भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असं आपण शाळेतल्या प्रतिज्ञेत म्हणायचो.

ह्या विविध परंपरा जाती, भाषा, पेहेराव ह्या पुरत्या मर्यादित नाहीयेत. आपल्या देशातलं खाद्यजीवन हि एक मोठी परंपरा आहे आणि त्याचा मस्त अनुभव भारतात फिरताना विविध रंगांमध्ये आणि चवीने नटलेल्या पदार्थांकडे पहिलं कि येतो. मी काही भारतात आणि भारताबाहेर फारसा फिरलेलो नाहीये. पण जेवढे फिरलोय त्यात साईटसिईंगसोबत एन्जॉय करायचं मोठं अट्रॅक्शन म्हणजे त्या त्या ठिकाणचं खानपान.

हायजीन आणि चव ह्याचे प्रमाण बऱ्याचदा व्यस्त असतं, त्यामुळे त्या त्या प्रांतातल्या पदार्थांची खरी  चव रस्त्यावर किंवा रोडसाईड हॉटेलमध्ये मिळते. उगाच पॉश हॉटेल मध्ये ती मजा नाही. आपल्याकडे सध्या होटेलात जशी झणझणीत मिसळ मिळेल ती ताज किंवा ओबेरॉयमध्येही मिळणार नाही. अशीच परिस्थिती बर्याचदा सगळीकडेच असते.

जम्मूला सर्व होंटेल्स मध्ये राजमाच राजमा असतो. सर्व राजम्याचे दाणे घोळक्याने बसून भातासोबत शेक घेत असतात. एखाद्या दुकानात एका ठेल्यावर असं गुबगुबीत थुलथुलीत पनीर मांडी घालून बसलं असतं. थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या गालाला हात लावल्यावर ती जशी शहारतात, तसं ते पनीर हात लावल्यावर थरथरतं. बघूनच मजा येते.

अमृतसरमध्ये रस्त्यावरचे छोले भटुरे भारीच असतात. मक्कई दि रोटी आणि सारसो दा साग ह्याचं कौतुक पिक्चर वाल्यांनी मांडलेलं असतं. ते खाउन बघावं तर एवढा काही दम नसतो त्यात. कुठेतरी  रस्त्याच्या बाजूच्या दुकानात मस्त छोले आणि भटुरे असतात. भटुरे मस्त फुगून गरमागरम उसासे टाकत असतात, मजा येते खायला.

जेवणाच्या वेळी एखादा तंदूर मस्त धगधगत असतो, खालून विस्तव घातलेल्या तंदूरच्या शेजारी एखादा कळ्कट्ट पंजाबी रोट्या थापत असतो. रोट्या तंदूरच्या आतून बाहेर येताना स्वेटर घातल्यासारख्या जाडजाड होवून येतात, गरम असतात तोवर लुसलुशीत राहतात आणि मग लगेच संपवायच्या आणि तृप्त वगैरे व्हायचं.

मथुरा वृंदावनला रस्त्याच्या बाजूला कढईत दूध झक्कास उकळत लावलेलं असतं. दूध बिचारे लोकल ट्रेनच्या कड्यांसारखं इकडून तिकडे कढईत हिंदकळत असतं. हलवाई दुध ढवळत असतो. वरच्या सायीची त्याला पोटच्या पोरासारखी काळजी असते.

साडीवाले जसे प्रेमाने साड्या दाखवतात तसा दुधवाला प्रेमाने मोठ्या भांड्यात साय हँडल करत असतो, “अर्रे खाइये ना”  असं म्हणून आवडीने खायला घालतो. सोबत शेजारी गोड़ गोड़ ताजे माव्याचे गब्बू पेढे ठेवलेले असतात. छोट्या मुलांसारखे रुसून शाळेत एकत्र बसल्यासारखे.

राजस्थानला ‘पधारो मारे देस’ म्हणत जिथे तिथे मस्त वेलकम असतं. एखादा गणगौर उत्सव चालू असतो, दालच्या वाटीत चुरमा असा टण्टणित फुगून बसलेला असतो तुपाची वाट बघत.  जयपूरला शहराच्या मध्यभागी एक बरंच जुनं ‘लक्ष्मी मिष्ठान्न भांडार (एल एम बी) असतं. छान फरसाण पदार्थ आणि पेढे बर्फी तिथे मिळतात. त्या शेजारी मस्त थेपले सुद्धा. हाणायचे भरपूर.

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश किंवा नॉर्थला कुठेही खाण्याचे वांदे होत नाहीत. राजस्थान गुजरातला चहा बर्याच ठिकाणी चांगलाच असतो. मुंबईत जे चहावाले असतात त्यापैकी बरेचसे राजस्थानी आहेत. अनेकांना त्यांच्या चहाचं व्यसन लागतं. त्याचा मसाला हा बर्याचदा राजस्थान व गुजरातहून येतो. एका चहावाल्याने त्या मसाल्यात थोडा अफू असल्याचं खाजगीत सांगितलं होतं. म्हणूनच लोकं तिथे वारंवार चहा प्यायला जातात म्हणे.  असेलही कदाचित.

गुजरातेत थंडीच्या मौसमात ‘उबाळियो’ मिळतो. आपल्या उकडहंडी किंवा पोपटी सारखा. मस्त सुगडासारख्या छोट्या मडक्यांमध्ये. मिरचीच्या तिखटात भाज्या स्वत:ला मुरवून घेतात. साली सकट छोटे बटाटे आणि इतर शेंगा. व्वा !! थंडीत झणझणीत तिखटाची जिभेवर चरचर झक्कासच!!

मध्यप्रदेशात इंदोर उज्जैनला रसिकतेने लोकं खात असतात. पोहे हा महाराष्ट्रीय पदार्थ तिथे बहुतेक मराठ्यांसोबत गेला असेल. वडापाव फार कमी आहे तिथे. सकाळी प्लेटमध्ये  पोहे आणि जिलबी. पोट भरेल ह्याची ग्यरेण्टि. मांडूच्या रस्त्यावर काही ठिकाणी धाबे आहेत. धाब्यावरचे वडे सामोसे लाल काळ्या तेलात न्हाऊन बाहेर आलेले असतात. गरमागरम ओलेते  खाण्याची मजा और असते. आडवळणी एखाद्या धाब्यावर चक्क रायफल घेऊन एखादा वॉचमन उभा असतो. संध्याकाळी सिक्युरिटी म्हणून, आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, कचोरी वगैरे ओरपायची.

इंदूरला संध्याकाळी फेमस खाऊ गल्ली मांडलेली असते. चटपटीत चाट आयटम्स गुलाबजामला वगैरे रेटून बसलेले असतात. देखतेही दिल खुश. तिळ आणि गुळाच्या वडीला गजक हे नाव तिथे मिळालेलं असतं. वेगवेगळ्या प्रकारची गजक्स आणि भरपूर प्रकारचे फरसाण पदार्थ. क्या बात !!

आपल्याकडे महाराष्ट्रातली वरायटिसुद्धा भरपूर. खानदेशात तिखट जहाल अन्न. काही ठिकाणी अगदी चटणीच्या जागी साखर घ्यावी आणि जेवताना तोंडातून वाफेच्या ऐवजी ड्रागनसारखे आगीचे लोळ निघावेत इतकं तिखट. पुणामुंबईत खायची फारशी मजा नाही. किंवा तेच ते जेवून आता नाविन्य राह्यले नसावं.

पुण्याच्या एक्स्प्रेस वे चालू होतो तिथे एका होटेलात खानदेशी स्टैल झक्कास जेवण मिळतं. दाण्याची चटणी, पिठलं भाकरी, आणि बरंच काही. व्वा!! पुढचा मुंबई कडचा प्रवास सुकर करण्याचा मस्त पोटमार्ग.

आमच्या वसईत सामवेदी लोकांचे चटपटीत ‘वाल वांग्याचे गोळे’ एकदम स्पेशल. सामवेदी प्रचंड गप्पिष्ट, पण वाल वान्ग्यासाठी थोड्या गप्पा सहन करायच्या.

कोकणात अनेक ठिकाणी मोदक उत्कृष्ट मिळतात. पण दिवेआगरला भाटवडेकर आणि लिमये ह्यांचे मोदक सुपर स्पेशल. आत्तापर्यंत खाल्लेल्यात एक नंबर. जांभूळपाड्यालाही चांगले असतात, पण लिमयांकडच्या मोदकाची सर नाही बॉस. आणि येस – मोदक हे उकडीचेच, तळलेले तर वडेही असतात.

खाली गोव्यात ‘फुटी कढी’ असते. सोलकढीची चुलत मावस बहिण. नारळाच्या दुधापासून फारकत घेतलेली. मस्त तुप आणि लसणाची फोडणी दिलेली. वॉव एकदम. त्यासोबत कधी अळूच्या मुळाचे कापे असतात, किंवा नाचणीच्या वड्या. तेही वॉवच!!

दक्षिण भारत हि सांबार आणि रस्समच्या दिवान्यांसाठी हेवनली जागा. डोसे आणि इडली हे परमान्न मानणार्यांची चैन. ७-८ दिवसाच्या ट्रीपमध्ये  लिटर दोन लिटर सांबार आणि रस्सम ह्यावर झकास जगता येवू शकतं. सादा, मैसूर, मसाला डोसा वगैरे कॉमन. पण पोडी डोसा, पेसिरिट्टु वगैरे आपल्याकडे न मिळणारे.  “सार, इसमे गन पावडर होना, आपको नही जमना!” असं एखादा हैदराबादी सांगतो. “तुम लाना, हमको सब जमना!” असं म्हणत गन पावडरवाला  तिखट जाळ डोसा खायचा. जाम भारी!!

स्वत: फिरण्यात आणि खाण्यात जी धमाल आहे ती Travel कंपनीसोबत नाही आणि साध्या होटेलात जेवणाची मजा फ़ाइव्ह स्टार मध्येही नाही.

बाकी टिपिकल इंग्लिश ब्रेकफास्ट सुद्धा मस्त असतो. बेक्ड बीन्स, उकडलेले टोमाटो, मश्रुम्स, हाफ फ्राय, खरंच गव्हाचे ब्रेड्स आणि त्याचे टोस्ट, ज्यूस, बरा ह्या क्याटेगरीत मोडणारा चहा. पण आपल्यासारखी वरयटी तिथे नाही. एकंदरीतच भारतात जिथे तिथे खाणे ही एक ऐश असते. लोकं प्रेमाने खायला घालतात. मुंबई पुण्याबाहेर तर जास्तच प्रेमाने. दाल, रस्सा, सांबार, चटणी ह्याचा वाटी वाटीचा चिंधी हिशोब बाहेर नसतो.

नुसतं फिरण्यापेक्षा खात फिरण्याची गंमत और असते, रस्त्याशेजारी कुठे लस्सी प्यायची , कुठे उसाचा रस  प्यायचा, एखाद्या ठिकाणी बर्फाचा गोळा खायचा, कुठेतरी पेरू, संत्री, ओले काजू काहीही खायचं, अगदी बरा वाटला तर पेप्सीकोलासुद्धा खायचा.

माणसाची संस्कृती, त्याचे संस्कार, त्याचं प्रेम जिव्हाळा, त्याची आस्था त्याच्या जेवणात असते. जिथे जावू तिथून हे सर्व गोळा करून आणायचं! बारा गावचं पाणी खरोखर पिण्यात मजा असते.

असो. सध्या इतकेच. बाकीचा भारत पुन्हा कधीतरी!

तब तक खाते राहो!!

– सारंग लेले, आगाशी.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s