दुसरा नमस्कार अग्नीला! नव्हे नव्हे अग्नी देवतेला. हो देवताच ती. पंचमहाभूतांपैकी एक. सर्वत्र चैतन्यरूपात वावरत असलेली देवता. सर्व प्राणांचा आधार असलेली देवता.
सूर्य देखिल एक अग्निगोलच. दैदिप्यमान. गतियुक्त. गती एवढी की संपूर्ण सूर्यमाला स्वतःभोवती फिरवतो. बदल्यात सगळ्या ग्रहांना स्थैर्य आणि ऊब देतो. क्रोधित अग्नी ‘दाह’ देतो तर मायाळू अग्नी ‘ऊब’ देतो. ऊर्जा देतो. सर्व सजीवांचा कारक असा सूर्य.
निपचित पडलेल्या रुग्णाचा ताप पाहून “अजून धुगधुगी (धग) आहे” असे वैद्य म्हणतात. तेच प्राण गेल्यावर सगळं शरीर थंडगार पडते. तेंव्हा “प्राण गेला”, किंवा “प्राणज्योत मालवली” … असे म्हणतात. म्हणूनच भगवंत गीतेत सांगतात – प्राणासह असलेल्या देहाच्या आश्रयाने मी अग्नीरूपाने रहातो असे भगवंत सांगतात – अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम् आश्रितः हाच तो जठराग्नी! मानवाचा आदि ग्रंथ आहे ऋग्वेद. त्या ऋग्चावेदाचा प्रथम हुंकार अग्नीला नमन करतांना म्हणतो – अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम ||
वैश्वानर, अग्नी, हुताशन, वडवानल, क्रव्याद मंत्राग्नी, वन्ही, पवमान, पावक, जातवेद, अशी अग्नीची किती नावे! ही नावे कशी आली? या वेगवेगळ्या अग्नींचे कार्य काय? तर, प्रत्येक संस्कारानुसार अग्नीला वेगवेगळे नाव प्राप्त झाले आहे –
- गर्भधारणेच्या वेळी केला जाणारा संस्कार, गर्भाधान – मारुत
- गर्भिणीच्या ३ऱ्या महिन्यातील संस्कार, पुंसवन – चंद्रमा
- शुभ शकुनासाठी केलेला होम, शsगण – शोभन
- गर्भिणीच्या आठव्या महिन्यातील संस्कार, सीमन्त – मंगल
- बाळ जन्मताच केला जाणारा संस्कार, जात कर्म – प्रगल्भ
- बाळाचे नाव ठेवताना करण्याचा संस्कार, नामकरण – पार्थिव
- बाळाला पहिले अन्न भरवितानाचा संस्कार, अन्नप्राशन – शुचि
- जावळ काढताना करण्याचा संस्कार, चूडाकर्म – सत्य
- बाळास गुरुकुलात पाठविण्याचा संस्कार, व्रतबंध – समुद्भव
- गायीचे दान देतानाचे हवन, गोदान – सूर्य
- शिक्षण पूर्ण करून गुरुकुलातून परतताना, समावर्त्तन केशान्त – विसर्ग
- सूर्योदयी व सूर्यास्तास हवन करताना, अग्निहोत्र – वैश्वानर
- सप्तपदी, लाजाहोम, या विवाह प्रयोगात, विवाह – योजक
- गणेश पूजन यागात, चतुर्थी – शिखी
- व्रत धारण करताना, धृती – अग्नि
- चुकुन झालेल्या प्रमादाचे निराकरण हेतु, प्रायश्चित्त महाव्याहृत होम – विधु
- पाक सिद्धी साठी, चूल पेटविताना, पाक यज्ञ – साहस
- हवनाची लक्ष आवर्तने, लक्षहोम – वन्हि
- हवनाची कोटी आवर्तने, कोटिहोम – हुताशन
- यागाची सांगता, पूर्णाहुती – मृड
- दुष्ट योग निवारणार्थ, शांती – वरद
- आरोग्य प्राप्ती साठी, पौष्टिक – बलद
- तंत्रविद्येत वापर करताना, अभिचारक – क्रोधाग्नि
- विशिष्ट व्यक्तिच्या अनुग्रहासाठी, वशीकरण – शमन
- वरप्राप्तीसाठी, उदा. पुत्रकामेष्टी. वरदान – अभिदूषक
- नित्य आहार पचनासाठी, कोष्ठ – जठराग्नि
- चिता पेटविताना, मृत भक्षण – क्रव्याद
जन्मापासून, किंबहुना जन्माच्या आधीपासून मृत्यू पर्यंत मानव अग्नीशी जोडलेला आहे. दिवसाची सुरुवात अग्नीच्या सोबत होते. स्वयंपाक पण त्याच्या सहाय्याने होतो – चूल, शेगडी, गॕस स्टोव्ह, हॉट प्लेट, मायक्रो वेव्ह किंवा सौर हि सर्व अग्निचीच रूपे. सातजन्म सोबत रहाण्याच्या आणाभाका घ्यायच्या त्या याच्याच साक्षीने. यालाच प्रदक्षिणा घालून. येथे तो ‘योजक’ रूपात. वास्तूशांती असो वा एखादा अनुष्ठान यज्ञ, कुंडात यालाच स्थापित करून विनंती करायची, बाबारे, हे जातवेदा, आम्ही अर्पण केलेला नैवेद्य (हविर्भाग) ईश्वरा पर्यंत पोहोचव. आमच्या घरी येण्याची, रहाण्याची, त्या ईश्वराला विनंती कर, ऐकेल तो तुझं.
जरा कुठे शरीर अकडले कि यालाच बोलवायचे शेक बनून. आठवडाभर आराधना केली कि ही अग्नीची स्वारी प्रसन्न होऊन आपल्याला व्याधीमुक्त करते! आज सर्वत्र अनिवार्य असलेली, जगताचा प्राण बनलेली वीज ही हाच निर्माण करणार औष्णिक विजेच्या रुपाने. आपल्या देशाचे संरक्षण करण्याचे काम जे क्षेपणास्त्र करतात, शत्रूच्या उरात धडकी भरवतात तो सुद्धा अग्निचाच प्रकार. म्हणून एका क्षेपणास्त्राचे नाव देखील ‘अग्नी’ ठेवले आहे. देहांतानंतर होणारा संस्कारही चितेवर होणार अग्निसंस्काराच्या रूपाने. सर्व अमंगल, दुषित, दुर्गंधी, जंतुपूरित, अशा अलक्ष्मीला ‘मुक्ती’ देणारा हाच अग्नी दाहिकेच्या रूपात. अमंगलाला पावन करणारा, म्हणून ‘पावक’. आपल्याला निरामय आयुष्य देणारा.
अशा अग्नीला देव मानले गेले. घरोघरी बाळ बोबडे बोबडे बोलायला शिकले की तेव्हा पासूनच त्याला अग्नीच्या रूपाला, दिव्याला, नमन करायला शिकविले जाते.
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते ॥१॥
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥२॥
अशी अग्नीची किती महती सांगावी? म्हणून नमस्कार करूयात …
द्वितियो मे नमस्कारः जातवेदसे देवाय प्राणिनाः पावकाय ||
– सौ. सुषमा कुळकर्णी
छान माहिती. लेख आवडला.