हेमाडपंत

हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला.  हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य मिळवले. वैद्यकशास्त्रातही तो निपूण होता.

एक आख्यायिका अशी ही आहे की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही ‘शिकस्ता’ या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो.

आख्यायिका बाजूला ठेवून आपण आता ऐतिहासिक माहीती पाहू. हेमाद्री पंडीत हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते . यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री होते. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना “श्रीकरणाधिप” (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.

हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाले. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील ‘चिंतामणी’ हा ग्रंथ, ‘आयुर्वेदरसायन’ हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केली. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्‍या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत.

स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे उदाहरण म्हणजे वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर आणि हेमाडपंती स्थापत्याचे उदाहरण  नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिर.

घृष्णेश्वराचे शिवमंदिर मंदिर प्राचीन असून, सोळाव्या शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार ‘ श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं’ हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे.

सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा मध्ययुगीन काळातील एक उत्कृष्ट नमुना होय. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाली. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही मानले जाते. हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झलक त्यावर दिसते.

– स्नेहल आपटे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s