परशुराम

विष्णू पुराणात जग कल्याणासाठी भगवान विष्णूंनी दहा अवतार घेत समाजमनात एक सृष्टी निर्माण केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन असे पहिले पाच अवतार. पाचवा अवतार म्हणजे वामन हा जरी मनुष्यावतार असला तरी तो अपूर्णावस्थेतील मानला जातो. त्यादृष्टीने पूर्ण मानव म्हणून भगवान विष्णूंनी जो सहावा अवतार घेतला, तो भगवान परशुरामांचा. शस्त्र आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे हा अवतार असं मानलं जातं. त्यांचं खरं नाव राम. त्यांनी हातात परशू धरला म्हणून ते परशुराम. भृगू कुळामध्ये जन्मले म्हणून त्यांना भार्गवराम असेही म्हटले जाते.

महान तपस्वी जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी परशुराम यांचा जन्म झाला. भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांनी परशू हे शस्त्र मिळवले. या परशूमुळेच त्यांना परशुराम अशी ओळख मिळाली आहे. भगवान परशुरामांनी कोकणला समुद्रापासून वेगळं काढून स्वतंत्र भूभागाचे अस्तित्व मिळवून दिले. त्याची कथा मोठी रंजक आहे. परशुरामांचा जन्म जमदग्नी ऋषी व माता रेणुका यांच्या पोटी झाला. जमदग्नी हे ब्राह्मण आणि आई रेणुकामाता क्षत्रीय. त्यामुळे परशुराम हे वेदांचे अभ्यासकही होते आणि तितकेच पराक्रमीही होते.

जमदग्नी हे महान तपस्वी, व्यासंगी होते. अनेक शिष्योत्तमांमुळे त्यांचा आश्रम नेहमीच गजबजलेला असायचा. त्यांच्या आश्रमात कार्तवीर्य सहस्त्रार्जुन हा राजा आला असताना जमदग्नी ऋषींनीही आतिथ्यधर्माला स्मरून त्याची उत्तम बडदास्त ठेवली. त्याला आणि त्याच्या सैन्याला थोडक्या कालावधीत सुग्रास भोजनाची मेजवानी दिली. ‘एका ऋषीला हे कसे काय शक्य आहे?’ या राजाच्या कुतूहलाच्या शोध जमदग्नींच्या कामधेनू या इच्छापूर्ती करणाऱ्या गायीपाशी संपला. राजअहंकार जागृत झालेल्या राजाला ‘ही कामधेनू ऋषीपेक्षा राजाच्या पदरी शोभून दिसेल’ हा विचार अस्वस्थ करू लागला तसं त्याने दंभभरल्या स्वरातच ऋषींकडे कामधेनूची मागणी केली. राजाची लालसा ध्यानी आलेल्या जमदग्नींनी कामधेनू द्यायला नकार दिला.

ऋषींच्या त्या नकारानं राजाचा अहंकार दुखावला. त्यानं आपल्या सैन्यानिशी जमदग्नींच्या आश्रमावर हल्ला केला. या हल्ल्यात जमदग्नी ऋषींचा अंत झाला. रेणुका जखमी झाली. ही घटना घडली तेव्हा परशुराम आश्रमात नव्हते. परतल्यावर सारा प्रकार पाहून आणि मातेचा आक्रोश पाहून त्यांच्या मनात क्षत्रिय राजांविषयीचा तिटकारा निर्माण झाला. रागाच्या भरात त्यांनी एकटय़ाच्या बळावर अनेक राजांना कंठस्नान घातले.

एका कथेप्रमाणे माता रेणुका हिच्यावर शस्त्र फिरविल्यानंतर परशुरामांना पश्चाताप झाला. त्यांनी तब्बल २१ वेळा पृथ्वी निशस्त्र केली, याबाबतच्या अनेक पुराणकथा आपल्याला माहितीच आहेत. परशुरामांनी हा पराक्रम गाजवला असला तरी त्यांचा मूळ पिंड ऋषींचाच होता. त्यामुळे भानावर आल्यावर त्यांना आपल्या हातून नरसंहार घडल्याचा पश्चाताप झाला. मग पापाचं परिमार्जन करण्यासाठी जिंकलेली सगळी भूमी कश्यप ऋषींना दान देऊन परशुराम तपश्चर्येला निघाले. कश्यप ऋषींना दान दिलेली भूमी त्यांच्या मालकीची झाली. एकदा दान केलेल्या भूमीवर आपला हक्क नाही, म्हणून मग तपश्चर्या करायची कोठे?

मनात एकच विचार, आपण प्रतिसृष्टी निर्माण करायची. आपला स्वत:चा प्रदेश असणे आवश्यक आहे. आपल्याला नवनिर्माण करणे गरजेचे आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची दैवी ताकद असणारे परशुराम आर्यावर्ताचा प्रदेश पावलोपावले मागे टाकीत दक्षिणेकडे आले. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांवर अरबी समुद्राच्या फेसाळ लाटा आदळत होत्या. या धवल फेसाळ लाटातून संपूर्ण आर्यावर्त प्रदेश अरबी समुद्राला जणू काय आव्हानच होता.

वाशिष्ठीच्या शीतल जलाने आणि महेंद्रगिरी पर्वताने परशुरामाना मोहित केले.या प्रदेशात परशुरामांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा मनोमनी निश्चय केला. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांना सतत धडक देणा-या अरबी समुद्राला त्यांनी आपणास थोडासा भूप्रदेश दे अशी विनंती केली. पण गर्विष्ठ सागराने त्यांची विनंती अव्हेरली. उन्मत्तपणे त्याच्या फेसाळ लाटा सहय़ाद्रीच्या छाताडावर आदळत होत्या. परशुराम चिडले. आपले धनुष्य उचलले.

प्रच्यंताला बाण लावला आणि महेंद्रगिरी पर्वताच्या पठारावरून अरबी समुद्रावर सोडला. असे चौदा बाण त्यांनी समुद्रावर सोडले. अरबी समुद्र उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत पाच-सहा योजने मागे सरकला. आणि त्यातून प्रवाळयुक्त लाल जमीन वर आली. सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब असा प्रदेश निर्माण झाला. या प्रदेशास परशुरामांनी आपल्या आईच्या कोकणाईच्या नावावरून या अपरांत प्रदेशाचे नाव ‘कोकण’ ठेवले.

वाशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण-गुहागर येथे पहिली आर्य संस्कृती वसली. ही संस्कृती विकसित होत असतानाच परशुरामांचे पिता जमदग्नी यांनी वनौषधीचा लावलेला शोध आणि त्यातून निर्माण करण्यात आलेली वनौषधी सहय़ाद्रीच्या डोंगरकपारीत प्रसारित केली तर हिमालयाच्या प्रदेशात निर्माण झालेली साळी. हे भात आजचे आपले प्रमुख अन्न ठरले आहे. हे साळीचे भात परशुरामांनी आपल्या कोकण प्रांतात आणले तिची लागवड केली.

बी पेरावे आणि ते उगवल्यावर पुन्हा ते उपटून दुस-या जागी लावल्यावर चांगले फोफावते आणि त्याचे पीक मोठय़ा प्रमाणात मिळते ही  किमया त्यांच्याच संकल्पनेतून पुढे आली. त्रेता युगातील वास्तू विशारद असलेले महामुनी भृगू! तत्कालीन नगररचना, पाणीसाठे, करणे, सहय़ाद्रीच्या कुशीतून वाहणारे निर्मळ झऱ्याचे पाणी लहान लहान बांध घालून अडविण्याची पद्धती भृजूसहितेतील. तर मातीची कौलारू चौकाची घरे, घराच्या समोर अंगण आणि त्या अंगणात दररोज दर्शन घ्यावे लागणारे वृंदावन, घराच्या सान्निध्यात केळी, पोफळी, बागबगीचा असावा ही भृगू संहितेतील नगररचनाही त्यांनीच या प्रदेशात साकारली. हेच कोकणचे वैशिष्टय़ आहे.

याच भूमीतील महिंद्र पर्वतावर परशुरामांनी आपली तपश्चर्या केली. हा महिंद्र पर्वत म्हणजे आताचे चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर जेथे आहे, तो परिसर असल्याचे मानले जाते. इथे अनेक र्वष तप केल्यानंतर मग ते तीर्थयात्रेला निघून गेले. परशुराम चिरंजीव आहेत त्यामुळे ते रोज सकाळी तीर्थयात्रेला जातात आणि संध्याकाळी या ठिकाणी परत येतात अशी समजूत आहे.

परशुराम यांच्याबद्दल ब्रिटिश अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यांमधून थोडी वेगळी माहिती पुढे येते. एकेकाळी या भागामध्ये नाग वंशीयांची दाट वस्ती होती. मात्र जंगलातील हिंस्त्र श्वापदे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटा यामुळे हा समाज भयभीत होता. सततच्या या भीतीमुळे त्यांनी देवाचा धावा सुरू केला. त्यांची हाक ऐकून भगवान परशुरामांनी त्यांना अभय दिलं आणि त्यांच्यासाठी कायम इथेच वास्तव्य केलं, असे क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या ‘लिजेंड्स ऑफ कोकण’ या पुस्तकात नमूद केले आहे. या कोकणातील जंगलात राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी भगवान परशुराम कोकणात आले, असा निष्कर्ष त्यानं काढला आहे.

समुद्र मागे हटवून परशुरामांनी स्वत:साठी भूमी निर्माण केल्याची कथा केवळ कोकणातच नाही तर पश्चिम किनारपट्टीच्या सर्वच भागांमध्ये सांगितली जाते. अगदी गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंतचा भाग हा परशुरामांनीच निर्माण केल्याचं मानलं जातं. केरळ, ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहेत.

चिपळूणमध्ये उभारण्यात आलेल्या मंदिराबाबत दोन कथा आहेत. एक कथा आहे ती कोकणातील अनेक मंदिरांबाबत सांगितली जाते. तशीच गाईच्या पान्ह्याची तर दुसरी कथा दृष्टांताची! मंदिराच्या रचनेमध्ये मुघल वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. असे संपन्न कोकण बनविणाऱ्या भूमीला शापित का म्हटले जाते.?हा शाप कोणी दिला ? कशामुळे हा कलंक या भूमीला लागला? या प्रश्नाची उत्तरे कोकणचा निर्माता भगवान परशुराम यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात.

पुराणातील कथा, इतिहास संशोधक यांची, शापवाणीबाबत अनेक मतमतांतरे आहेत मात्र एक खरे की, कोकणची संपन्नता, प्रगल्भतेचा इतिहास पाहता या शापवाणीचा ग्लोबल युगातही प्रत्यय येतो. काहीसा आध्यात्माचा भाग सोडला अथवा गृहीत धरला तरीही..

परशुरामाने कोकण हे आपल्या क्रोधातून समुद्राला हटवून निर्माण केले.  यामुळे क्रोधाप्रमाणे लाल रंगाची माती असलेली भूमी पुढे आली. या भूमीत जेव्हा आदीशक्तीचे आगमन झाले तेव्हा या भूमीची तप्तता पाहून ती अस्वथ्य झाली. संतापून आदीशक्तीच्या मुखातून ‘जळो ते कोकण’ असे नकळत शब्द निघाले. मग काय साक्षात आदीमायेची वाणी शाप बनून कोकणावर कहर बरसवू लागली.

कोकण जळू लागले. प्रकृतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊ लागले. घडलेला प्रकार पाहून सर्व देवतांनी आदीमायेला विनवणी केली. मातेने या भूमीला ‘जळो पण पिको’ असा उपशाप दिला. आजही कोकणात याची अनुभूती पाहायला मिळते. कोकणातील शेती करण्याआधी शेताचे भाग जाळले जातात, मगच त्यात पीक घेतले जाते. अशी एक कथा सांगितली जाते.?तर दुसरी एक पुराणकथा आहे.

संपन्न कोकण केल्यानंतर परशुरामाने येथील जनतेचा निरोप घेतला. या दरम्यान त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. निघतेवेळी भगवानांनी एक महामंत्र दिला संकटसमयी हा मंत्र म्हणावा मी प्रकट होईन असे सांगितले.?संपन्नता असल्यामुळे जनता आनंदीत होती.अशा वेळी भगवानांनी सांगितलेला मंत्र खरा आहे का नाही याची खात्री करण्यासाठी या भूमीतील काही मंडळी एकत्र होऊन गाऊ लागली.?भगवान प्रकट झाले.संकट काय म्हणून विचारू लागले यावेळी जनता हसू लागली.

भगवान आम्हाला संकट कोणतेच नाही.तुम्ही हा मंत्र दिला तो खरा आहे की नाही, हे पाहायचे होते.असे सांगताच परशुराम क्रोधीत झाले.?त्यांनी येथील जनतेला शाप दिला.तुम्हाला एकत्र येणे यापुढे संगनमताने जमणार नाही. आणि उत्कर्षाचा उपभोग घेता येणार नाही.. संपन्नता असूनही कोकणचे असलेले चित्र पाहता. या परशुरामाची सातत्याने पुन्हा-पुन्हा जाणीव होते. हे सत्त्व आजही या भूमीत पाहायला मिळते.

चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम चिपळूणपासून १० कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचे संदर्भ आढळतात. हे मंदिर ३०० वर्षापूर्वीचं आहे. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम अशा तीन मूर्त्यां आहेत. या देवळातच बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. हा मारुती दक्षिणाभिमुख आहे. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात दक्षिणाभिमुख मारुतीची स्थापना केली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s