सकाळची वेळ आहे. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं अयोध्येच्या दशरथ राजाचा महाल उजळून टाकताहेत. दास दासींची रोजची लगबग चालू आहे. प्रौढ राजाची तीन नवतरुण, तजेलदार मुलं उत्साहाने आपापल्या कार्याला लागली आहेत. त्यांची दिनचर्या चालू झाली आहे, त्यांच्या वावरण्यात तारुण्याची ऊर्जा दिसतेय.
तिकडे दुसऱ्या महालात दशरथाचा मोठा मुलगा राम मात्र म्लान मुखाने आपली सकाळची आन्हिके उरकतोय. तारुण्यसुलभ तेज कुठेतरी हरवलं आहे. चेहरा चिंतामग्न आहे आणि देहबोलीतून नैराश्य दिसून येतंय. सर्व सुखं पायाशी लोळण घेताहेत, त्याला शरीराच्या सुदृढपणाची साथ आहे, इंद्राशी तुलना होईल इतकं सुंदर रूप आहे. पण तरीही मुखकमल उतरलेलं आहे.
काही दिवसांपूर्वी राम संपूर्ण भारतवर्षात देशाटन करून आला आहे. एकीकडे भोगविलास, ऐश्वर्य, सुखसंपत्ती आणि दुसरीकडे सांसारिक बद्धता, त्यातून येणारं असमाधान, शरीराचं क्षणभंगुरुत्व, रोगराई, दुःख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मृत्यू! रामाला जीवनाची निरर्थकता डाचतेय. ‘कस्त्वम्, कोहं, कुत आयात:, का मे जननी, को मे तात:!” हा प्रश्न त्याला भेडसावतोय. आयुष्याची क्षणभंगुरता त्याच्या विचारांमध्ये घर करून राहतेय. आणि परिणाम म्हणून राम एकटाच आपल्याच विश्वात गढून गेलाय. राज्यकारभार त्याला नकोसा झालाय, आयुष्य निरस वाटायला लागलं आहे. आणि ते सर्व भाव चेहऱ्यावर फारसे प्रयत्न न करता उमटले आहेत. दशरथादी ज्येष्ठांना त्याची काळजी वाटू लागली आहे.
तर दुसरीकडे रामाच्या आणि त्याच्या भावंडांच्या पराक्रमाची कीर्ती ऐकून विश्वामित्र दशरथाकडे “ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा!” हे मागणं घेऊन आलेत. त्यांच्या वैदिक कर्मांमध्ये, यज्ञात अडथळे आणणाऱ्या राक्षसांचा विनाश करण्यासाठी त्यांना पराक्रमी रामाची आवश्यकता आहे. कष्टी दशरथाने त्यांना रामाची, त्याच्या व्यवहाराची सर्व व्यथा कथन केली आहे. विश्वामित्रही काहीसे चिंतीत झाले आहेत.
ऋषी वसिष्ठ हे रघुकुलाचे राजगुरू आहेत आणि गुरूशिवाय ह्यातून मुक्तता नाही, रामाचं मतपरिवर्तन नाही, हे विश्वामित्रांनी जाणलं आहे. त्यांनी वसिष्ठांना रामाला योग्य मार्ग दाखवायची विनंती केली आहे. वसिष्ठांनीही ती मान्य केलीय.
आज्ञाधारी आणि गुरुजनांचा मान ठेवणारा राम वसिष्ठांना भेटला आहे. आपल्या शंका कुशंका रामाने गुरूंसमोर मांडल्या आहेत. रामाची मनःस्थिती त्यांनी जाणली आहे. रामाला जाणवलेली आयुष्याची निरर्थकता त्यांनी मान्य केली आहे. गुरुशिष्यांमध्ये संवाद सुरू झालाय. नैराश्य आणि वैराग्य ह्यातला फरक रामाला समजावून सांगायची जबाबदारी वसिष्ठ मुनींवर आहे. असामान्य प्रतिभेच्या, बुद्धीच्या रामाने सगळं काही आत्मसात केलं आहेच, तो ज्ञानी आहेच. गरज आहे ती त्याच्या कल्पनांना दूर सारायची, अज्ञानाचं आवरण दूर करायची.
हेच ब्रह्मज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं. मात्र ते अर्जुनाला आयुष्याच्या उत्तरार्धात युद्धभूमीवर मिळालं. त्याचा वापरही युद्धभूमीपुरताच झाला. रामाला मात्र हे ज्ञान वसिष्ठांकडून त्याच्या ऐन तारुण्याच्या वेशीवर मिळालं. आणि रामाने ते आयुष्यभर आचरणात आणलं. त्यामुळे राज्याभिषेकाच्या वेळी आणि त्याउलट परिस्थितीत वनगमनाच्या वेळीही तो विचलित झाला नाही.
निवृत्तीकडून ज्ञानपूर्ण प्रवृत्तीकडे नेणारा गुरू वसिष्ठ आणि श्रीराम ह्यांच्यातला हा संवाद ‘योग वसिष्ठ’ नावाच्या ग्रंथात आहे.
वसिष्ठांकडून झालेल्या ज्ञानप्राप्तीनंतर श्रीरामाने पुन्हा आपलं धनुष्य उचललं आणि विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्षणासाठी सरसावला. वसिष्ठांनी दिलेलं ज्ञान रामाने विश्वामित्रांकडे आचरणात आणलं.
भारतीय संस्कृतीत असलेल्या गुरुशिष्यांच्या थोर परंपरेत हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या अतिप्रचंड पराक्रमाने आणि असामान्य वागणुकीने परमेश्वर तत्वाला पोहोचलेल्या रामालादेखील गुरुशिवाय पर्याय नाही. रामाचं देवत्व मान्य केलं तर उच्च पातळीवर असलेल्या दैवी अवताराने ब्रह्मज्ञानी असलेल्या वसिष्ठांकडून ज्ञान प्राप्त करावे, हेही ह्या परंपरेच्या श्रेष्ठत्वाचे द्योतक आहे. आणि रामाला असामान्य मानवाचा दर्जा दिला तर नैराश्य आणि त्यातून मुक्तता होऊन पराक्रमसिद्ध होणं, ह्याचं उदाहरण श्रीरामाने सामान्य लोकांसमोर ठेवलं. ‘नर जब करणी करे नर का नारायण होय’ ही उक्ती श्रीरामाने आपल्या कर्मप्रवण आचरणाद्वारे सिध्द केली.
कर्मत्याग करून केवळ स्वतःचा उद्धार न करता समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी आवश्यक असलेली कर्मे ब्रह्मबुद्धीने करून तो ब्रह्मरूप झाला.
प्रभू रामाच्या जीवनाचा प्रत्येक पैलू अनुकरणीय आहे. त्याच्या रूपात प्रत्यक्ष जगदीश विष्णूंनी अवतार घेतल्याबद्दल त्या जगदीशाचा गौरव फार छान शब्दात केला आहे.
वितरसी दिक्षुरणी दिग्पती कमनीयं,
दशमुखमौलीबलीम् रमणीयम्
केशवधृतरामशरीर जय जगदीश
हरे केशव जय जगदीश हरे!
सारंग लेले, आगाशी
सुंदर..👌👌