इ.स. पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि भारतातील राजकीय चित्र बदलू लागले. मौर्य घराण्याच्या स्थापनेच्या आधी भारतातील राजकीय घटना आणि प्रसंग या जनपदे आणि महाजनपदे यांच्या पार्श्वभूमीवरच होत असत. परंतु चंद्रगुप्ताने नंद घराण्यावर विजय मिळवला. तसेच अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकसला तह करण्यास भाग पाडले व गांधार प्रांत आपल्या राज्यात समाविष्ठ केला. या दोन घटनांनी चंद्रगुप्ताचे वर्चस्व संपूर्ण भारतात स्थापित झाले. चाणक्याने आखून दिलेल्या शासनव्यवस्थेद्वारे मौर्य साम्राज्य हे केवळ मगध महाजनपदापुरते मर्यादित न राहता वाढू लागले.
हे मौर्य साम्राज्य वर्धिष्णू केले ते चक्रवर्ती सम्राट अशोकाने. जगातील श्रेष्ठतम राजा असणारा सम्राट अशोक अतिशय लढवय्या आणि कुशल शासक होता. मौर्य साम्राज्याचा विस्तार आणि उत्कर्ष अशोकाच्या कारकिर्दीत झाला. अफगाणिस्तान ते ओरिसा आणि दक्षिणेत म्हैसूर पर्यंत मौर्य साम्राज्य पसरले होते. अशोकाने वाढवलेल्या या साम्राज्याच्या सीमांना प्रबळ पुरावा आहे तो शिलालेखांचा.
प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणे हे तसे किचकट आणि वेळखाऊ काम! कारण इतिहासाचा अभ्यास हा केवळ लोककथा, परंपरा यावर आधारित ठेवता येत नाही तर त्यासाठी इतिहासाच्या पाऊलखुणा शोधाव्या लागतात. आणि या पाऊलखुणा अनेक साधनांमधून सापडतात. शिलालेख, मुद्रा, भूर्जपत्रे, ताम्रपट अशा अनेक साधनांमधून इतिहास डोकावत राहतो. या सर्व साधनांचा अभ्यास करून त्याची सुसंगत मांडणी हा एक संशोधनाचा विषय आहे. हे संशोधन पुराभिलेखाविद्या (Epigraphy) या विषयांतर्गत केले जाते.
इ. स. १८८२ मध्ये जेम्स टॉड या ब्रिटिश अधिकाऱ्याने गिरनारला भेट दिली तेंव्हा त्याला काही शिलालेख आढळले. आणि या शिलालेखांचा अभ्यास सुरु झाला. ब्राह्मी लिपीमध्ये असणारे हे शिलालेख सर्वप्रथम वाचले ते जॉन प्रिंसेप याने. या अभ्यासाबरोबरच प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेचा एक नवीन पैलू समोर आला.
गिरनार येथे मिळालेला हा शिलालेख सम्राट अशोकाचा आहे. भारतातील इतिहासाचा सर्वप्रथम लिखित पुरावा गिरनारचा हा शिलालेख आहे. सम्राट अशोकाचे असे साधारणपणे ४० शिलालेख आहेत जे भारताच्या चारही दिशांना सापडतात. त्यामुळे अशोकाचा राज्यविस्तार समजण्यास मदत होते. अशोकाचे बहुतेक शिलालेख हे त्याच्या राजाज्ञा आहेत. या राजाज्ञा जनतेपर्यंत सहज पोहोचाव्यात म्हणून अशोकाने हे शिलालेख लोकवस्तीजवळ, व्यापारी मार्गांवर, तीर्थस्थानांवर कोरवले होते. सम्राट अशोकाचे शिलालेख हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
‘देवांनां प्रिय’ अशा विशेषणाने सम्राट आपल्या राजाज्ञेची सुरुवात करतो. आणि अनेक लोकोपयोगी आज्ञा देतो. ज्यामध्ये वैद्यकीय सेवा, वृक्षारोपण, पाणीपुरवठा अशा विषयांचा समावेश आहे. कोणत्याही प्राण्याचा वध करू नये अशीही आज्ञा आहे. तर पूर्वी राजाच्या पाकशाळेत (kitchen ) सार (soup) करण्यासाठी अनेक प्राणी मारले जात. पण हा धर्मलेख लिहिल्यानंतर अशोकाने सार करण्यासाठी केवळ तीनच प्राणी मारले जावेत असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर भविष्यकाळात कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये अशीही आज्ञा तो देतो. अहिंसा पालनाचे धोरण त्याने स्वतःपासून सुरु केले होते याचा हा पुरावा आहे.
सम्राट अशोकाने कलिंग (ओरिसा) युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि नंतर स्वतःहून कोणतेही युद्ध केले नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अहिंसेचा स्वीकार केल्यानंतरही त्याने आपले सैन्य कायम ठेवले आणि राज्याच्या सीमा सुरक्षित आणि भक्कम केल्या. त्याने अहिंसेचे पालन केले असले तरी त्याचा अतिरेक केला नाही. आपले साम्राज्य बलशाली ठेवण्यासाठी तो कायम शस्त्रसज्ज राहिला.
पण अशोकाच्या मृत्यूनंतर त्याचा वारसांना हे राज्य टिकवता आले नाही. अशोकानंतर केवळ पन्नास वर्षांतच चाणक्याच्या कूटनीतीने भक्कम पायावर उभे असणारे, चंद्रगुप्तच्या पराक्रमाने विस्तारलेले आणि अशोकाच्या धर्म विजयाने बलाढ्य झालेले साम्राज्य लयाला गेले.
– विनिता हिरेमठ
Yes it’s quite true.
But due to the extremity of ahinsa the bhartiya ksatratej got substantially reduced and then everybody ruled us and still it continues in one or the other form ………..
Please read a book namely ” Ashoka to Kalidas “written by G.S.Karndikar
सद्गुणातीरेक!!