असे म्हणतात की जेव्हा धर्माला मूर्त स्वरूप, मानवी रूप धारण करावे वाटले ,तेव्हा त्याने रामाच्या रुपाने जन्म घेतला।रामो विग्रहवान धर्मः।
हेच आपल्याला प्रतिभेच्या संदर्भामध्ये म्हणायचे असेल तर, प्रतिभेला जेव्हा मानवीरुप धारण करावे वाटले तेव्हा तिने महर्षी व्यासांच्या रुपाने जन्म घेतला असे आपण म्हणू शकतो।
व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। ज्याने गुरु केला आहे त्याने या दिवशी आपल्या गुरुचे पूजन करावे, तर ज्यास गुरु नसेल त्याने मनोभावे व्यासांचे स्मरण करावे असे म्हटले जाते।
उत्तर वैदिक कालखंडात निर्माण झालेले अधिकाधिक साहित्य हे व्यासांच्या नावावर आहे।गंमत म्हणजे यामध्ये काळाची कसलीही संगती नाही। अगदी अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले साहित्यदेखील व्यासांच्या नावे आपल्याला दिसून येते।हे नेमके काय आहे याविषयी आपण थोडे जाणून घेऊया।
मुळात भारतामध्ये साहित्यकृतीचा काळ आणि त्याचा कर्ता यामध्ये संगती लावणे फार कठीण होऊन बसते। याची तीन मुख्य कारणे आहेत।
एक म्हणजे लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वीचे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन केले जात असे आणि मग कधीतरी ते लिहून ठेवताना कर्त्याच्या नावे लिहून ठेवले जात असे।त्यामुळे कर्ता एका काळातील असतो तर संहितेची प्रत एका काळातील असते।दुसरे कारण म्हणजे साहित्यकृतीच्या कर्त्याला स्वतःच्या नावाच्या डिंडीमाची फारशी आवश्यकता वाटत नसे।म्हणून तो स्वतःची माहिती तपशीलवार नोंदवत नसे आणि तिसरे कारण म्हणजे परकीयांच्या आक्रमणांमध्ये अनेक विद्यापीठे,मठ,मंदिरे यांची नासधूस झाली।त्यात अनेक मूळ संहिता, साहित्यकृती जळून गेल्या।त्यामुळे प्रथम दर्जाचे पुरावे उपलब्ध होत नाहीत।
महर्षी व्यासांच्या बाबतीत तर असे घडले आहे की जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण होते,तेव्हा त्यातील मुख्य अंश हा आपण व्यासांकडूनच मिळवलेला असल्याने यावर आपले नाव कशाला टाकायचे,असे म्हणून व्यासांचे नाव त्यावर घालून दिले जात असे। या कृतीमागे साहित्यिकाची कृतज्ञता व्यासांविषयीची श्रद्धा आणि आपल्या मर्त्यपणाची व मर्यादांची जाणीव ह्या दैवी जाणिवा असल्या, तरीही यामुळे इतिहासाच्या अभ्यासकाची मात्र कोंडी होऊन जाते।
व्यासांच्या कालखंडा विषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत.असे असले तरी संस्कृत साहित्यातील प्रमुख तीन कृती व्यासांच्या नावे आहेत,याविषयी मात्र त्यांचे एकमत आहे। या कृती म्हणजे वैदिक सुक्तांचे संकलन व विभाजन, महाभारत या आर्ष महाकाव्याची रचना आणि वेदांतसूत्रे अर्थात ब्रह्मसूत्रे यांची रचना होत।
आर्ष महाकाव्ये दोन रामायण आणि महाभारत!आजवर ऋषि केवळ ऋचा रचत असत। मात्र लौकिक महाकाव्याची रचना करून, धर्म व नीतीशास्त्राचे ज्ञान देणे ऋषींनी सर्वप्रथम या दोन काव्यांमध्ये केले।ऋषींपासून आलेली म्हणून आ ऋष अर्थात आर्ष असे या काव्यांना म्हटले जाते। या महाकाव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे रचनाकार दोन्ही ऋषी त्या महाकाव्यातील विशेष पात्रे देखील आहेत।परंतु हे घडले कधी या विषयी अद्याप एकमत नाही।म्हणूनच या प्रश्नामध्ये न जाता आपण महर्षी व्यासांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या मुख्य तीन कृतींची माहिती थोडक्यात पाहू।
व्यासं वसिष्ठ नप्तारं शक्ते: पौत्रकल्मषम्।।
पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधीम्।।
वसिष्ठाचे पणतू, शक्तीचे नातू पराशराचे पुत्र आणि शुकाचे पिता ही व्यासांच्या पितृकुलाची ओळख होय। त्यांच्या मातेचे नाव सत्यवती। पौराणिक मान्यतेनुसार ही उपरिचर वसुची व अद्री नामक अप्सरा यांची पुत्री। तिचा प्रतिपाळ एका केवट राजाने केला होता। सत्यवतीला पराशरापासून जो पुत्र झाला तोच पाराशर्य व्यास होय। व्यासाचा जन्म द्वीपावर झाला म्हणून त्यांना द्वैपायन असे म्हटले जाते ।तेथे बदरीवन होते म्हणून बादरायण असे म्हटले जाते। तर कृष्ण वर्णाचे असल्यामुळे त्यांना कृष्णद्वैपायन असेही म्हटले जाते। वेदांचे संकलन व विभाजन केल्यामुळे प्राप्त झालेली ‘वेदव्यास’ ही त्यांची उपाधी देखील त्यांचे विशेष नामच होऊन गेली आहे।
स्वतः महर्षी व्यास महाभारतामधील महत्त्वाचे पात्र आहेत। त्यांची माता सत्यवती हिने कुरुकुलातील राजा शंतनू याच्याशी विवाह केला। त्याचे पासून तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी दोन मुले झाली। यापैकी चित्रांगद गंधर्वांसमवेत झालेल्या युद्धात मारला गेला। विचित्रवीर्य अशक्तता येऊन क्षयरोगाने मरण पावला।
सत्यवतीने आपल्या थोरल्या सुपुत्राला-व्यासाला बोलवले. तत्कालीन प्रथेनुसार दोन्ही सुनांचे ठायी नियोग पद्धतीने संतान प्राप्ती करवून घेतली।मात्र ही दोन्ही मुले अनुक्रमे पंडुरोगी व अंध जन्मली। तिसऱ्या वेळी सुनेने,म्हणजे अंबिकेने आपल्या दासीला पुढे पाठवले। व्यासांपासून नियोगाने तिला पुत्र झाला। तो अव्यंग होता। त्याचे नाव विदुर। अशाप्रकारे ज्या कुरुकुळाचा इतिहास महाभारत आहे, त्यातील मुख्य पात्रे धृतराष्ट्र, पंडू व विदुर यांचे नियोगपिता व्यास होत। महाभारतामध्ये व्यासांनी स्वतःची फारशी माहिती दिलेली नाही। नियोगानंतर वेळोवेळी ते उपदेश करताना तेवढे आढळतात।
व्यास विवाहित होते।त्यांच्या पत्नीचे नाव पिंजला ।काही ठिकाणी वाटिका असेही दुसरे नाव आढळते ।व्यास पत्नी पिंजला ही ऋषी जाबाली यांची कन्या होती। व्यासांचा पुत्र शुक हा शुकमुनी म्हणून पुढे प्रसिद्धीस आला। व्यासांनी पुराणसंहितेचे बीज त्याच्याकडेच दिले होते।शुकाला व्यासांनी ब्रह्मविद्या शिकवली।तसेच भागवत पुराण सांगितले।या शुकावर व्यासांचे निरतिशय प्रेम होते। व्यास स्वतः चिरंजीव होते। शुकाच्या देहावसानानंतर त्याला सदेह स्वर्गप्राप्ती झाली। परंतु अस्वस्थ होऊन व्यास त्याला शोधू लागले। व्यासांच्या संपूर्ण चरित्रात मानवी प्रेमाचा अनुबंध केवळ एवढ्याच एका प्रसंगात आढळतो। अन्यथा प्रज्ञा-प्रतिभा यांचेच ते धनी आहेत असे दिसते.त्यांची ही भग्नावस्था बघून वैदिक देवता रुद्राला त्यांची करुणा आली।पृथ्वीवर तुला शुकाची सावली सतत दिसत राहील, असा वर रुद्राने व्यासाला दिला। पद्मपुराणामध्ये पराशर यांनी व्यासांना चिरंजीवत्वाचे वरदान दिल्याचा उल्लेख आला आहे।
व्यासांच्या साहित्यकृती व वेद विषयक कार्य।
१, महाभारत –
अ) ऐतिहासिक – सांस्कृतिक ग्रंथ – महाभारत हे लिखित वाङ्मय आहे। जरी त्याचे पुरातत्वीय पुरावे आज मिळत नसले तरी हे व्यासांनी गणेशाकरवी लिहून घेतले असा आदिपर्वात त्याचा उल्लेख आहे। अर्थातच लेखनाचा हा अत्यंत प्राचीन असा पहिला उल्लेख आहे।
काळावर ठसा उमटवणारी अद्वितीय पात्रे व्यासांनी महाभारतात निर्माण केली। अत्यंत गुंतागुंतीच्या कथानकामध्ये अनेक स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखांची रेलचेल आणि अफाट विस्तार हे महाभारताचे वैशिष्ट्य आहे।
महाभारत सुरुवातीला जय या नावाने ओळखले जात असे। हा ग्रंथ 8000 श्लोकांचा होता। त्यानंतर व्यासांनी हा ग्रंथ वैशंपायन या शिष्याला दिला। त्याने तो ग्रंथ 24 हजार श्लोकांचा केला। नंतर त्याचा शिष्य सौती याने महाभारतात अनेक आध्यात्मिक, धार्मिक नीतिविषयक आयाम जोडून विश्वकोशा प्रमाणे एकलाख श्लोकांचा महान ग्रंथ सिद्ध केला। वैशंपायन आणि सौती हे दोघेही व्यासांचे समकालीन आहेत।त्यामुळे निर्माण झालेला हा ग्रंथ व्यासांच्या समक्ष त्यांच्या परवानगीनेच भर घालून सिद्ध झाला असला पाहिजे असा कयास करण्यास वाव आहे।
या कथांमध्ये केवळ कौरव-पांडवांचा,सूर्यवंशी राजांचा इतिहास नाही तर आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक मोठा पटच मांडलेला आहे। महाभारतातील शांतीपर्व जीवनातल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरते वनपर्वामध्ये काही आख्यान येतात,ऋषींच्या चर्चा येतात, ज्यामधून आपल्या प्रश्नांची उकल आपली आपल्यालाच होते।भारतीय तत्वज्ञानातील अमरग्रंथ “भगवद्गीता”हे ही महाभारताचे अपत्य आहे। महाभारतामध्ये विष्णुसहस्त्रनाम, गजेंद्रमोक्ष, अनुगीता, विदूरनिती यासारखी अनेक भक्ति व नीतीने भारलेली काव्ये आहेत।
महाभारत हे संस्कृत आणि इतर सर्व भाषांतील कवींसाठी महत्त्वपूर्ण उपजीव्य काव्य ठरले आहे। महाभारतातील आख्याने,उपकथानके यांचा आधार घेऊन कित्येक कवींनी आपल्या रचना सिद्ध केल्या। महाकवी कालिदासाचे शाकुंतल हे महाभारताच्या आदिपर्वातील शकुंतला आख्यान आहे तर सत्यवान सावित्रीची वटपौर्णिमेची कथा ही सावित्री उपाख्यानात वनपर्वात येते।श्रीहर्षाच्या नैषधीयचरित् चा आधार नलोपाख्यानातील नलदमयंतीच्या कथेमध्ये आढळतो। हरिवंशासारखे दैवी इतिहासाचे सुंदर असे पर्व परिशिष्ट (खिल)म्हणून महाभारताला जोडलेले आहे।
एकूणच महाभारत हे भारतीय साहित्य, संस्कृती, भारताच्या सामाजिक धारणा, भारतीय तत्वज्ञानाचे आदर्श,नैतिक आचार-व्यवहार राजकारण या सर्वच बाबींवर आणि एकूणच भारतीय परंपरांवर भाष्य करणारे अति प्राचीन साहित्य आहे.
आ) पंचमवेद – महाभारताला वेदांच्या बरोबरीने स्थान दिलेले आहे म्हणूनच त्याला पंचमवेद असे संबोधले जाते।महाभारतामधील अनेक प्रसंगांमधून विवेक शिकवला जातो।द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी दुर्योधन जेव्हा स्वतःच्या कृत्याचे समर्थन करीत असतो त्यावेळी तो वेदातील वचने उच्चारताना दाखवला आहे – “अन्ये जायां परिमृशंत्यस्य यस्यागृधद्वेदने वाज्यक्ष।” दुसऱ्याच्या धनाची आशा करणाऱ्या जुगाऱ्याच्या बायकोला, इतर जुगारी वस्त्र आणि केस धरून ओढतात आणि आई-वडील व भावंडे – “न जानीमोनयता बध्दमेतम्।।” हा कोण आम्हाला माहीत नाही असे म्हणतात। ही खरोखर वेदवचने आहेत। ही ऐकवून सभेला दुर्योधन गप्प करतो। सुदैवाने वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रोपदीचे लज्जारक्षण होते व पांडव दास्य मुक्त होतात। परंतु तरीही पुन्हा एकदा रस्त्यातच द्यूताचे आमंत्रण आल्यावर धर्मराज पून्हा खेळायला जातो आणि बारा वर्षांचा वनवास पांडवांच्या माथी मारला जातो।
त्यावेळी वनात भेटायला आलेला कृष्ण युधिष्ठीराला म्हणतो, “अरे वेदांमध्येच म्हटले आहे –
अक्ष: इमा दीव्या: कृषिमित् वित्ते रमस्व बहुमन्यामान:।।
तत्र गाव: कितव तत्र जाया तन्मे विचष्टे सवितायमर्य:।।
शत्रु बरोबर द्युत खेळू नको, श्रम कर त्यातूनच मिळालेले धन श्रेष्ठ। म्हणून आनंदित होऊन यातूनच गोधन आणि पत्नी मिळव,असे मला ईश्वर असलेल्या सवित्याने सांगितले आहे. हे तुला का आठवले नाही?” महाभारतातील अशा धर्तीवर असलेले संवाद हे त्यास पंचमवेद का म्हटले जाते हे सप्रमाण सिद्ध करतात।
2 )ब्रह्मसूत्रे – उपनिषद वाक्यांची मीमांसा ब्रह्मसूत्रांमध्ये केलेली आहे। यालाच वेदांतसूत्रे किंवा शारीरिकसूत्रे असेही नाव आहे। उपनिषद वाक्यांमध्ये समन्वय घडवणे हा ब्रह्मसूत्रांचा मुख्य हेतू.उपनिषद वाक्यांचे तात्पर्य सांगणे आणि त्यावर भाष्य करणे हे ब्रह्मसूत्रात केलेले आहे।आदी शंकराचार्यांचे अद्वैत वेदांत आणि त्याबरोबरच निरनिराळे आचार्य व त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेदांत तत्वज्ञान हे या ब्रह्मसूत्रावर आधारलेले असते।उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या तीन ग्रंथांना वेदांत विचारांची प्रस्थानत्रयी म्हटले जाते। म्हणजेच वेदांत दर्शना मध्ये जर काही प्रश्न पडले तर या उगमापाशी त्याचे उत्तर शोधण्याची पद्धत वेदांती आचार्यांची आहे।ही ब्रह्मविद्या व्यासांनी शुकाला सर्वप्रथम सांगितली।नंतर शुकमुनींनी त्याची संहिता तयार केली।
3)वेदांचे संकलन व विभाजन: वेदव्यास हे नाव ज्या कारणाने पडले ते सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे वेदांचे विभाजन होय।श्रुती हे मौखिक वाङ्मय आहे। ते कंठस्थ करून पिढी दर पिढी हस्तांतरित केले जात होते। या वेदांचे विविध गुरुकुलांतून संकलन करणे हे महत्कार्य व्यास महर्षी व त्यांच्या शिष्यांनी केले।नंतर मुख्य ऋग्वेदापासून वेदांच्या विषयवार तीन शाखा निर्माण केल्या। चौथी अथर्ववेद ही शाखा निर्माण केली।हे काम व्यासांनी अत्यंत साक्षेपाने केले। ऋग्वेदाचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असे विषयानुसार विभाजन केले। ऋग्वेद पैल नावाच्या शिष्याला ,यजुर्वेद वैशंपयानाला सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतुला दिला। अथर्ववेदामध्ये अभिचार आणि मंत्राचे सामर्थ्य, तसेच रोगासंबंधीचे उपचार आणि आयुर्वेद आहे।या चारही शिष्यांनी त्या-त्या वेदांचे आणखी उपवेद करून आपापल्या शिष्यांना वाटून दिले। अशाप्रकारे व्यासांनी वेदांचे संकलन व विभाजन करून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वेदांचे रक्षण केले।
उपसंहार
स्वतः व्यासांनीच महाभारताविषयी म्हटले होते की इथे आहे ते सर्वत्र आहे आणि इथे नाही ते कोठेही नाही। खरोखर अशा प्रकारचे साहित्य निर्माण करणे ,अठरा पुराणांची रचना ,व्याकरणाची रचना, वेदांचे विभाजन आणि त्याबरोबरच हरिवंश-भागवत यांसारख्या ग्रंथांचे बीजारोपण करून देणाऱ्या व्यासमहर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक वंदन।
डॉ.रमा दत्तात्रय गर्गे
कोल्हापूर.