ब्राह्मण ग्रंथ

वेदान् विव्यास यस्मात्स वेदव्यास इतीरित:।

तपसा ब्रह्म चर्येण व्यस्य वेदान्महामति:।।

पुराणातील माहिती वरुन व्यासमुनींनी तयार केलेल्या चार संहिता आपल्या चार शिष्यांना दिल्या. त्या म्हणजे ऋग्वेद पैल ऋषींना, यजुर्वेद वैशंपायन ऋषींना, सामवेद जैमीनी ऋषींना व अथर्ववेद सुमंतु नावाच्या शिष्याला.

वेद हे सर्व भारतीय धर्माचे आदिस्थान आहेत.व्यक्ती अन् समाज यांचे कल्याण कशांत आहे हे धर्म सांगतो व तो धर्म वेदात सांगितला आहे. श्रुतीपासून ऐकून ऋषींनी जे ग्रंथ आपल्या स्मृतीच्या आधारे रचले ते स्मृती ग्रंथ हेही वेदांवर अवलंबून आहेत.

वैदिक युगात यज्ञधर्म प्रमुख मानला जाई. तर वेदांच्या संहिता या यज्ञासाठी बनवल्या गेल्या. यज्ञात अग्नीत मंत्रोच्चरयुक्त आहुती अर्पण करत तर मंत्रपाठ करणारे ब्राह्मण वेदपारंगत असत.ब्रह्म म्हणजे वेदमंत्र . ब्रह्म जानाति इति … ब्राह्मण . तसेच यज्ञात चार वेदांचे चार प्रमुख असत. ऋग्वेद जाणणारा ‘होता’, यजुर्वेद जाणणारा ‘अध्वर्यू’, सामवेद जाणणारा ‘उद्गाता’ व अथर्ववेद जाणणारा तो ब्रह्मा.

नंतरच्या काळात या “सर्व यज्ञविषयक तज्ज्ञ मतमतांतरांचा संग्रह” किंवा वेदमंत्रांचे ( ब्रह्म=मंत्र) विवेचन करणारे म्हणून ब्राह्मण या अर्थाने म्हणून ब्राह्मण ग्रंथ.

ब्रह्मनां वेदानामिमानि व्याख्यानानि ब्राह्मणानि।

असे हे ब्राह्मण ग्रंथ ज्यात सर्व मोठ्या यज्ञांची चर्चा केली आहे. सर्व यज्ञसंबध्द क्रिया सांगताना त्यांचे गुढ रुपकात्मक रुप दाखवून त्यांचा मंत्रांशी असलेला संबंध ही सांगितला आहे. प्रत्येक यज्ञाच्या संबंधांत ‘दक्षिणा’ हा मुद्दा न विसरता येतो. यज्ञधर्माचे एक शास्त्र तयार केलेले ब्राह्मणग्रंथात दिसते.

चारही वेदांवरुन निरनिराळे ब्राह्मण ग्रंथ रचले गेले. ते असे …

  • ऋग्वेद ब्राह्मणें  – यात दोन प्रकारचे ग्रंथ दिसतात. एक म्हणजे महीदास ऐतरेयाचे ऐतरेय ब्राम्हणग्रंथ जे आश्वलायन शाखेच्या ब्राह्मण समाजात म्हणजे सह्याद्री पासून ते आंध्रप्रदेश पर्यंत प्रचलीत आहे. यात शून:श्येपाच्या कथे बरोबरच अनेक आख्याने, कथा व इतिहास आहे. दुसरे म्हणजे कौषीतकी ब्राह्मण याल शांखायन ब्राह्मण असेही म्हणतात ज्यात कुषीतकपुत्र – कौशितकी ऋषी व पैंग्य ऋषींची मते आहेत.
  • यजुर्वेद ब्राह्मणें – यात दोन प्रकार… एक  कृष्ण यजुर्वेद म्हणजे तैत्तिरीय ब्राह्मण व दुसरे शुक्ल यजुर्वेद याच्या म्हणजेच शतपथ ब्राह्मणाच्या काण्व व माध्यंदिन अशा दोन शाखा आहेत. माध्यंदिनाचे शतपथ ब्राह्मणग्रंथ वाजसनेय ब्राह्मण म्हणूनही ओळखला जातो. याज्ञवल्क्य मुनींनी रचलेल्या या ब्राह्मणांचा प्रचाच बंगाल, बिहार, ओरीसा, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश येथे झाला आहे.
  • सामवेदाची ब्राह्मणे – यांत कौमुथ शाखेचे, राणायनिय व जैमिनीय शाखेचे असे प्रकार आहेत. यांमधे ताण्ड्यमहाब्राह्मणांत पञ्चविंश, षङविंश, मंत्र, आर्षेय, वंश, सामविधान अशी अनेक ब्राह्मणे असून जैमिनीय ब्राह्मण याला तलवकार असेही म्हणतातहे कर्नाटकात प्रचलित आहे.
  • अथर्ववेदात चे ब्राह्मण – शौनकीय शाखेचे गोपथ ब्राह्मण हा सूत्र पध्दतीचा असून यातील बराच भाग शतपथ व ताण्ड्यमहाब्राह्मणांतून घेतलेला आहे.

ब्राह्मण ग्रंथातील विषय विधी (नियम) व अर्थवाद (स्तूती व निंदा) अशा दोन विभागात रचलेले आहेत.

ब्राह्मण ग्रंथांच्या काळात यज्ञधर्माचे क्षेत्र ब्रह्मावर्तातून गंगा-यमुनेच्या पूर्वेकडे पसरले होते. वेदांमधील देवता त्याच असल्या तरी त्यांचे महत्त्व कमी झाले होते. यज्ञाला महत्त्व आले होते. असूर हा शब्द जाऊन दैत्य/ दानव हा शब्द देवांचा शत्रू या अर्थाने प्रचलित झाला. पर्यायाने यांत देव-दैत्यांच्या युध्दाच्या कथा आहेत. यज्ञातील प्रत्येक क्रियेचे वर्णन असून त्यातील लहानात लहान गोष्टीलाही महत्त्व दिले गेलेय.

ब्राह्मण ग्रंथांच्या काळापासून ब्राह्मण वर्गाचे महत्त्व वाढले. राजा कोणीही असला तरी ब्राह्मणांचा राजा मात्र सोम. कारण यज्ञात सोमरसाचे महत्व अनन्यसाधारण होते.  त्यांना शिक्षा देता येत नसे की कर वसूल करता येत नसे तर ब्राह्मण वध म्हणजे महापातक मानले जाऊ लागले.  धार्मिक इतिहासात भारतीय संस्कृतीचे असे अंग की ज्याचे परिणामही दूरगामी होते. असे असले तरी ब्राह्मणात येणाऱ्या अनेक कथांतून इतिहास व पुराणे तर तयार झालीच शिवाय त्यातून उपनिषदांची बीजेही पेरली गेली. ब्राह्मण ग्रंथांचे परिशिष्ट रुप असलेली आरण्यके ही ब्राह्मणग्रंथानंतर वैदीक युगाच्या शेवटी तयात झाली ज्यांना वेदान्त अशी संज्ञा आहे.

 

– स्नेहल आपटे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s