सप्तसिंधूच्या प्रदेशात वैदिक संस्कृती वाढली, बहरली. या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य होते यज्ञयाग. वेदकालात यज्ञ संस्था हा समाजाचा अविभाज्य घटक झाला होता. विविध प्रकारचे यज्ञ करून आणि बळी अर्पण करून वैदिक देवतांना प्रसन्न करणे आणि त्यायोगे आपले जीवन सुखकर बनवणे हा यज्ञाचा मुख्य उद्देश असे. सामान्य जनांपासून ते शासनकर्त्यांपर्यंत या यज्ञ संस्थेचे महत्व होते.
यज्ञ संस्था रुजण्यासाठी वेदांचा मोठाच आधार होता. पण हळूहळू त्यातील कर्मकांडाच्या अतिरेकामुळे सामान्यांना आचरणात आणणे कठीण होऊ लागला होता. त्यातूनच वेदांचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या उपनिषदांची निर्मिती झाली. वेदांचे निर्णायक अगदी शेवटचे तत्वज्ञान म्हणून उपनिषदे ओळखली जातात. या उपनिषदांनी यज्ञातील कर्मकांडे सोडून ज्ञानकांड निर्माण केले, पण उपनिषदांनी यज्ञाला समांतर व्यवस्था निर्माण केली नाही.
पण नंतरच्या काळात वेद आणि यज्ञ संस्थेला समांतर अशी विचारधारा निर्माण झाली. इ.स.पूर्व सहावे शतक हे अशा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरले. तिकडे इराणमध्ये झरतृष्ट्राने एका नवीन धर्माची पारशी धर्माची स्थापना केेली. तर भारतामध्ये याच काळात जैन आणि बौद्ध धर्म उदयाला आले.
भगवान महावीर आणि गौतम बुद्धाने यज्ञ संस्थेतील कर्मकांडाना आव्हान देणारे नवीन धर्म स्थापन केले. समजण्यास आणि आचणारण्यास अतिशय सोपी तत्वे या धर्मांनी दिली. यज्ञयाग आणि कर्मकांडात अडकलेल्या सामान्य जनांना ही तत्वे अतिशय जवळची वाटू लागली. भगवान महावीर आणि गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनांतून समाजातील कर्मकांडांचा फोलपणा दाखवून दिला. जैन आणि बौद्ध धर्मांनी वेदप्रामाण्य नाकारले. आणि ईश्वरप्राप्तीची सोपी तत्वे सामान्यांना दिली. या दोन्ही धर्मांनी ‘अहिंसा’ हे तत्त्व भारतीय मनावर बिंबवले. प्राण्यांना मारू नये – ना यज्ञासाठी, ना शिकारीसाठी, ना खाण्यासाठी हे शिकवले. या पैकी बौद्धधर्माचा प्रसार केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. बौद्ध धर्माने जवळपास अर्धे जग पादाक्रांत केले होते.
धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकांना पूरक असतात आणि त्या असायलाही हव्यात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार. धर्माला राजाश्रय असेल तर धर्माचे स्थान अधिक बळकट होते. मगध साम्राज्याच्या सम्राट अशोकाने हे दाखवून दिले होते. सम्राट अशोकाच्या राज्यविस्ताराबरोबरच बौद्ध धर्मही भारत आणि भारताबाहेरील देशात संचार करत होता. बौद्ध धर्मातील सहज तत्वज्ञानाने आणि बौद्ध भिक्षूंच्या रसाळ वाणीने काही काळातच सामान्य जनतेला या धर्माने आपलेसे केले.
जैन धर्माचा त्या मानाने प्रसार मर्यादित झाला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असणारे तत्वज्ञान आचरणात आणण्यास काहीसे अवघड होते. आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे या धर्माला बौद्ध धर्माइतका सशक्त राजाश्रय मिळाला नाही. चक्रवर्ती अशोकाच्या छत्र छायेखाली ज्याप्रमाणे बौद्ध धर्माला अधिष्ठान मिळाले तसें जैन धर्माच्या बाबतीत घडले नाही. परिणामी जैन धर्मप्रसार हा मर्यादित राहिला. बौद्ध धर्माने धर्म आणि राज्यव्यवस्थेच्या उत्तम समन्वयाचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवले.
– विनिता हिरेमठ
Dear all
Please read books on jyotirvinyan of Lokmanya tilak you will come to now much about “Arya ”
Aryanswere only bhartiya / Hindus only has been established very well in these books of Lokmanya.
Thank you Mohan ji. Yes indeed, ‘Arya’ does not mean race as implicated earlier. It is more about qualities of a person.