विठुमाऊली

मृग नक्षत्र लागते. ढगांच्या आच्छादनाने उन्हाची काहिली कमी झाली असते. पावसाला सुरुवात होते तो ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येते. बारीक पावसात, डोईवर पदर घेऊन आया-बाया वडाची पूजा करतात. दिवसा गणिक पाऊस वाढतंच असतो. सह्याद्रीच्या काळ्याशार कड्यांवरून झरे कोसळत असतात. इवले इवलेसे झरे उंच कड्यांवरून स्वत:ला लीलया दरीत झोकून देतात! कुणाच्या भरवशावर? कुणाच्या ओढीने ते असे झरझर वाहतात? एकमेकात मिसळत जातात आणि पाहता पाहता त्यांची नदी होते. या खळखळ वाहणाऱ्या अवखळ नदीला जन्मतःच समुद्राला भेटची ओढ लागली असते! समुद्राच्या भेटीसाठी निघालेल्या नदीला, वाटेतील खाचखळग्यांची, डोंगर घाटांची, उन्हा पावासाची पर्वा कसली?

समुद्राला भेटायला निघालेल्या इंद्रायणीच्या काठावर वसलेले आळंदी गाव. ज्येष्ठ पौर्णिमे नंतर सात दिवस उलटून गेले असतात. आळंदी आतापावेतो भक्तांनी फुलून गेली असते. कुठून दूरदुरून भक्त जमले असतात. कोणी वारकरी कोकणातून, कोणी पश्चिम महाराष्ट्रातून, कोणी खानदेशातून, कोणी मराठवाड्यातून आणि कोणी कर्नाटकातून सुद्धा आला असतो. कड्यावरून झोकून देणाऱ्या झऱ्यासारखा एक एक भक्त! काही काळापुरते का होईना घर-दार, शेतीवाडी, मुलं-सुना हे सगळं सोडून विठूच्या चरणी त्याने स्वत:ला झोकून दिले असते! या सगळ्या झऱ्यांची आळंदीला भेट होते. इंद्रायणी सारखीच आळंदीला भक्तीची नदी पण वाहू लागते. अष्टमीला सगळी मंडळी ज्ञानोबांचा आशीर्वाद घेतात. पंढरपूरला नेऊन विठूचे दर्शन घडव हे मागणं मागतात. आणि नवमीला इंद्रायणीच्या बरोबरीने ही भक्तीगंगा पण पंढरीच्या दिशेने वाहू लागते.

इंद्रायणीला वाटेत आणखी काही ओढे नद्या येऊन मिळतात. आपापल्या गाण्यासह ते तिच्या प्रवाहात मिसळून जातात. ही नदी समुद्रापर्यंतचा प्रवास, हसत नाचत, समुद्राचे गीत गात करत असते! तिच्या या समर्पित भक्तीने समुद्राला सुद्धा प्रेमाने भरती आली नाही तरच नवल!

पंढरीला निघालेली भक्तीगंगा सुद्धा, जणू इंद्रायणीने शिकवल्याप्रमाणेच हसत नाचत निघते. विठूचा गजर गात, पताका नाचवत आणिक दिंड्या तिला येऊन मिळतात! नामाचा गजर करत चाललेली ज्ञानोबांची तुकोबांची पालखी. हरि नामाचा गंभीर नाद, भगव्या पताकांचे तरंग, झांज, चिपळ्या आणि वीणेच्या साथीने भक्तीगंगा पंढरीकेडे वाटचाल करते. प्रत्येक नामाने पंढरीचे अंतर एकेका पावलाने कमी करत जाते. अवघी नदी हरीनामच्या गजरात पंढरीच्या रायाकडे धाव घेते. तो सावळा विठूराया विटेवर उभा राहून, टाचा उंचावून आपल्या भक्तांच्या वाटेकडे डोळे लावून थांबला असतो!

खरे तर ही भक्तीच्या पाण्याची नदी पण ती स्वत:च एक तीर्थक्षेत्र होऊन जाते. कोणीही यावे आणि न्हाऊन जावे! चार पावले बरोबर चालून अभंगात चिंब भिजून जावे! “राम-कृष्ण-हरि जय जय राम-कृष्ण-हरि” च्या गजरात स्वत:ला हरवून जावे!

वारीलाच तीर्थक्षेत्र म्हणायचे आणि एक कारण म्हणजे इथे असलेली समता. इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही! समुद्राला भेटल्यावर नदी समुद्ररूप होते खरी, पण वारीतील प्रत्येक जण पंढरपुरात पोचण्याच्या आधीच ‘माऊली’ झाला असतो! “विठूमाउली” चेच रूप होऊन गेला असतो!

वारी आधी फक्त पुरुषांची होती आणि कालांतराने स्त्रियांनी कुठलीशी क्रांती घडवून समानता मिळवली अशातला भाग नाही. वारी मध्ये स्त्रीला मिळालेली समता अगदी सुरुवाती पासूनची आहे. या समानतेचे बीज भगवत् गीतेत दिसते. भगवान म्हणतात –

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।। ९.३२ ||

पार्था! जो मनुष्य मला शरण येईल, तो वैश्य असो, शुद्र असो किंवा स्त्री असो, तो परमधाम प्राप्त करेल. भगवंतांनी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्ति मध्ये उच्च नीच असा भेद नाही. किंवा स्त्री – पुरुष असाही भेद नाही. भगवंताच्या भक्तीत सगळे समान आहेत. सर्व लोक परमपदाचे अधिकारी आहेत.

या श्लोकावर ज्ञानेश्वर म्हणतात –

तववरी नदानदींची नावे | तैवची पूर्वपश्चिमेचे यावे |
जैव न येती आघवे | समुद्रामाजी || ९.४६३ ||
हेची कवणे एक मिसे | चित्त माझा ठायी प्रवेशे |
येतुले हो मग आपैसे | मी होणे असे || ९.४६४ ||

नद म्हणजे प्रचंड मोठ्या नद्या जशा – ब्रह्मपुत्र किंवा सिंधू, व नद्या जशा गंगा किंवा गोदावरी यांना आपापली स्वतंत्र नावे आहेत; तसेच नर्मदा पश्चिमवाहिनी तर कृष्णा पूर्ववाहिनी अशी त्यांना विशेषणं मिळाली आहेत. परंतु ते नाम व विशेषण केवळ नदी समुद्राला मिळेपर्यंतच! एकदा का नदी समुद्रास मिळाली की त्यांच्या ठिकाणी भेद राहत नाहीत. तसेच माझ्यापासून विलग असे पर्यंतच वर्ण, जाती, स्त्री, पुरुष हे भेद! पण कोणात्याही निमित्ताने कोणाही व्यक्तीचे चित्त माझ्या ठायी प्रवेश करून राहिले, तर तो मीच होऊन जातो. माझ्या भक्तांमध्ये  धर्म, वर्ण, जात, स्त्री – पुरुष, लहान – मोठा, श्रीमंत – गरीब, नाकेला – नकटा, काळा – गोरा, अव्यंग – दिव्यांग असा कोणताही भेद नाही.

वारीची परंपरा जवळ जवळ ७०० – ८०० वर्षांच्या पूर्वीची. त्या वेळेपासूनच इथे स्त्री संतांचा मेळा दिसतो. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई, निर्मलाबाई, बहिणाबाई अशा कितीएक स्त्री संत होऊन गेल्या. विविध स्तरातील, विविध जातीतील स्त्री संत होऊन गेल्या. या स्त्री संतांनी शेकडो अभंग लिहिले आहेत. त्या पैकी सोयाराबाईंचा हा अभंग सुद्धा सर्व रंग / वर्ण एक झाले असेच तर नाही ना सांगत आहे?

अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग॥
मी, तू पण गेले वाया। पाहता पंढरीच्या राया॥
नाही  भेदाचे ते काम। पळोनी गेले क्रोध काम॥
देही असुनि तू विदेही । सदा समाधिस्थ पाही॥
पाहते पाहणे गेले दुरी। म्हणे चोख्याची नारी॥

ज्ञानेश्वरांची धाकटी बहिण मुक्ताबाई, फक्त नावाला धाकटी.  मुक्ताबाईंनी चांगदेवांनाच काय, नामदेवांना आणि ज्ञानदेवांना सुद्धा उपदेश केला आहे. संतांनी कसे असावे हे ताटीच्या अभंगात त्यांनी ज्ञानादादाला लडिवाळपणे सांगितले. आपण ते ज्ञानदेवांना सांगितले आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे सोयीचे असले, तरी ते अभंग समाजातील सज्जनांना मुक्ताबाईंनी दिलेला उपदेश आहे. लोकांच्या अवहेलनाने क्रोधीत आणि दु:खी झालेल्या ज्ञानादादाला चिमुरडी मुक्ताबाई म्हणते –

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा ||
विश्व रागे झाले वन्ही। संतसुखे व्हावे पाणी ||
शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश ||
विश्व परब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
संत जेथे व्हावे। जग बोलणे सोसावे ||
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान ||
लडिवाळ मुक्ताबाई। बीज मुद्दल ठायी ठायी ||
तुम्ही तरोन विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

मुक्ताबाईंनी चांगदेवांना स्त्री – पुरुष भेद हा केवळ वरवरचा असून, अध्यात्मात त्यांच्या मध्ये कोणताही भेद नाही हे पटवून दिले. तर नामदेवांना या अभंगातून अहंकार घालवण्याबद्दल सांगितले आहे –

अखंड जयाला, देवाचा शेजार | का रे अहंकार, नाही गेला ||
मान अपमान, वाढविसी हेबा | दिवस असता दिवा, हाती घेसी ||
घरी कामधेनु, ताक मागू जाय | ऐसा द्वाड आहे, जगामाजी ||
कल्पतरू तळवटी, इच्छिले ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली का ||

वारकरी पंथातील ही स्त्री संतांची परंपरा चालू राहिली. आज देखील वारीमध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असतो. डोक्यावर तुळस घेऊन मैलोंमैल चालणाऱ्या, मोकळ्या आवाजात अभंग गाणाऱ्या, वारीत फुगडी घालणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की अचंबीत व्हायला होते. वारीत येणाऱ्या कितीएक निरक्षर बायकांना ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तोंडपाठ असतात. तुकारामांचे, नामदेवांचे, एकनाथांचे शेकडो अभंग पाठ असतात … ही वारीचीच देणगी नाही का? जीवनाचे धडे देणारी वर्षातील २० दिवसांची शाळा म्हणावी का ही? गीता, भागवत शिकवणारी, अद्वैत तत्त्वज्ञान शिकवणारी शाळा म्हणावी का ही? की श्रवण आणि कीर्तन भक्तीचा अनुभव देणारी कार्यशाळा म्हणावी? संसारात राहून अध्यात्म कसे करावे हे शिकवणारे हे गुरुकुल आहे का? ज्ञानोबा – तुकोबांचे अविरत चालणारे फिरते गुरुकुलच म्हणावे, जिथे सर्वांना मुक्तद्वार आहे.

संतांना सुद्धा स्त्री झाल्याशिवाय विठूची भक्ती करता आली नसावी. स्त्री होऊनच भक्ती करतात की काय असे  वाटते. एकनाथांसारखा प्रखर भक्त सुद्धा एका सासुरवाशीण स्त्रीच्या रुपात आपली भक्ती गातो –

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी |
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ||

स्त्रीरूप घेतल्याशिवाय कदाचित आर्तता येत नसावी. कान्होपात्रेच्या या अभंगातील आर्तता भक्तीचा, शरणागतीचा कळस आहे –

नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ||
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले, मजलागी जाहले तैसे देवा ||
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई ||
मोकलूनी आस जाहले उदास, घेई कान्होपात्रेस हृदयांत ||

वारी, ही सहस्रावधी पावलांची यात्रा. हे लांबच लांब अंतर कापण्याची शक्ती कोठून येत असेल? विठूच्या भेटीची ओढीतून! प्रापंचिक जगात अशी सात्विक, निरपेक्ष, वात्सल्यपूर्ण प्रेमाची ओढ स्त्रीच्याच अभिव्यक्तीतून मांडता येत असावे.

भक्ती करण्यासाठी जसे स्त्रीरूप घ्यावे लागते तसेच देवाचे भक्तांप्रती प्रेम जाणण्यासाठी विठ्ठलाला सुद्धा स्त्री व्हावे लागले! विठूला माऊलीचे रूप घ्यावे लागले!

भक्तांच्या भेटीला आसावलेला विठ्ठल, जनाबाईला लेकुरवाळा दिसतो. तिच्या अभंगातला विठू भक्तांना अंगाखांद्यावर घेऊन खेळवतो. हाताला धरून चालवतो आणि मांडीवर घेऊन बसवतो. आईने लेकराचे लाड करावेत तसे विठू भक्तांचे कोड कौतुक करतो.

विठू माझा लेकुरवाळा | संगे गोपाळांचा मेळा ||
निवृत्ती हा खांद्यावरी | सोपानाचा हात धरी |
पुढे चाले ज्ञानेश्वर | मागे मुक्ताई सुंदर  ||
गोरा कुंभार मांडीवरी | चोखा जीवा बरोबरी |
बंका कडेवरी | नामा करांगुळी धरी   ||
विठू माझा लेकुरवाळा |
जनी म्हणे गोपाळा | करी भक्तांचा सोहोळा ||

संत नामदेव सुद्धा विठूला आई म्हणतात. तान्हे बाळ जसे आईवर विसंबून असते, तसे देवावर विसंबून असलेला, कसलीही फिकीर न करणारा, कोणत्याही संकटांना न भिणाऱ्या भक्ताचे हे वर्णन आहे –

तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा, पाजी प्रेमपान्हा, पांडुरंगे ||
तू माझी हरिणी, मी तुझे पाडस, तोडी भवपाश, पांडुरंगे ||
तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज, पांडुरंगे ||
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ, मागे पुढे उभा सांभाळीशी ||

विठू माऊलीला हाक मारणारा वारकरी त्याला लाडाने – ‘विठाई, किटाई, कृष्णाई, कान्हाई!’ असे आळवत पंढरीत येऊन पोचतो. इंद्रायणी सुद्धा इथे चंद्रभागेच्या रूपाने पोचली असते. चंद्रभागेच्या वाळवंटात, नामाचा झेंडा नाचवत गोपाळांचा मेळा रंगून जातो!

विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ||
वाळवंटी, चंद्रभागेच्या तटी, डाव मांडीला ||

तुकोबांच्या या अभंगातून तर सर्व नद्या एकमेकात मिसळून, भेदाभेद विसरून विठूच्या प्रेमात भिजून नाचतात! सर्व वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. जातीचा अभिमान सांडून एकमेकांचे पाया पडतात.

खेळ मांडीयेला वाळवंटी काठी | नाचती वैष्णव भाई रे |
वर्ण अभिमान विसरली याती | एक एका लोटांगणी जाती |
होतो जयजयकार गर्जत अंबर | मातले वैष्णव वीर रे |
तुका म्हणे सोपी केली पायवाट | उतरावया भवसागर रे |

समुद्राला भेटायला जाणारी इंद्रायणी यथावकाश समुद्रात मिसळून समुद्राशी एकरूप होऊन जाईल. पण विठूला भेटायला आलेली वारीची नदी, स्वत: ‘माऊली’ होऊन भवसागर तरून जाईल!

– दीपाली पाटवदकर 

नागपूर तरुण भारत मध्ये २०१९ आषाढी एकादशी निमित्त पूर्वप्रकाशित

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s