ज्याने सदाचाराची शतकृत्ये करून, अनेक गुणांच्या उत्कर्षाच्या योगाने इतर राजे लोकांची कीर्ती आपल्या पायाच्या तळव्याने पुसून टाकली आहे – सज्जनांचा उत्कर्ष आणि दुर्जनांच्विया नाशाला कारणीभूत होणारा असा जो अचिंत्य पुरुष आहे – जो दयाळू असून ज्याचे मृदू अंतःकरण केवळ भक्ती व प्रणाम करून जिंकले जाते अशा त्याने लक्षावधी गाई दान दिल्या. || ओळ २५ ||
ज्याने आपल्या तीक्ष्ण आणि ओजस्वी बुद्धीने व गायन वादन कलेतील नैपुण्याने देवांचा गुरु (कश्यप), तुंबरू, नारद प्रभूतीना लाजविले – ज्याने विद्वान लोकांच्या उपजीविकेस साधनीभूत अशी अनेक काव्ये रचून कविराज ही पदवी सार्थ केली आहे त्याचे अद्भूत व उदार चरित्र चिरकाल स्तवन करण्यास योग्य आहे. || ओळ २७ ||
प्रयागराजपासून काही अंतरावर कौशंबी नावाचे एक स्थळ आहे. या कौशंबीला ‘समरशतावरणदक्ष’ (शेकडो रणांगणांमध्ये युद्ध करण्यात दक्ष) अशा सम्राट समुद्र्गुप्ताचा प्रशस्ती लेख आहे. त्यातील हा काही भाग! प्रशस्ती लेख म्हणजे तत्कालीन राज्यकर्त्यांच्या कामगिरीची स्तुती असणारे वर्णनपर लेख. हा प्रशस्ती लेख सम्राट समुद्रगुप्ताचा सेनापती हरिषेण याने कोरवून घेतला आहे.
मौर्य साम्राज्यानंतर पुन्हा जवळपास संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित करणारा गुप्त घराण्याचा राजा समुद्रगुप्त अमर आहे.
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये श्रींगुप्तने गुप्त घराण्याची स्थापना केली आणि त्यानंतर काही काळाने समुद्रगुप्त गादीवर आला. त्याने आपल्या अजोड सामर्थ्याने प्राचीन भारताचे वैभव कळसाला पोहचवले. समुद्रगुप्त हा दिग्विजयी राजा होता. उत्तरेकडील राज्यांना त्याने आपल्या छत्राखाली आणले आणि दक्षिण दिग्विजय ही प्राप्त केला. गुप्त राजांनी ‘महाराजाधिराज’ असे भारदस्त बिरूद स्वीकारले होते आणि समुद्रगुप्ताने या बिरुदाचे ऐश्वर्य अधिक केले.
समुद्रगुप्ताचे व्यक्तिमत्व अनेक पैलूनी सुशोभित होते. त्याने वैदिक परंपरा पुनरुज्जीवित केली. आणि अनेक वर्षे विस्मरणात गेलेला अश्वमेध यज्ञ केला. “चिरोत्सन्नाश्वमेधकर्ता” (दीर्घकाल प्रचारात नसलेला अश्वमेध यज्ञ करणारा) असा त्याचा उल्लेख आढळतो. उत्कृष्ट प्रशासक तर तो होताच पण त्याबरोबरच तो अतिशय धार्मिक आणि दानशूर राजा होता. “परमदैवत” असे विशेषण त्याच्या नाण्यांवर कोरलेले दिसून येते. अद्वितीय शस्त्र आणि राज्यसामर्थ्याच्या बरोबरीने तो प्रतिभावंत कवी आणि संगीतज्ञ होता.
समुद्रागुप्ताच्या कारकिर्दीमध्ये सोन्याची नाणी प्रचलित होती. नाण्यांसाठीं वापरलेल्या धातुवरून आणि घडणीवरून तत्कालीन राज्याची अवस्था समजते. सुवर्ण मुद्रांचा राज्यव्यवस्थेमधील उपयोग त्या राजाचे आणि राज्याचे वैभव दर्शवितो. समुद्रगुप्ताच्या काळात भारतभूमीवर सुवर्णयुग अवतरले होते. विलक्षण लष्करी ताकद, कला, साहित्य, स्थापत्य, शास्त्र यांचा चहू अंगांनी विकास, सर्व धर्मांना उदार आश्रय या सगळ्यांचा संगम गुप्त साम्राज्यात झाला होता.
व्हिन्सेंट स्मिथ हा इतिहासकार सम्राट समुद्रगुप्ताला भारतीय नेपोलियन म्हणतो. पण हे पूर्ण सत्य नाही. कारण नेपोलियनला पराभूत आणि दारुण अवस्थेत मरण आले पण समुद्र्गुप्त मात्र अखेरपर्यंत चक्रवर्ती आणि सम्राटच राहिला. त्याने त्याच्या अतुल सामर्थ्याने विस्तारलेले साम्राज्य चारशे वर्ष टिकले.
तत्कालीन सुवर्ण मुद्रांवर ‘पृथ्वी व स्वर्ग जिंकणारा’ हा समुद्रगुप्तचा गौरव यथार्थ आहे.
– विनिता हिरेमठ