गुप्त साम्राज्य

गुप्त कालीन दशावतार मंदिर, देवगड, मध्यप्रदेश.

मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर सुमारे चारशे वर्षांचा कालखंड शक, कुशाणादी आक्रमकांच्या स्वाऱ्यांचा व त्यांच्या राज्यस्थापनांचा कालखंड होय. मौर्यानंतर उत्तरेत कुशाणांनी, तर दक्षिणेत सातवाहनांनी आपली राज्ये स्थापन केली. या दोन्ही सत्तांनी आपापल्या राजसत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचाही अस्त लवकरच इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या मध्यावर घडून आला. उत्तरेत कुशाणांची सत्ता नष्ट होऊन अनेक नागराज्ये उदयास आली, तर दक्षिणेत सातवाहन सत्ता अस्तास जाऊन तेथे वाकाटकांची सत्ता प्रस्थापित झाली, पण याच काळात आणि वाकाटकांशिवाय भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये अस्तित्वात आली होती. उत्तरेतील गंगेच्या खोऱ्यातील मगधाच्या प्रदेशात गुप्तांचे राज्य इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उदयास आले. पुढे या राज्यास एकापेक्षा एक पराक्रमी राजे लाभल्यामुळे या कालखंडास इतिहासकारांनी ‘भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग’ असे संबोधले. इ. स. २७५ च्या सुमारास गुप्त घराणे उत्तर भारतात सत्तेवर आलेले होते. श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक मानला जातो व चिनी प्रवासी यित्सिंग याने लिहीलेल्या प्रवास वर्णनात श्रीगुप्त याच्याविषयी माहिती आहे.

सम्राट पहिला चंद्रगुप्त (इ.स. ३१९ ते इ.स. ३३४)

गुप्त घराणे हे वैश्य वर्णाचे असावे, असे इतिहासकारांचे मत आहे; तथापि चंद्रगुप्ताने क्षत्रिय वर्णाच्या लिच्छवी राजघराण्यातील कुमारदेवी या राजकन्येशी विवाह केला होता. या विवाहसंबंधामुळे चंद्रगुप्ताला वैशालीचे राज्य आणि लिच्छवी जमातीचे साहाय्य मिळाले आणि त्या जोरावर त्याने आपल्या राज्याच्या चतु:सीमा वाढवून आपले राज्य साम्राज्याच्या मार्गावर आणले. इ.स. ३२० मध्ये २६ फेबुवारी रोजी चंद्रगुप्ताचा राज्यारोहण समारंभ झाला. त्या निमित्ताने त्याने आपल्या घराण्याचा शक- गुप्तसंवत या नावाने सुरू केला. त्याचबरोबर त्याने महाराजाधिराज हे बिरूदही धारण केले. चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीत गुप्त राज्य संपूर्ण बिहारवर व साकेतपर्यंतच्या उत्तर प्रदेश येथे विस्तारलेले होते.

समुद्रगुप्त (.. ३३५३८०)

चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त हा त्याचा पुत्र त्याच्या गादीवर बसला. हा पित्यासारखाच पराक्रमी होता. त्याच्या दरबारातील कवी हरिषेण याने त्याच्या स्तुतीपर पराक्रमाची गाथा गायली आहे. ही स्तुती अलाहाबादेच्या अशोक-स्तंभाखाली कोरलेली आहे. त्यात म्हटले आहे की, समुद्रगुप्ताने प्रथम आपल्या राज्याशेजारची अनेक राज्ये जिंकून मोठय़ा प्रमाणात साम्राज्यविस्तार घडवून आणला आहे. त्याने राज्याचा विस्तार उत्तरेत हिमालयापासून ते दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत, तर पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीपासून पश्चिमेला यमुना नदीपर्यंत केलेला होता. याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते. हा इतिहासात सैनिकी पेशात एक कुशल योद्धा म्हणून ओळखला जातो. याने दक्षिणेकडील राजांना पराभूत केले, पण वाकाटकांच्या बरोबर युध्द केले नाही.

समुद्रगुप्त हा कला आणि साहित्याचा थोर आश्रयदाता होता. समुद्रगुप्त हा विद्वान आणि कवी म्हणूनही प्रसिद्ध होता. याची कवीराज म्हणून स्तुती करण्यात येत असे.

दुसरा चंद्रगुप्त ( विक्रमादित्य) (.. ३८०४१४)

समुद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त हा गुप्त सम्राट बनला. त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे त्याची शकांवरील स्वारी. माळवा, गुजराथ, सौराष्ट्र (उत्तर भारताच्या इतिहासात चंद्रगुप्ताचे या शकांवरील विजयाचे महत्त्व मोठे आहे. शक हे परकीय राज्यकर्ते होते. त्यांचे  अस्तित्व रूद्रसिंहाच्या राज्याच्या रूपाने शिल्लक होते. चंद्रगुप्ताने हे राज्य खालसा करून हिंदूभूमीवरील ३०० वर्षे अस्तित्वात असलेला शकांचे अस्तित्व कायमचे संपवले. त्यामुळे विक्रमादित्य यास इतिहासात ‘शकारी’ या पदवीने गौरविले आहे. शकांवरील या विजयानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताने ‘विक्रमादित्य‘ हे बिरुद धारण केले असावे, असे इतिहासकारांचे मत आहे.

हा मोठा धोरणी राजा होता. शक व कुशाण या परकीय सत्तांचे पारिपत्य करण्यापूर्वी आपल्या दक्षिणेकडील नाग व वाकाटक या दोन राजसत्तांशी वैवाहिक संबंध जोडून त्याने आपले राज्य सुरक्षित केले. मध्य प्रदेशातील कुबेरनागा या राज्यकन्येशी त्याने विवाह केला होता; तसेच आपली कन्या प्रभावती गुप्ता ही रूद्रसेन (दुसरा) या वाकाटक राजास देऊन त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले.

याच राजाच्या कारकिर्दीत फाहियान या चिनी (इ.स. ३९९-४१४) प्रवाशाने भारताला भेट दिली. गुप्त साम्राज्यातील शांतता व सुबत्ता यांची त्याने आपल्या प्रवासवर्णनांत स्तुती केली आहे. चंद्रगुप्ताच्या काळात भारतामधील व्यापार व उद्योगधंदे भरभराटीस येऊन भारतवर्ष देश खरोखरीच एक सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध पावला. चंद्रगुप्ताच्या आश्रयामुळे अनेक विद्या व कला यांचा विकास झाला.

दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र कुमारगुप्त हा गुप्त सम्राट झाला. (इ.स. ४१५-४५५) हा कार्तिकेयाचा भक्त होता. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी पुष्यमित्राने गुप्त साम्राज्यावर हल्ला केला. तो हल्ला राजपुत्र स्कंदगुप्त याने मोडून काढून गुप्त साम्राज्य सुरक्षित केले.

स्कंदगुप्त (इ.स. ४५५-४६७) सम्राट झाल्यानंतर त्याला हुण या रानटी लोकांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या टोळ्या या काळात युरोप आणि इराण- भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्यांना परतवून लावले. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून त्याला ‘भारतीय संस्कृतीचा त्राता’ असे म्हटले गेले.

पुढे ५० वर्षे तरी हुण भारताकडे फिरकले नाहीत. पण स्कंदगुप्तानंतर गुप्त राजवंशात कर्तबगार राजे निर्माण झाले नाहीत. त्यामुळे हळूहळू गुप्त साम्राज्य लयाला गेले.

गुप्तकालीन प्रशासन व्यवस्थाः

देशात शांतता व सुबत्ता निर्माण करणारी राजसत्ता परमेश्वरस्वरूप (विष्णुरूप) मानली जाऊ लागली होती, म्हणूनच गुप्त सम्राटांनी स्वत:ला महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक अशी बिरुदे लावली. समुद्रगुप्ताच्या एका स्तुतीमध्ये राजाचे वर्णन ‘लोककल्याणाकरिता पृथ्वीवर अवतीर्ण झालेला देव’ असे केलेले आढळून येते. अशा प्रकारे वंशपरंपरागत असलेल्या राजेशाहीला या काळात दैवी अधिष्ठान प्राप्त झाले होते.

धर्मशास्त्राप्रमाणे राजाचा ज्येष्ठ पुत्र युवराज होत असे; पण गुप्त घराण्यात हा नियम पाळला गेला नाही. कोणाही कर्तबगार व पराक्रमी पुत्रास साम्राज्याचा युवराज म्हणून नेमल्याची काही उदाहरणे आढळतात. राज्य कारभारात युवराजपद हे सम्राटाच्या खालोखाल महत्त्वाचे मानले जात होते.

मौर्यकालाप्रमाणे गुप्तकालातही सम्राटास राज्य कोरभारात साहाय्य करण्यासाठी एक मंत्री परिषद होती. प्रत्यक्ष सम्राटाच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांचे अनेक विभाग (प्रांत) पाडले होते. त्यांना ‘भुक्ती’ असे म्हणत. त्यावर ‘उपारिक’ नावाचा अधिकारी नेमला जाई. नगरांचे प्रशासन पाहणारी अनेक मंडळे असत. त्यांना ‘अधिष्ठानाधिकरण’ असे म्हणत.

प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना रोख वेतन दिले जात असे. पण काही अधिकाऱ्यांना जमिनीही इनाम (सरंजाम) दिल्या आहेत.

गुप्त साम्राज्यात अनेक मांडलिक राज्ये होती. त्यांचा दर्जा निरनिराळ्या प्रकारचा असून त्यांना कमी-जास्त स्वायत्तता बहाल केली गेली होती.

गुप्तकालीन साहित्य

शिल्पकला, चित्रकला व वास्तुकला याप्रमाणे गुप्तकालीन साहित्यातही भरभराट झालेली होती. हा काळ साहित्यनिर्मितीच्या बाबतीत अभिजात युग म्हणून ओळखला जाते. यातील काही कवी नाटककार यांच्या नाटके व काव्यांबद्दल माहीती पाहूयात.

मृच्छिकटिक हे शुद्रकाने लिहिलेले नाटक आहे. यात गरीब ब्राह्मण व वेश्येची रूपवती कन्या यांची प्रेमकहाणी आहे. चारुदत्त (गरीब ब्राह्मण) व वसंतसेना (गणिका). तर मुद्राराक्षस हे विशाखादत्ताने लिहिलेले नाटक आहे. यात चाणक्य (चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री व सल्लागार) याच्या धूर्त राजकीय डावपेचाची कथा आहे. विशाखादत्ताने देवीचंद्रगुप्त नावाचे आणखी एक नाटक लिहिले होते.

कालिदास हा सर्वश्रुत नामवंत व सर्वश्रेष्ठ कवीही गुप्त काळातीलच होता. याला भारताचा शेक्सपिअर असे परकियांनी म्हटले आहे. मेघदूत, अभिज्ञानशाकुंतलम, ऋतुसंहार , रघुवंश, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय इत्यादी कालिदासाची साहित्यनिर्मिती आहे. कालिदास हा चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या दरबारात राजकवी म्हणून होता.

अभिज्ञानशाकुंतलम हे कालिदासाचे जगप्रसिद्ध नाटक आहे. ही दुष्यंत राजा व शकुंतला यांच्या मीलनाची कथा . हे नाटक प्राचीन साहित्य व रंगभूमीचा सर्वोत्कृष्ट मानबिंदू समजले जाते. सर्वप्रथम युरोपियन भाषेत अनुवादित झालेली प्राचीन भारतीय साहित्यकृती ही आहे. जगातल्या १०० उत्कृष्ट साहित्यात याचा उल्लेख केला जातो.

रघुवंश हे महाकाव्य रामाच्या चतुरस्र विजयाचे वर्णन करते.

गुप्तकालीन कलाः

गुप्तकालास अभिजात भारतीय कलेचा काळ असे म्हटले जाते. या काळात भारतवर्षांस राजकीय स्थैर्य व समृद्धी लाभल्यामुळे भारतीयांनी मूर्तीशिल्प, स्थापत्य, चित्रकला इ. क्षेत्रांत वैभवशाली प्रगती केली होती. मूर्तीशिल्पकलेने परमावधी गाठलेली दिसते. पूर्णाकृती मानवी प्रतिमा हे या कलेचे वैशिष्टय़ होते. दुसरे म्हणजे ही कला ग्रीक अथवा इराणी कला यांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त होती;  सारनाथ येथील धर्मचक्र प्रवर्तन करणारी बुद्धमूर्ती, सुलतानगंज येथील बुद्धाची ताम्रप्रतिमा, मथुरेतील पद्मासनस्थ महावीराची प्रतिमा, ग्वाल्हेरजवळची सूर्यप्रतिमा, भरतपूर येथील लक्ष्मीनारायणाची प्रतिमा, काशीमधील गोवर्धनधारी कृष्णप्रतिमा अशी या काळातील शिल्पकलेची काही उत्कृष्ट उदाहरणे म्हणून सांगता येतील. मानवी भावभावना व शरीसौष्ठव यांची सुंदर अभिव्यक्ती या शिल्पांतून व्यक्त होते.

भारतीय मंदिर – स्थापत्य कलेचा पाया याच काळात रचला गेला. लाकडाऐवजी भाजलेल्या विटा व घडीव दगड यांचा वापर अधिकाधिक प्रगत होत गेला. 

अजिंठा, वेरूळ व बाघ या ठिकाणांची अनेक लेणी (चैत्य आणि विहार) याच काळात निर्माण झालेली आहेत. गुप्तकाळात चैत्य विहार अधिकाधिक सुंदर बनविले गेले. मध्यभागी कोरीव खांबांच्या ओळी, ठिकठिकाणी बुद्ध, बोधिसत्त्व, यक्ष-यक्षिणी यांच्या सुंदर व रेखीव मूर्ती, निरनिराळ्या रंगांनी काढलेल्या चित्रांनी सजवलेल्या भिंती व छताची आतील बाजू म्हणजे या काळातील चैत्य आणि विहार स्थापत्याची वैशिष्टय़े होते. अंजिठा येथील लेणे क्र. १ विहारशिल्पाचा, तर लेणे क्र. १६ चैत्यशिल्पाचा उत्तम नमुना आहे.

चित्रकला – चित्रकलेच्या क्षेत्रात गुप्तकाळात भारतीय कलाकारांनी अत्युच्च शिखर गाठले होते. या काळातील भारतीय चित्रकलेने भारताबाहेरील देशांतील कलेलाही प्रेरणा दिलेली आहे. अजिंठा व बाघ या ठिकाणची या काळातील भित्तीचित्रे त्यांच्या कलापूर्ण शैलीमुळे सर्व जगात प्रसिद्ध झालेली आहेत. या चित्रांचे प्रसंग बुद्धचरित्र व जातककथा यामधून निवडलेले आहेत. दीड हजार वर्षांपूर्वीची ही चित्रे आजही ताजी भासतात. अजिंठा येथील क्र. १, २, १६, १७, १९ ची लेणी तत्कालीन चित्रकलेचा अप्रतिम नमुना म्हणून जगप्रसिद्ध आहेत.

गुप्तकालीन शास्त्रीय प्रगती तंत्रज्ञानः

गणितशास्त्रात ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ हे अंक जगाला आपण दिले आहेत. या अंकांचा शोध, विशेषत: शून्याचा शोध, हा गणितशास्त्रामधील मूलभूत शोध मानला जातो. अरबांनी हे अंक युरोपात नेले व त्यावरून ते अरबी अंक म्हणून जगात प्रसिद्ध झाले. वर दिलेल्या दहा अंकांत कोणतीही मोठी संख्या मांडण्याची दशमान पद्धती भारतीय गणितज्ज्ञांनी शोधून काढली आहे. एवढेच नव्हे तर गणितशास्त्रातील एक विद्याशाखा असलेल्या बीजगणिताचा (अल्जिब्रा) शोधही भारतीयांचाच आहे.

या काळातील गणितशास्त्रातील सर्वश्रेष्ठ गणितज्ज्ञ म्हणजे आर्यभट्ट (जन्म इ.स. ४७६) हा होय. त्याने गणित व खगोलज्योतिष या विषयांवर आर्यभाटीय नावाचा ग्रंथ रचला. दशमान पद्धतीची पहिली नोंद याच ग्रंथात सापडते. आर्यभट्टाने या ग्रंथात त्रिकोणमिती व बीजत्रिकोणमिती यांचीही चर्चा केली आहे. वर्तुळाच्या परिघास व्यासाने भागले असता ३.१४१६ हा भागाकार येतो. हे भूमितीशास्त्राचे सूत्रही आर्यभट्टानेच प्रतिपादित केलेले आहे.

आर्यभटने खगोलशास्त्रातही असामान्य शोध लावले. पृथ्वी गोल असून ती आपल्या अक्षाभोवती फिरत असते व त्यामुळे दिवस व रात्र घडून येतात हा सिद्धांत प्रथम त्यानेच मांडला. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यग्रहण होते.

वराहमिहिर (इ.स. ४९०-५८७) हा या काळातील दुसरा मोठा खगोलशास्त्रज्ञ होय. त्याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहून त्यात तत्कालीन पाच ज्योतिष सिद्धांताची चर्चा केली आहे. फलज्योतिषशास्त्रावर त्याने बृहत्संहिता हा ग्रंथ रचला. या ग्रंथात ग्रहांच्या स्थितीतील गती, युती व ग्रहणे यांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांची सखोल चर्चा केलेली आहे.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात धातुशास्त्रात भारतीयांनी मोठी प्रगती केली होती. तांबे व ब्राँझ हे धातू वितळवून त्यांच्या मोठमोठय़ा मूर्ती तयार करण्याचे तंत्र भारतीयांनी आत्मसात केले होते. सुलतानगंज येथील साडेसात फूट उंचीची भव्य तांब्याची बुद्धमूर्ती हा तंत्राचा उत्कृष्ट नमुना होय. दिल्लीजवळचा २३ फूट ८ इंच उंचीचा, पायथ्याशी १६ इंच व्यास असलेला लोहस्तंभ हा गुप्तकाळातील धातुकामाचा आश्चर्यकारक नमुना आहे. इतक्या वर्षांनंतरही  त्यास अजिबात गंज चढलेला नाही.

अशा रितीने गुप्त काळातील भारतीयांनी केलेल्या प्रगतीकडे पाहूनच इतिहासकारांनी त्याचे ‘भारताचे सुवर्णयुग’ असे वर्णन केले असावे.

संदर्भ ग्रंथ:

  • मराठी विश्वकोश.
  • महाराष्ट्र गॅझेटीअर.
  • प्राचीन इतिहास – प्रा. गजानन भिडे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s