“इयं धंमलिपी देवानंप्रियेन प्रियदसिना राजा लेखापिता”, अशी सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांची सुरवात आहे. या प्राकृत भाषेतील लेखाचा शब्दश: अर्थ असा आहे की, हा धार्मिक लेख देवांना प्रिय असणा-या प्रियदर्शी राजाने लिहवुन घेतला. यातील धंमलिपी हा शब्द अशोकाच्या लेखात ‘धार्मिकलेख’ या अर्थाने आलेला दिसतो. सम्राट अशोकाने असे चौदा लेख त्याच्या साम्राज्याच्या निरनिराळ्या भागात कोरवुन घेतलेले आहेत. वेगवेगळ्या प्रांताची बोलीभाषा व त्या त्या भागातील लिपी वेगवेगळी असल्याने त्याने आपले लेख वेगवेगळ्या लिपी व भाषेत कोरलेले दिसतात. या सर्व प्रांतातील लेख जरी वेगवेगळ्या भाषेत व वेगवेगळ्या लिपीत असले तरी या लेखांमधील मजकुर सारखाच आहे. जणु त्याने आपले आज्ञापत्र तयार करुन ते सर्वत्र लोकाच्या माहीतीसाठी कोरुन ठेवले आहेत. सम्राट अशोकाचे हे लेख ग्रीक, अरेमाईक, खरोष्टी, ब्राम्ही लिपीत व निरनिराळ्या स्थानिक भाषेत कोरलेले आढळतात.
धंमलिपी हा शब्द ब्राम्ही लिपीचे नाव आहे असा दावाकरुन काहीजण ब्राम्ही या नावाला विरोध करीत आहेत. जर धंमलिपी हा शब्द त्या लिपीच्या नाव म्हणुन आलेला असेल तर ग्रिक, अरेमाईक, खरोष्टी याही लेखांमधे धंमलिपी हा शब्द का बरे आला असेल? याचे उत्तर धंमलिपी समर्थक अभ्यासकांनी दिले पाहीजे.
आता या मंडळींचा असाही दावा आहे की पुरातत्वखात्यात असलेल्या काही विशिष्ट जातीच्या लोकांचा दबाव असल्यामुळे या लिपीला ब्राम्ही हे नाव दिले गेलेले आहे. पण मुळात या लिपीला ब्राह्मी हे नाव आजकालच्या जातिय भावनांनी प्रदुषित झालेल्या काळात दिलेले नसुन जवळ जवळ एका शतकापुर्वी ब्रिटीश काळातच दिलेले आहे. हे आपण लक्षात घेतले पाहीजे. या लिपीला ब्राम्ही हे नाव का दिले गेले याचा आपण येथे थोडक्यात आढावा घेऊ.
ब्रह्मा हा साक्षात लेखन विद्येचा नर्माता होता, अशी समजुत प्राचीन भारतात रुढ होती. ही माहीती सर्वप्रथम आपल्याला समवायांगसुत्र व पण्णावणासुत्र या इसवीसनपुर्व काळातील जैन ग्रंथांमधे आढळुन येते. हिच समजुत पुढे काही शतकांनी निर्माण झालेल्या पुराणग्रंथां मधुनही पहायला मिळते. प्रसिद्ध चीनी प्रवासी युआँन चाँग याने याच कल्पनेचा पाठपुरावा आपल्या बौद्ध ग्रंथांमधुन केलेला आढळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ भारतातुन तो अनेक संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत भाषांतर करुन तो आपल्या मायदेशी घेऊन गेला होता. जर या लिपीचे नाव धंमलिपी असते तर तसा उल्लेख त्याच्या ग्रंथात नक्कीच सापडला असता. फँ-वँन-शु-लिन या चीनी प्रवाश्याच्या बौद्ध ग्रंथातही ब्राह्मी लिपीच्या उत्पत्ती विषयक माहीती दिलेली असुन, ती डावीकडुन उजवीकडे लिहली जाते व तिचा निर्माता ब्रह्मा असल्याचे सांगितलेले आहे. ललितविस्तर या बौद्ध ग्रंथात बुद्धाच्या काळी चौसष्ट लिपी अस्तित्वात असल्याचे म्हटलेले आहे. त्यात ब्राह्मी, खरोष्टी, द्राविडी, पुसष्करसारी या लिपी अधिक महत्वाच्या आहेत. जैनांच्या नष्ट झालेल्या दृष्टीवाद या ग्रंथाचा काही भाग उपलब्ध असुन त्यात ब्राह्मी लिपीत चौसष्ट अक्षरे असल्याचे नमुद केले आहे. ब्राह्मी लिपी कशी निर्माण झाली या विषयी एकमत नसले तरी उपलब्ध असलेल्या सर्वच पुराव्यानुसार या लिपीला ब्राह्मी लिपी असे नाव दिले गेले आहे. या लिपीत केवळ सम्राट अशोकाचेच लेख उपलब्ध नसून इतरही अनेक राजांचे ब्राह्मी लेख उपलब्ध आहेत. यात अनेक संस्कृत लेखही आहेत. तेव्हा केवळ एका गटाच्या जातीय, धार्मिक, राजकीय अहंकारापाई शालेय इतिहासात बदल करणे चुकीचे आहे. संशोधकांनी या लिपीला ब्राह्मी लिपी का म्हटले याला निश्चितच पुरेसा आधार आहे. असे असताना ब्राह्मी लिपीचे नाव धंमलिपी असे करणे हे राजकीय हडेलहप्पीचे लक्षण आहे.
रणजित रमेश हिर्लेकर
मो.९४२३३०३६७०