कुषाण
चीनच्या वायव्य प्रांतात इ. स. पू १६५ मध्ये युह ची नावाची जमात राज्य करत होती. यांचे राज्य ५ वेगवेगळ्या प्रातांत विभागलेले होते. त्या प्रांतांवर वेगवेगळ्या टोळ्या राज्य करत होत्या. त्यातील कुई शुआंग नावाच्या टोळीचा सरदार कुषाण हा अत्यंत शूर व पराक्रमी होता. त्याने इतर चारही टोळ्यांवर आपले वर्चस्व स्थापित केले.
इ.स. १ ले शतक ते इ.स. ३ रे शतक या काळात कुषाणांचे राज्य भारताच्या वायव्य प्रांतात होते.
कुजुल कडफायसीस हा या राजवटीचा संस्थापक समजला जातो. कुजुल कडफायसीस याने पाचही टोळ्यांना एकत्र करुन बलाढ्य राज्याची निर्मिती केली. कुजुल कडफायसीस हा जवळ जवळ ८० वर्षे राज्यावर होता. त्याने आपला राज्यविस्तार मोठ्या प्रमाणात केला. त्याने काबूल, कंदाहार व वायव्य भारतातील गांधार प्रातावर राज्य करणार्या शक आणि इंडोग्रीक राजांचा पराभव केला. कुजुल कडफायसीस याची प्रारंभीच्या नाण्यांवर एका बाजुला इंडो ग्रीक राजा हर्मेस (Hermaeus) चेहेरा आहे. त्याच्या बाजूला खरोष्टी लिपीत त्याचे नाव आहे. मागील बाजूस कुजुल कडफायसीसचे नाव आलेले आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कुजुल कडफायसीस हा हर्मेसचा सामंत असावा किंवा त्यांचे संयुक्त राज्य असावे. यानंतरच्या कुशाणांच्या सगळ्या नाण्यांवर शक शासकांचा प्रभाव दिसतो. एका बाजूस राजाची प्रतिमा व दुसर्या बाजूस देवतेची प्रतिमा अशा प्रकारची नाणी त्यांनी पाडली.
कुजुल नंतर त्याचा मुलगा विम तख्तू हा राज्यावर आला. त्याची नाणी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
त्यानंतर राज्यावर आलेल्या विम कडफायसीस याने सिंधू नदीच्या पलीकडील पंजाब प्रांत, काश्मीर, सिंध व उत्तर प्रदेशचा भाग जिंकून बनारसपर्यंत आपला राज्यविस्तार केला. भारतात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्याची नाणी पाडणारा हा पहिला राजा होता. याच्या नाण्यांवर मागील बाजूस शिव, नंदी व त्रिशुळ कोरलेले दिसते. या परकीय राजांनी स्थानिक लोकांच्या देवता आपल्या नाण्यांवर कोरल्या. यावरून त्यांचे एतद्देशीय समाजाशी एकीकरण झाल्याचे दिसून येते.
विम कडफायसीस नंतर कुषाण राजवटीतील बलाढ्य राजा म्हणजे कनिष्क. कनिष्काने प्रारंभी विम कडफायसीस सारखीच नाणी काढली. नंतर त्याने नाण्यांवर येणारी ग्रीक, खरोष्टी व प्राकृत भाषांच्या बरोबरच तोखारियन भाषेचाही वापर केलेला दिसतो. कनिष्काच्या नाण्यांवरही ग्रीक, रोमन, इराणी तसेच भारतीय देवतांच्या प्रतिमा आढळतात.
कनिष्कानंतर हुविष्क हा राजा झाला. त्याने आपल्या नाण्यांसाठी सोने, चांदी, तांबे या धातूंचा वापर केला. हुविष्काच्या नाण्यांवर विशाख, महासेन व स्कंद यांच्या प्रतिमा पहिल्यांदा येतात.
वासुदेव दुसरा हा कुषाण राजवटीतील शेवटचा राजा होय. याच्या नाण्यांवर ब्राह्मी लिपी वापरलेली आढळते. याची नाणी आकाराने मोठी व कमी जाडीची आहेत. याच्या नंतर कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली.
यौधेय गणराज्य
यौधेय हे गणराज्य किंवा जनपद साधारणत: इ.स.पू २ र्या शतकापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान या प्रांतावर राज्य करत होते. या गणराज्याच्या अस्तित्वाचे भौतिक पुरावे फारसे मिळत नसले तरीही त्यांची नाणी बर्याच प्रमाणात मिळालेली आहेत. तसेच यौधेय गणराज्याचे उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमधे आलेले आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायी मधे यौधेयांचा आयुधजिवी असा उल्लेख सापडतो. शस्त्र हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन होते. यौधेय हे उशीनराचे वंशज असल्याचा उल्लेख हरिवंशात येतो. अर्जुनाने यौधेय, मालव व त्रिगर्त यांचा पराभव केला असा उल्लेख महाभारतातील कर्णपर्वात तसेच द्रोणपर्वात आलेला आहे.
यौधेयांची अनेक तांब्याची नाणी सापडली आहेत. सतलज आणि यमुना नद्यांच्या खोर्यांमधे यांची अनेक नाणी सापडली आहेत. त्या नाण्यांवर ’यौधेयगणस्य जय:’ व ’भगवतो स्वामिन ब्राह्मण यौधेय देवस्य’ असे लेख सापडतात. यौधेय या गणाचे मुख्य काम युध्द करणे असल्याने यांच्या नाण्यांवर देवांचा सेनापती कार्तिकेयाचे अंकन केलेले दिसते. यांच्या नाण्यांवर बहुधान्यके यौधेयनाम असाही लेख आलेला आहे. बहुधान्यक म्हणजे सध्याचे रोहतक असावे. यौधेयांची चांदीची नाणीही मिळाली आहेत. यौधेयांच्या मातीच्या मुद्रा लुधीयाना प्रांतात सापडल्या आहेत.
कार्तिकेयाचे अंकन असलेले आणि ’यौधेयगणस्य जय:’ असा लेख असलेले यौधेयांचे नाणे
यौधेय हे गण युध्दप्रविण होते. सिकंदरने भारतातील पंजाब प्रांत पादाक्रांत केला. पण त्याचे थकलेले सैन्य हे यौधेयांच्या धास्तीने व्यास नदीपलीकडे असलेल्या त्यांच्या प्रांतावर चालून जाण्याचे धाडस करु शकले नाही. क्षत्रप राजा रुद्रदामनच्या जुनागढ येथील शिलालेखात त्याने यौधेयांचा पूर्ण नाश केला असा उल्लेख येत असला तरी इ.स. ३ र्या शतकात यौधेयांनी आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. पंजाब प्रांतातून कुषाणांची सत्ता नष्ट करण्याचे बरेचसे श्रेय हे यौधेयांचे आहे. पुढे गुप्त राजवटीने यौधेय गणांचा पुर्ण नाश केला.
तिकिटावर असलेल्या यौधेयांच्या तांब्याच्या मुद्रेवर हरिणकुळातील प्राण्याचे अंकन केलेले आहे. त्याच्या वरती एक कलश असुन कलशाच्या वरच्या बाजूस ’श्री’ हे शुभचिन्ह अंकित केलेले आहे. या नाण्याच्या मागील बाजूस कार्तिकेयाचे अंकन केलेले आहे.
– स्नेहल आपटे