ओरिसा राज्यातील पुरातात्त्विक महत्त्व असलेली टेकडी. ही पुरी जिल्ह्यात कटकपासून २४ किमी. दक्षिण- नैर्ऋत्येस आणि भुवनेश्वरपासून ८ किमी. वायव्येस आहे. खंडगिरीला लागूनच उत्तरेस उदयगिरी आहे. या दोन्ही टेकड्यांवर इ. स. पू. दुसऱ्या शतकातील कलिंगराज खारवेलकालीन सुविख्यात व महत्त्वपूर्ण जैन गुंफासमूह आहे. समोरासमोरच्या या दोन टेकड्यांच्या नावांवरूनच हे गुंफासमूह ‘उदयगिरी- खंडगिरी’ या संयुक्त नावाने ओळखले जातात. वर्धमान महावीराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दोन्ही टेकड्या जैनांचे ‘अतिशयक्षेत्र’ म्हणून विख्यात आहेत. प्राचीन साहित्यातही याचा अनेकदा उल्लेख आढळतो. येथील प्रमुख गुंफा:
- तात्वा गुंफा १, २
- अनंतगर्भ
- खंडगिरी
- त्रिशूळ
- ललाटकेंद्र
- तेंतुली
- धानगर
- नवमुनी
- बारभुजी
- इंद्रकेसरी
यां शिवाय येथे आकाशगंगा, गुप्तगंगा, शाम आणि राधा आदी पाच जलकुंडे, तसेच टेकडीच्या शिखरावर एक जैनमंदिर व भग्नावस्थेतील काही जैन स्तूप आणि गुंफा आहेत. उदयगिरी ३४ मी. व खंडगिरी ४० मी. उंच आहे.
ओरिसा राज्यात भुवनेश्वरच्या वायव्येस सहा किमी. वर असलेली टेकडी. उदयगिरीच्या दक्षिणेस असलेल्या खंडगिरी टेकडीसह या परिसरात साठांवर मौर्यकालीन गुफा आहेत. भारतातील प्राचीनतम गुफांपैकी ह्या असून त्यांत जैन धर्मीय गुंफा प्रमुख आहेत.
या गुंफा इ. स. पू. १५५ च्या सुमाराच्या असाव्यात, असे हाथी गुफेतील लेखावरून कळते. जुना शिलालेख, गुफांतील रचनावैचित्र्य, स्थापत्यशैली, चित्रांमधील विविधता इत्यादींमुळे भारतातील महत्वपूर्ण गुफांमध्ये यांची गणना होते. तेराव्या शतकानंतरची जैनमंदिरेही येथे आहेत. त्यांपैकी खंडगिरीच्या माथ्यावरील पार्श्वनाथ मंदिराच्या प्रशस्त आवारातून चोहोबाजूचा सु. २४ किमी. पर्यंतचा रम्य देखावा दिसतो.
उदयगिरी टेकडीत स्वर्गपुरी या प्रवेशस्थानाच्या गुहेनंतर भरगच्च नक्षीची दुमजली राणीगुफा, गणेशगुफा, खारवेलाच्या कारकीर्दीचा इतिहास कोरलेली हाथीगुफा, वाघाच्या जबड्यासारख्या आकाराची वाघगुफा, स्वर्गगुफा, सर्पगुफा व तीनमजली पाताळगुफा या काही प्रेक्षणीय गुफा आहेत.
मध्य प्रदेश राज्याच्या विदिशा जिल्ह्यातील मानवनिर्मित गुफासमूह असलेले स्थळ. हे विदिशाच्या वायव्येस चार किमी. असून येथे सु. वीस गुफा आहेत. इ. स. पाचव्या शतकातील या गुफा असाव्यात. पहिली व विसावी गुफा जैनधर्मीय असून बाकी हिंदू आहेत. चंद्रगुप्तगुफा, शिवमंदिरगुफा, अमृतगुफा, जैनगुफा आणि वराहगुफा या त्यांपैकी काही महत्त्वाच्या होत.
स्नेहल आपटे