आषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते. आणि मग वातावरणाला उत्सवांची सुरीली लय मिळते. उत्सवांच्या या सुरावटी मध्ये, लय तालामध्ये एक नकळतशी हलकीशी लय आपलं अस्तित्व सांभाळत आजही उभी आहे. ही लय आहे निसर्गाशी बांधली गेलेली, नवनिर्मितीची आणि सृजनाची! श्रावणातल्या प्रत्येक प्रथा परांपरांमधून निसर्गाचं आणि सृजनाचे अस्तित्व आपल्याला पावलोपावली जाणवतं. मग ती नागपंचमी असो नाहीतर नारळी पौर्णिमा. आणि त्याबरोबरच घरोघरी केले जाणारे जिवतीचे पूजन!
आदिम समाजाने निसर्गातील शक्तिंपुढे लीन होत त्यांचे पूजन सुरू केले. रूढार्थाने ‘ देव ‘ या संकल्पनेचा जन्म होण्याच्या आधी निसर्ग शक्तिंचे पूजन सुरु झाले होते. पूजनाच्या या संकल्पनेचा एक आयाम म्हणजे मातृदेवतेचे पूजन! म्हणजे मातृका पूजन. मातृका पूजन हे प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे. मातृदेवतेच्या पूजनाचे २५,००० वर्षांपूर्वीचे अवशेष उत्तर प्रदेशातील बागोर इथे आढळले आहेत. सुफलन आणि आरोग्याचे प्रतिक म्हणून मातृ देवतेची पूजा बांधली जाई.
भारतीयांमध्ये मात्तृशक्तीची उपासना ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वेद साहित्यात शक्तीच्या उपासनेची काही सूक्ते आढळतात. वेदांमध्ये तुलनेने पुरुष देवतांचे वर्णन अधिक आहे. पण तरीही या वैदिकांना विराट सामर्थ्याच्या एका स्त्री देवतेचा साक्षात्कार झाला होता. ही देवता म्हणजे आदिती! वैदिकांनी या देवी आदितीचे वर्णन केनोपानिषदात मुक्तकंठाने केले आहे.
सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा मातृका पूजन प्रचलित होते. एका सिंधू मुद्रेवर सात स्त्रियांचे अंकन हे या संदर्भात महत्त्वाचे ठरते. कारण सप्त मातृकांचा हा सर्वात जुना पुरावा असावा असे दिसते. या सप्त मातृका प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. काल पुढे सरकला तसे मातृका पूजनाचे आविष्कार बदलत गेले. या मातृका लोकदेवतांच्या रुपात गावागावांतून पुजल्या जाऊ लागल्या. मग या मातृदेवतांचे दर्शन आपल्याला कधी शेंदराने माखलेल्या तांदळयात होते तर काही ठिकाणी ही मातृदेवता लज्जगौरीच्या रुपात सृजनाचा आणि नवनिर्मितीचा आशीर्वाद लभाण्यासाठी पुजली जाते. या मातृदेवता अनेक ठिकाणी क्षेत्रदेवता (क्षेत्र – शेत) किंवा त्या गावच्या संरक्षक देवता म्हणून उपास्य आहेत.
यल्लंमा, मातंगी, रेणुका या अशाच प्राचीन क्षेत्रदेवता आहेत. या मातृदेवता आजही आपल्याला सटवाई, शितळादेवी अशा लोकदेवता म्हणून दिसतात. तर तुळजाभवानी, अंबाबाई या कुलदेवतेच्या रुपात घराघरांत आणि मनामनात अधिष्ठित असतात. तर या लौकिक रुपांखेरिज काही अव्यक्त, अमूर्त शक्ती अनुकूल किंवा प्रतिकूल कार्य करतात आणि म्हणून त्या शक्तिंचे ही पूजन होते. या उग्र शक्तींपासून कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. काही काळापूर्वी पटकीची साथ आणणारी म्हणून मानली गेलेली मरीआई हे अशा देवतेचे उदाहरण आहे.
श्रावणात घरोघरी पुजली जाणारी जिवती ही संरक्षक देवता आहे. जरा ही मूळची राक्षसी होती. तिने मगध नरेशाला दोन वेगळ्या भागांमध्ये जन्माला आलेल्या मुलाचे दोन्ही भाग जुळवून एकत्र करून दिले होते. हा मुलगा पुढे जरासंध म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा विचित्र प्रकारे जन्माला आलेल्या मुलाला जीवनदान दिले म्हणून पुढे तिची पूजा होऊ लागली. राक्षसी असूनही जीवनदान दिलेली ही पुढे “जरा जिवंतिका” म्हणून पुजली जाऊ लागली. आजही आपल्या घरच्या लहान मुलांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण व्हावे या भावनेतून जिवतिचे घरोघरी पूजन केले जाते.
अनघड, अनवट वाटेवरून सुरू झालेले सुफलनाचे, पुनरुत्पादनाचे आणि आरोग्याचे प्रतिक असणारे मातृकापूजन आजही श्रद्धेने घराघरांत सुरू आहे. या उत्सव परंपरांच्या मांदियाळीत असणारा मातृपुजनाचा, शक्ती उपासनेचा सूक्ष्म पण बळकट धागा आजही त्या आदिम संस्कृतीशी आणि भावनेशी आपल्याला घट्ट बांधून ठेवतो आहे!
– विनिता हिरेमठ
संदर्भ सूची:-
१. भारतीय मुर्तिशास्त्र – डॉ. नी. पु. काळे
२. शिल्पकार चारित्रकोश – महाराष्ट्रातील दैवते – डॉ. अरुणा ढेरे
३. मराठी विश्वकोश