प्र या महिम्ना महिनासु चेकितेद्युम्नेभिरन्या अपसामपस्तमा।रथ इव बृहति विभवने कृतपस्तुत्याचिकितुषा सरस्वती।।
ऋग्वेदामधल्या ६व्या मंडलातील ही ऋचा आहे. सिंधू संस्कृतीचा शोध घेताना केवळ प्रातःस्मरणात असणारी आणि वेदांमध्ये उल्लेख असणारी एवढीच सरस्वती नदीची ओळख होती. पण जसजसा या शोधाला आकार येऊ लागला तसेतसे सरस्वती नदीचे अमूर्त रूप साकार झाले. सरस्वती नदी प्रत्यक्षात होती. आणि सिंधू संस्कृतीमधली ती एक प्रमुख जीवनदायिनी होती. प्राचीन भारतीय संस्कृतीला आकार देणाऱ्या सरस्वती नदीचे वर्णन किंवा सूक्ते हे वेदांमध्ये संख्येने सिंधू नदीपेक्षाही जास्त आहेत. ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीची तीन सूक्ते गायिली आहेत. त्याशिवाय वेदांमध्ये इतरत्र ही तिचे उल्लेख मिळतात. अत्यंत वेगवान असणारी ही नदी सिंधू संस्कृतीचे आभूषण होती. नदीतमे, अंबितमे, देवितमे असे तिचे वर्णन वेदांमध्ये येते.
सिंधू आणि सरस्वतीच्या काठांवर बहरलेली ही संस्कृती नष्ट कशी झाली हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. या संदर्भात काही गृहीतके (Theories) मांडली आहेत. त्यातले एक गृहीतक (Theory) आहे भूकंप. आणिक आहे काही नद्या कोरड्या पडल्या. तर काहींचे मत आहे पर्यावरणातील बदल.
भूकंपच्या गृहीतकानुसार, मोहेंजोदारोच्या नाशास भूकंप कारणीभूत ठरला. या भूकंपामुळे सिंधू नदीचे पात्र उंचावले गेले आणि नदीचा प्रवाह समुद्राकडे न जाता माघारी वळला त्यामुळे नदीकाठावरील वसाहतींना मिळणारा सुपीक गाळ आणि पाण्याचा अव्याहत प्रवाह मिळेनासा झाला. तर नदीच्या वरच्या भागात वारंवार पूर येऊ लागले. त्यामुळे मोहेंजोदारो आणि आसपासच्या प्रदेशाला धोका निर्माण झाला. तेथे एकानंतर एक झालेल्या एकूण सात वसाहतींपैकी शेवटच्या कालखंडातील घरे उंच ओट्यावर बांधलेली दिसतात. आणि त्यांच्या रचनेमध्ये सुसूत्रता नाही. जागा सापडेल तिथे ही घरे बांधलेली दिसतात. वारंवार येणाऱ्या या पुराच्या धोक्यामुळे मोहेंजोदारो नगर ओसाड झाले. आणि तेथील नागरी संस्कृतीच्या अंताचा प्रवास सुरु झाला.
कालीबंगन (राजस्थान) हे हडप्पा संस्कृतीमधले एक मोठे शहर होते. ते सरस्वती नदीच्या काठी वसलेले होते. सरस्वती नदीचे पात्र जसे शुष्क होत गेले तसे कालीबंगन शहर ही संपत गेले.
हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावणारी सरस्वती आपल्या खळाळत्या आणि घनगंभीर प्रवाहाने वहात भूमी सुफलाम करीत अरबी समुद्राला मिळत असे. सिंधू नदीला समांतर वाहणाऱ्या या नदीचे पात्र तब्बल २२ किमी रुंद होते. हवामानात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सरस्वती आणि दृशद्वती नद्या कोरड्या पडू लागल्या. त्यामुळे या नद्यांच्या सानिध्यातील नागरिकांना स्थलांतर करावे लागले.
हा पर्यावरणीय बदल केवळ भारतात घडून येत नव्हता तर पश्चिम आशियातही अशीच परिस्थिती होती. त्याच कालखंडात इजिप्तमध्येही वारंवार दुष्काळ पडत असे. तर युरोपमध्ये हिमयुगासारखी थंडी पडू लागली होती. निसर्गचक्रातील या बदलांमुळे सरस्वती नदी शुष्क होऊन लुप्त झाली आणि परिणामी तिचे लुप्त होणे हडप्पा संस्कृतीच्या अंतास कारण ठरले.
उपग्रहाद्वारे आणि पाण्याचे पृथक्करण करून कार्बन १४ पद्धतीने केलेल्या चाचणीप्रमाणे सरस्वतीचे वय सुमारे ८००० वर्षे निश्चित झाले. या नदीने स्वतः चे पात्र बदलले असावे आणि ती राजस्थान, सिंध प्रांत किंवा कच्छच्या रणातून समुद्राला मिळाली असावी. प्राचीन काळी तिचा प्रवाह १७०० किमी चा असावा. सिंधू सरस्वती संस्कृतीच्या अंताचे हे एक गृहीतक.
या शिवाय काहींनी युद्ध किंवा परकीय आक्रमण असेही काही मांडले. त्या बद्दल पुढच्या भागात.
– विनिता हिरेमठ