वेदांग

वेदांच्या ज्ञानास व अध्ययनास मदत व्हावी म्हणून वेदांगे उत्पन्न झाली. त्यातील व्याकरण व निरूक्त ही परस्पर सहकार्याने प्रत्यक्ष उपयोगी पडतात तर छंद, कल्प, ज्योतिष व शिक्षा वेदांना समजून घेण्यास लांबून उपयोगी पडतात.

“ऋग्वेदादि चार वेद त्यांची अंगे अपरा विद्या आहे व पराविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान होय. ” असेअंगिरसाने शौनकाला दिलेले उत्तर.

ब्राह्मणग्रंथांविषयी माहीती आपण मागील लेखांत घेतली आहेच तसेच उपनिषदांची सविस्तर माहीतीही आपण पुढील लेखांत घेऊच.

उपनिषदे ही हा वेदांचा शेवटचा भाग म्हणून ‘वेदान्त’ म्हटली जातात. यापलिकडे किंवा याहून अधिक श्रेष्ठ असे ज्ञान नाही. या उपनिषदांनी दिलेल्या ज्ञानास ‘पराविद्या’ म्हणतात.

वेदांग व वेदान्त यांत गल्लत होऊ नये म्हणून तूर्तास इतकेच स्पष्टीकरण.

शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदसां चय:।

ज्योतिषामयनं चैव वेदांगानि षडैव तु।।

वेदांगाचे विषय ब्राह्मणग्रंथ व उपनिषदांत येतात. ते विषय म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष हे होत. प्रत्येक वेदाला धरुन ही सहा वेदांगे तयार झाली; त्यांचे सूत्रग्रंथ तयार झाले.

अल्पाक्षरमसंदिग्धं सारवत् विश्वतो मुखम्।

अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदु:।।

अर्थात् कमीतकमी अक्षरांत, नि:संदिग्ध, सर्वांना समजू शकणारी, निर्दोष व सुटसुटीत असे सूत्र असते. अशा अनेक सूत्रांनी मिळून तयार झालेले ते सूत्रग्रंथ म्हणजे शास्त्रग्रंथ.

या वेदागांची आता थोडक्यात माहीती घेऊयांत.

शिक्षा – यांत वर्णांची सामान्य चर्चा असते. याचा अर्थ ‘वर्णोच्चारशास्त्र’. यांची संख्या ६५.पैकी ३१ बनारस येथे, १६ चेन्नई येथे तर ३ पुणे येथील हस्तलिखित संग्रहात असून त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

सामान्य – पाणिनीय शिक्षा

ऋग्वेद – स्वरव्यंजन शिक्षा, समान शिक्षा

यजुर्वेद – ५ चरणव्यूह, ८ पाराशरी शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा

सामवेद – नारद शिक्षा

यांत वर्णविषयक माहीती म्हणजे प्रामुख्याने वर्णोच्चारांचे स्थान, वर्णोच्चारांचे साधनकरण, वर्णोच्चारांचे बोलताना होणारे प्रयत्न व वर्णोच्चारांच्या पध्दती यांविषयी माहीती ज्ञान होते. याचे २ भाग शिक्षा व प्रातिशाख्ये.

प्रातिशाख्यात वेदपाठासंबंधी नियम ज्यांचा वेदशाखांशी प्रत्यक्ष संबंध येतो तर शिक्षा त्यांविषयी अधिक ज्ञान देतात पण प्रत्यक्ष वेदशाखेला जोडलेल्या नससून त्यांचे स्वरुप परिशिष्टासारखे असते. पाणिनिय शिक्षा ही सर्वात जुनी आहे.

प्रातिशाख्ये इ.स. पू. ५०० ते १५० या काळात लिहीली गेली. या काळाला पार्षदकाल म्हणतात तर प्राचीन शिक्षा इ.स.पू. ८०० ते ५०० या काळात अस्तित्वात आल्या असाव्यात. काही विषय वेदांगाहून वेगळे असले तरी प्रातिशाख्ये वेदांगच आहेत.

याविषयी कुमारील भट्ट याने म्हटलेय,

प्रातिशाख्यानि वा यानि स्वाध्यायवदधीयते।

गृह्यमाणतदर्थत्वात् अङ्गत्वम् तेषु वा स्थितम्।।

कल्प – तीन प्रकारची कल्पे श्रौत, धर्म व गृह्य. ही सूत्रे मौखिक परंपरेने चालत आलेली असून या सूत्रग्रंथांना स्मृती ग्रंथ म्हणतात.

श्रौतसूत्रात यज्ञविधींचे नियम व त्यांचे प्रकार यांविषयी माहीती आहे. १४ प्रकारच्या यज्ञांत ७ हविर्यज्ञ (अग्न्याधान, अग्निहोत्र, दशपूर्णमास, आग्रहायण, चातुर्मास, निरूढपशुबंध व सौत्रामणि) तर ७ सोमयज्ञ (अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र व आप्तोर्याम)

श्रौतसूत्राबरोबर शूल्बसूत्रांचा उल्लेख आवश्यक कारण यात यज्ञासाठी असलेल्या अग्नीची वेदी बांधण्याची मोजमापे दिलेली आहेत. शूल्बसूत्रे म्हणजेच प्राचीन भारतीय ज्यामितीय ग्रंथ होत.

गृह्यसूत्रात ज्या यज्ञांचे वर्णन आहे त्यांस नित्ययज्ञ किंवा पाकयज्ञ असेही म्हणतात. यांचे ७ प्रकार – पितृयज्ञ, पार्वणयज्ञ, अष्टका, श्रवणाकर्म, आश्वयूजी, आग्रहायणी व चैती

शिवाय पाच पंचमहायज्ञ – देवयज्ञ (हवन), भूतयज्ञ (बलिदान), पितृयज्ञ (तर्पण व पिंडदान), ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन) व मनुष्ययज्ञ (अतिथिभोजन)

१६ संस्कार – गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातकर्म, कर्णवेध, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, उपनयन, वेदारंभ, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, संन्यास व अंत्येष्टी.

कशी एकूण ४२ कर्मे दिलेली आहेत.

धर्मसूत्रांत ४ वर्ण व ४ आश्रम यांचे नियम सांगितले आहेत. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म, नियम, धार्मिक प्रथा इत्यादि.

व्याकरण –  पाणिनीच्या व्याकरणाच्या शास्त्तशुध्द व सर्वकष पध्दतीतून अष्टाध्यायी व्याकरण तयार झाले. यात ८ अध्याय असून यांत सुबंत तिडन्त, धातुसाधिते, शब्दसिध्दी, सुबन्ततिडन्तसिध्दी, स्वरविचार, पदोच्चार व वर्णोच्चार यांची माहीती आहे. पाणिनीने वेद वाङ्मयाचा अभ्यास करून वैदिक व लौकिक भाषेचे व्याकरण लिहीले.

निरुक्त – निरूक्त ही ‘निघण्टु’ नावाच्या वैदिक शब्दकोशावरील यास्काने लिहीलेली टीका आहे. पण त्यातील सर्व शब्दांवरील चर्चा नाही. यास्काचे निरूक्त दोन भागात आहे, पूर्वषटक व उत्तरषटक. त्यापूर्वीही अनेक निरूक्ते प्रचलित होती. निरुक्त म्हणजे शब्दांचा सांगोपांग व आकलनपूर्ण केलेला विचार.

छंद – ऋग्वेद काळापासून छंदशास्त्राचा अभ्यास सुरु झाला असावा. पिंगलाचे छंदशास्त्र वेदांग म्हणून ओळखले जाते. हा पाणिनिचा भक्त होता.

ब्राह्मण ग्रंथांच्या काळानंतर सूत्रकाळात यातील सूत्रे तयार झाली असावीत. सामवेदातील उपलब्ध निदानसूत्रांत असलेल्या छंदांच्या चर्चेवरुन वैदिक व लौकिक या दोन्हींचा विचार यांत केलेला आहे असे दिसते.

ज्योतिष – वैदिक काळापासून मासगणना चंद्रावरुन होत होती.तसेच सौरवर्षही माहीत होते. शरत् हेमंत यांची मधु माधव इ. नावे प्रचलित होती. ऋतूंचे संवत्सर व ग्रहणेही माहीत होती.तैत्तिरीय संहितेत नक्षत्रांची माहीती होती. पण ग्रह मात्र गुरू व शुक्र दोनच.

वेदांगज्योतिष नावाचा ‘लगघ’ याच्या ग्रंथात पद्यमय गूढसूत्रे आहेत ज्यात अनेक अपपाठ आहेत. याची दोन संस्करणे आहेत. अथर्ववेदाशी संबंधीत ‘आत्मज्योतिष’ नावाचा ‘पञ्चकल्पिन्’ लिखित १४ अध्यायांचा अजून एक ग्रंथ आहे. नंतरच्या जातक विषयांचे मूळ यात असावे. यात राशीफले नाहीत पण अथर्ववेदाच्या नक्षत्रकल्पांशी या ग्रंथाचा संबंध असावा.

लेखांती वेदांगाविषयी नमुद करावेसे वाटते की पाणिनीय शिक्षेत मानवाप्रमाणे वेदाची अंगे दिली आहेत…

छंद: पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोsथ पठ्यते।

ज्योतिषामयनं चक्षु: निरुक्तं श्रोत्रमुच्यते।।

शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम्।

तस्मात्साङ्गमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते।।

 

– स्नेहल आपटे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s