जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटले जाते. त्याची प्रत्यांतरे पावलोपावली येतात. सगळ्याच संस्कृतींमध्ये हे दिसते.
प्राचीन ग्रीक कवींनी सूर्याला हेलीओस म्हटले. तो रोज आकाशातून पूर्व क्षितिजापासून पश्चिम क्षितिजापार जातो. त्या प्रवासासाठी त्याला त्याला चार घोडे जुंपलेला सोनेरी रथ दिला. हेलीओस वर कविता रचल्या आणि त्याच्या अनेक सुंदर मूर्ती घडवल्या.

रोमन लोकांनी नद्यांवर देवत्व बहाल केले. त्यांच्या दृष्टीला नदी पुरुष देवता दिसली. आज इटली मध्ये नदी देवतांचे शिल्प उभे आहे. रोम मध्ये असलेल्या या शिल्पात ४ नद्या आहेत – गंगा, नाईल, डन्यूब आणि रिओ दे ला प्लता. या प्रकाशचित्रात हातात वल्हे घेतलेला गंगा देव दिसत आहे.

आपल्याकडे मात्र नदी ही देवता मानली गेली. आणि गंगा, यमुना, सरस्वती यांची अनेक सुंदर शिल्प तयार झाली. गंगा नदी ही – शुभ्र वस्त्र धारण केलेली, चार भुजा असलेली देवी आहे. गंगा लहरी मध्ये तिचे वर्णन केले आहे –
शरदातील चंद्रासारखी शुभ्र, मुकुटात चंद्रकला धारण करणारी, चतुर्भुज धारिणी, धारे प्रमाणे शुभ्र वस्त्रे ल्यालेली, मकरावर विराजमान असलेली – गंगामाई, मी तुला वंदन करतो! नेत्रांनी तुझे शुभ्र रूप पहिले नाही तर काय पहिले? कानांनी तुझ्या लहरींचा नाद ऐकला नाही, तर काय ऐकले?
गंगा लहरी

तसेच भारतीय दृष्टीला सूर्य सुद्धा मानवी रुपात दिसला आहे. हातात उमलेले लाल कमळ धारण केलेला, अतिशय प्रसन्न मुद्रा असलेला सूर्य कलाकारांनी शिल्पात आकारलेला दिसतो. त्याच्या दोन बाजूंना उषा व संध्या (किंवा उषा व प्रत्युशा) या पत्नी प्रकाशाचे बाण सोडतांना दाखवल्या जातात. सात घोड्यांच्या रथात आरूढ असलेल्या सूर्याचा रथ अरुण हाकत असतो.

अशीच भावना पृथ्वीसाठी दिसते. मानवी रूप धारण केलेली पृथ्वी देवी अनेक शिल्पात दिसते. कैक सूर्याच्या शिल्पात सूर्याच्या पायाशी लहानशी पृथ्वी देवी चित्रित केलेली आहे. तिला भूदेवी म्हटले आहे. तिला लक्ष्मीचे रूप मानले आहे. विष्णूची पत्नी मानले आहे. पृथ्वीला ‘गौ:’ देखील म्हटले आहे. कैक पुराण कथांमध्ये पृथ्वी गायीचे रूप घेऊन येते. ग्रीकांनी सुद्धा पृथ्वीला मानवी रुपात पहिले. पृथ्वी – ‘गाया’ (Gaia) देवतेच्या पायाशी गाय दाखवली जात असे. भारतीयांची पृथ्वी देवी विषयीची भावना या स्तोत्रातून दिसते –
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मण्डले, विष्णु पत्नी नमोस्तुभ्यं पाद: स्पर्श क्षमस्वमे ||
ही शिल्पे पाहून आपण असे म्हणून शकतो का, की या प्राचीन ग्रीक वा भारतीय कवींना कलाकारांना थोडे देखील वैज्ञानिक अंग नव्हते? डोळ्यांना धडधडीत वळणे घेत जाणारी क्वचित धबधब्याचे रूप घेणारी नदी यांना मानवासारखी दिसली? किंवा डोळ्यांना सूर्य गोल दिसत असून सुद्धा त्याला मानवी आकार दिला, म्हणजे त्यांना सूर्य गोल आहे हे कळले नव्हते? पृथ्वी गोल आहे हे त्यांना माहीतच नव्हते? या संस्कृती मधील वैज्ञानिकांना (जर तसे कोणी असलेच तर) असे वाटायचे की पृथ्वी गोल नसून मानवा सारखी दिसते?
शिल्प पाहायचे असेल तर त्यासाठी कलाकाराची, कवीची आणि त्यामागील तत्त्वज्ञाची दृष्टी हवी. कलेमध्ये प्रत्येक रंग, चिन्ह खूप काही सांगत असते, बोलत असते. पण आपल्याला ती भाषा कळायला हवी. चित्र वाचता आले नाही तर – Gravity च्या पुस्तकाला सफरचंदाचे चित्र असलेले कव्हर लावले, म्हणजे त्या संस्कृतीला वैज्ञानिक दृष्टीच नव्हती असे म्हणण्यापैकी आहे.