गजोsमिथ्या। पलानयनमपि मिथ्या।
‘अद्वैत वेदांत’ शिकवताना, एक जबरदस्त ताण असतो. मुळात आपल्या अनुभूतीची पातळी कुठेच मॅच नसताना, असा विषय हातात घेणे कठीण होऊन जाते. मग मनाला समजवावे लागते, की विद्यापीठाने ज्या अर्थी हा अभ्यासक्रम ठेवलाय, त्या अर्थी हे शिकवणे आपल्या “प्रारब्धात”आहे. मग शिकवले जाते!! त्यातच आपणही हळूहळू शिकत रहातो.
प्रत्येक वर्षी एक तरी विद्यार्थी निघतोच, जो विचारतो की, “ही अनुभूतीची शास्त्रे आहेत, तर थेट साधना करावी ना!दर्शन, तत्वज्ञान कशाला लिहिले जाते? पुन्हा त्यावर भाष्ये, टीका आणि काय काय..” अगदी हाच प्रश्न कैवल्यधाम, लोणावळा येथे “योगशास्त्र” शिकत असतांना, मी ही माझ्या शिक्षकांना विचारला होता. त्यावेळी डॉ. ज्ञानशंकर सहाय सरांनी दिलेले उत्तर मला जसेच्या तसे आठवते. ते फळ्यावर लिहीत होते, पूर्ण मागे वळून म्हणाले, “देखो, अभी आप कर्ता हो। आप रोज जैसा कर्म करते हो, साधना में उतरोगे तो वैसें ही कर्म करोगे। आप के करने की, मात्र दिशा बदल जायेगी। न कर्म बदलेगा, न कर्ता! अहंकार का केंद्र वैसा ही बना रहेगा।” आणि मग शब्दांवर जोर देऊन म्हणाले, ‘जानने” सें कर्ता बदलता है। यही दर्शन की महत्ता है।”
एक प्रश्न सरांनी सोडवला, पण दुसरे अडते ते “मायावाद” शिकवताना. आदी शंकराचार्य सहजपणे म्हणून गेले, गज मिथ्या आणि पलायन पण मिथ्या!! त्याची व्यावहारिक संगती लावायची कशी? आणि मग एक, पांढऱ्या दाढीचे कनवाळू आजोबा जवळ येतात! खास बनारसी हिंदीत म्हणतात,”बेटी, माया को जानना है तो उसकी बहिन छाया सें परिचय कर लो”
माया छाया एकसी
बिरला जाने कोए।
भागत के पिछे लगी।
संमुख भागे सोए।
कबीरांच्या या दोह्यातून “पलायनोsपि मिथ्या” थोडे थोडे कळत जाते!
माया ही सावली सारखी असते. जोवर शरीर आहे तोवर असणारच! जेव्हा तुम्ही प्रकाशाकडे जाणे सुरू करता, तेव्हा सावली तुमच्या मागे मागे येत रहाते. आपल्या मागे येत आहे म्हणून तिच्याविषयी आसक्ती वाटून आपण प्रकाशाकडे पाठ फिरवतो. तो ती आपल्या पुढे धावू लागते! आणि आपल्याला धावण्यास भाग पाडते! ती लक्ष खेचून घेत रहाते. आपल्या सगळ्या व्यक्तित्वाला ती तिच्यामागे येण्यास भाग पाडते!तुम्ही प्रकाशाकडे जात असा की तिच्या दिशेने धावत असा! काहीच गवसू देत नाही, आणि आशा, तृष्णा जागवत ठेवते! तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष हाच सुटकेचा मार्ग आहे!मग तिच्या असण्या नसण्याने साधकाला फरक पडत नाही! थोडक्यात काय,तर शरीराच्या अस्तित्वासोबत माया छाया असणारच!
“आखें मुंदे, अंदर सपना।
खुली आंख तो, बाहर सपना।”
पण मग, शरीर आहे तोवर मायेसोबत येणाऱ्या विविध बाबींचे करायचे काय? शक्ती, विचार, भावना, कल्पना!! तर शरीराला तप, स्वाध्याय यांचे धडे द्यायचे.भावना अधिक असतील तर भक्तीत गुंतवणूक करायची! विचार अधिक असतील तर शास्त्र अध्ययन करायचे! मायेने शक्ती रूपिणी व्हावे म्हणून, शिवाचे चिंतन करायचे। बसवेश्वर म्हणतात,
करुंगा “मैं” ध्यान तेरा।
माया कहां करने देगी!
करुंगा”मैं” ध्यान तेरा।
या सगळ्या साधनेत हळूहळू “शरीराच्या आत नाही, बाहेर नाही, आत आहे, बाहेर आहे” असे “तत्त्व” गवसू लागते! आणि मग हत्ती आलाच तर त्याच शक्तीच्या सहाय्याने धावायचे। आणि म्हणायचे…
“गजोsपि मिथ्या। पलायनोsपि मिथ्या।”
(दोहा विवेचन – आचार्य प्रशांत यांच्या प्रवचनातून)
रमा दत्तात्रय गर्गे।