अन् तुमच्या आदनेत ऱ्हानारा,
दामू.
सोपारा.
ता. क. – मागं आमी दोघांनी ब्रामी लीव्ह्याला अन् वाचायला शिकल्यावर तुमची पत्र वाचली व्हती न? हां, तवापासून, म्हंजी बगा आता एक वरिस झालं असल, तवापासून आमी फकस्त दोन येळा कोंबडी अन् यकदा पापलेट खाले. देवाशप्पत!