हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणेच आहे. साधारणत: पंधरा मीटर उंच व शंभर मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेले आहे. या कातळात चर मारून मंदिरासाठी वेगळा भाग घेण्यात आला आहे. या मंदिराकडे थोडे दुरून पाहिले तर, सर्वप्रथम दोन्ही बाजूंना असलेले दोन प्रचंड हत्ती नजरेत भरतात. त्यांच्या वरचे माहूत तर पैलवानांसारखे वाटतात.
मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. पटांगणातून सात-आठ पाय-या चढल्यावर या मंदिराचे पहिले प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक छोटासा चौक आहे. या चौकातून आत जाण्यासाठी आणखी एक प्रवेशद्वार आहे. यातून आत गेल्यावर एक प्रशस्त असा चौक आहे. या चौकात दोन्ही बाजूंना तीन-तीन दगडी खांब आहेत.
या चौकातून पुढे गेल्यावर गाभा-यात जाण्यासाठी पाय-या लागतात. या पाय-या चढून गेल्यावर आपण गाभा-यात प्रवेश करतो. हा गाभारा म्हणजे दहा ते बारा फूट व्यास असलेली एक गुहा आहे. गाभा-याची उंची जेमतेम सात फूट होईल. गाभा-याच्या मध्यभागी भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे.
या मंदिराचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे, मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बाराही महिने हा ओहोळ वाहत असतो.
या मंदिराचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचे पाणी गढूळ होते. त्यावेळी, मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झ-याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झ-याला ‘गंगा आली’ असे म्हणतात.
या मंदिराचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे, संपूर्ण हिंदुस्थानात, उंचावर शिवलिंग वसलेले हे एकमेव मंदिर आहे. या शिवलिंगावर कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते.
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
विमलेश्वराच्या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लोभावतात. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे.
प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पाय-या चढताच भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच, 3३५× ३०× १२ फूट क्षेत्रफळ असलेला सभामंडप लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळे आहेत. तेथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा , मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व पिंडीसमोर नंदीची मूर्ती . तेथील गाभा-यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात ज्यांचे पाणी स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो.
मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेचा मार्गही बांधून काढलाय. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे.
– स्नेहल आपटे