आसाम. पूर्वोत्तर भागातलं भारताचं एक महत्त्वाचं राज्य. गेल्या पंधरा वीस दिवसात आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. आसाम म्हंटल्यावर जाहिरातीत दिसणारे चहाचे मळे पटकन डोळ्यासमोर येतात. तरीही देशाचा पूर्वोत्तर भाग हा आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी एक अनभिज्ञ प्रदेश आहे. तिथल्याच आसाममध्ये आलेल्या पुराबद्दल, पुराच्या कारणांबद्दल आणि ब्रह्मपुत्रा नदीबद्दल, हे थोडंसं.
गेले पंधरा वीस दिवस आसाममध्ये पुराने शब्दशः थैमान मांडलं आहे. चाळीस लाखाहून अधिक लोकं ह्या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. ही संख्या शेजारच्या कोलकाता शहराच्या लोकसंख्येएवढी किंवा महाराष्ट्रातल्या पुण्याच्या इतकी आहे. शिवाय १ लाखापेक्षा जास्त लोकांना पुरात आपलं छप्पर गमवावे लागलं असून सरकारने त्यांना तात्पुरत्या निवासस्थानी हलवलं आहे.
हिमालयाच्या दक्षिण पायथ्याशी वसलेल्या आसाम राज्याचं एकूण क्षेत्रफळ ७८ हजार स्क्वे. किलोमीटर आहे. उत्तरेला भूतान आणि दक्षिणेला बांगलादेश ह्या दोन आंतरराष्ट्रीय सीमा आसामकडे आहेत. एकूण लोकसंख्या साडेतीन कोटींच्या आसपास. म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या १२ ते १५% लोक आत्ताच्या क्षणाला पुराच्या पाण्यात आहेत. देशाच्या एकूण उत्पनात आसामचा वाटा १७व्या क्रमांकावर आहे. लोकांच्या कमाईचं प्रमुख साधन शेती आणि उत्पादन तांदूळ, ज्यूट, ऊसशेती आणि चहाचे मळे. नाही म्हणायला आशियातली जमिनीवरची पहिली तेलाची विहीर आसाममध्ये खोदली गेली पण तेल आणि नैसर्गिक वायू ह्याक्षेत्राशी संबंधित स्थानिक लोकसंख्या कमीच.
ब्रह्मपुत्रा आणि बराक ह्या आसाममधल्या दोन प्रमुख नद्या. त्याव्यतिरिक्त इतर काही उपनद्यासुद्धा आसाममधून वाहतात किंवा ह्या दोन नद्यांना येऊन मिळतात.
ब्रह्मपुत्रा ही नदी हिमालयात तिबेटमध्ये उगम पावते. तिथून थेट दक्षिणेला न येता पूर्वेकडे जाते आणि पूर्वेकडून अरुणाचल प्रदेशातून भारतात तिचा प्रवेश होतो. खरंतर ह्या नदीचं नाव ब्रह्माचा पुत्र अर्थात ‘ब्रह्मपुत्र’ आहे. पुरुष नाम धारण केलेली कदाचित भारतातील एकमेव नदी. बाकी सगळ्या नद्यांची नावं स्त्रीलिंगी आहेत. अरुणाचलमध्ये प्रवेश केल्यावर ब्रह्मपुत्रेचं पात्र एके ठिकाणी वीस किलोमीटर इतकं विस्तृत होतं. अगदी उन्हाळ्यातसुद्धा त्याची रुंदी आठ किलोमीटरपेक्षा कमी होत नाही. गुवाहाटीजवळ मात्र ह्या नदीची रुंदी एखाद किलोमीटर इतकी कमी होते. तिबेटमध्ये उगमापासून ब्रह्मदेशात समुद्राला मिळेपर्यंत ब्रह्मपुत्रा २९०० किलोमीटर धावते. त्यातली ९१६ किलोमीटर भारतातून जाते आणि जाताना आसामच्या मध्यातून बागडत आसामचे दोन भाग करते.
आसाममधली दुसरी मोठी नदी म्हणजे बराक. एके ठिकाणी हिचं नाव सुरमा असं वाचायला मिळालं. ही नदी त्यामानाने लहान आहे. हिचा उगम मणिपूरमध्ये होतो आणि आसाममधून वाहत जात बांगलादेशात ही नदी समुद्राला मिळते. ह्या नदीची खासियत म्हणजे दोन हजार प्रकारच्या जलचरांच्या वेगवेगळ्या प्रजाती ह्या नदीच्या पात्रात आहेत. ह्या बाबतीत जगभरातल्या श्रीमंत नद्यांमध्ये हिचा क्रमांक फार वरचा आहे. नदीची एकूण लांबी नऊशे किलोमीटरच्या आसपास. केंद्र सरकारचा प्रस्तावित राष्ट्रीय जलमार्ग ह्या बराक नदीतून जाणार आहे. फार पूर्वीच्या काळापासून पाण्याच्या स्रोताजवळ मानवाने आपली वस्ती केली. नदी किनारी वसलेली गावं, शहरं वसत गेली. त्यालाच अनुसरून तेजपुर, दिब्रूगढ, गुवाहाटी ही आसाममधली मुख्य शहरं ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी वसलेली आहेत.
आसाम राज्याचं एकूण क्षेत्रफळ ७८ हजार चारशे स्क्वे. किलोमीटर आहे. त्यातला ५६ हजार स्क्वे. किमी भाग ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे तर २२ हजार स्क्वे. किमी भाग बराक नदीच्या खोऱ्यात आहे. त्यामुळे ह्या नद्यांना पूर आला की, त्याचा फार मोठा प्रभाव आसामच्या मोठ्या क्षेत्रात दिसून येतो. तर ह्याच दोन पैकी एकीने म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीने आसाममध्ये गेले दोन तीन आठवडे झाले शब्दशः धुमाकूळ घातला आहे.सेंट्रल वॉटर कमिशनच्यानुसार ब्रह्मपुत्रा नदीबरोबर मानस, बेकी आणि गौरांग ह्या नद्यांना पूर आला असून बाकसा, कामरूप, नलबारी, बरपेटा, कोकराझार आणि धुबरी हे जिल्हे पाण्याखाली आहेत. राष्ट्रीय पूर आयोग (नॅशनल फ्लड कमिशन) नुसार आसामचं जवळपास ४०% क्षेत्रफळ म्हणजे एकतीस हजार स्क्वे. किलोमीटर भूभाग आजच्या मितीला पाण्याखाली आहे. ह्या भूभागात एकंदर ५० मुंबई, किंवा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे हे जिल्हे एकत्रित बसवता येतील. पुराची तीव्रता सध्या इतकी आहे की, जवळपास साडेचार लाख एकर शेती पाण्याखाली आहे. राज्यातल्या शेतीचं प्रचंड नुकसान ह्या पुराने केलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं काझीरंगा नॅशनल पार्क हेही ब्रम्हपुत्रा नदीच्या जवळ आहे. नदीने ह्या नॅशनल पार्कचा ९०% भाग गिळंकृत केलाय.
ह्याही आधी ब्रह्मपुत्रेला पूर येऊन गेलाय. पण यंदाचा पूर जरा जास्तच तीव्र आहे. हिमालयाच्या पायथ्याशी आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची संततधार लागली आहे. ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणाऱ्या बहुतांश उपनद्यांना पूर आलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम इतका विचित्र झालाय की जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाची कमतरता असलेल्या ह्या प्रदेशाला आता पुराने वेढलं आहे. जमिनीची धूप वाचवण्यासाठी झाडं उपयोगी पडतात कारण झाडांची मुळं जमीन धरून ठेवतात, हे आपण शाळेत शिकलो होतो. नेमका त्याचाच अभाव ह्याही परिसरात आहे. जंगलतोडीमुळे नदी किनाऱ्यालगतची जमीन वाहून जात धूप होतेय आणि नदीचं पात्र रुंद होत चाललंय. मुळात ह्या नदीच्या परिसरातील जमीनीचा गुणधर्म हा धूप होण्यास कारणीभूत आहे. त्यातून वाढलेली जंगलतोड ही एक मानवनिर्मित समस्या. धूप झालेली ही माती पात्रात जमा होऊन खोली कमी करते आणि मग पाणी आजूबाजूला पसरायला अजून वाव मिळतो. एका अहवालाच्या आकड्यानुसार आत्तापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यालगतच्या जमिनीची ७ ते ८% धूप होऊन वाहून गेलीय. मानवाने नदीकिनारी जशी वस्ती केली तसं अतिक्रमणसुद्धा केलं. अनैसर्गिकरीत्या वाढलेली लोकसंख्या हे ह्याचं प्रमुख कारण आहे. मागच्यावर्षी आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध न करू शकलेले चाळीस लाख लोकं आसाममध्ये होते. बांग्लादेशातून आसाममध्ये अवैधरित्या स्थलांतरीत होणाऱ्या लोकांनी केलेली घुसखोरी कुठेकुठे परीणाम दाखवू शकतो, त्याचं हे उदाहरण.
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने झांगमू ह्या ठिकाणी मोठं धरण बांधून जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प २०१५ साली चालू झाला. त्या प्रकल्पावर भारताचं साहजिकच नियंत्रण नाहीये. ह्या नदीच्या पाणी वाटपाच्या बाबतीत आजमितीला कोणत्याही प्रकारचा करार भारत आणि चीन ह्यांच्यात अस्तित्वात नाहीये. त्यासाठी बोलणी करण्यातही चीनला स्वारस्य नाहीये. पण ह्यामुळे धरणाच्या पाण्याच्या सावटाखाली भारतातल्या राज्यांना कायम राहावं लागतंय. मागे एकदा दुसऱ्या एका ठिकाणाहून चीनने जीवसृष्टीसाठी हानिकारक सिंथेटिक पॉलीमर पाण्यात सोडून दिलं होतं. त्या गडद रंगाच्या पाण्यामुळे आपल्या भागातल्या लोकांमध्ये घबराट झाली होती. थोडक्यात चीनकडे नको तितकं नियंत्रण ह्या नदीचं आहे.
दरवर्षी येणाऱ्या पुराचं नियंत्रण हा तज्ज्ञांचा विषय असला तरी नदीच्या पात्रातून गाळ काढणे, पात्रावर वस्तीसाठी अतिक्रमण होऊ न देणं, पाणी झिरपायला मोकळी जागा ठेवणे, अवाजवी लोकसंख्यावाढ होऊ न देणे, NRC अमलात आणणे, नेदरलँडसारखा ‘रूम फॉर रिव्हर्स’ हा प्रोजेक्ट राबवणे हे असे उपाय असले तरी ते सोपे आणि स्वस्त नक्कीच नाहीयेत. नदीजोड प्रकल्पही इतका साधासरळ नाहीये.हे सर्व कागदावर असलं तरी आजच्या घडीला झालेलं नुकसान मात्र फार मोठं आहे. कोणाचं घर वाहून गेलंय, कुणाच्या शेतात वाळू येऊन साचलीय, कुणा मुलांची शाळाच पाण्याखाली आहे तर कुणा गृहिणीच्या स्वयंपाकघराची चुलही पाण्याने ठेवली नाहीये. प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन मदत करणं शक्य नसलं तरी आसाममधल्या ह्या आपल्याच बांधवांना निदान सहानुभूती दाखवणं आणि आपल्याच देशाचा भाग असलेल्या प्रदेशाविषयी, तिथल्या प्रश्नांविषयी जागरूकता दाखवणं, हे आपलं कर्तव्य आहे.
– सारंग लेले, आगाशी.