होयसळ वास्तुकला-शिल्पकला इ. स. ११०० ते इ. स. १४०० यादरम्यान विकसित झाली. ही कर्नाटकातील एक वैभवशाली राजवट होती. आपण मध्य कर्नाटकातील हावेरीपासून हनगल, बंकापूर, राणीबेन्नूर, हरिहर, चित्रदुर्ग ही सगळी ठिकाणे पाहिली. हरिहरपासून शिमोगा-चिकमंगळूरमार्गे हळेबिडू येथे जाता येते.
हळेबिडूचा अर्थ होतो नष्ट झालेले गाव किंवा जुने गाव. पूर्वी या गावाला समुद्रद्वार असेही म्हणत असत. हे गाव बहामनी राजवटीत दोन वेळा नष्ट झाले. तरीही याचे सौंदर्य लक्षवेधक आहे. प्रामुख्याने वैष्णव आणि जैन प्रकारातील येथे असलेली मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत खजिना आहे. हळेबिडू हे ठिकाण कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात आहे.
होयसळ घराण्यातील राजा विष्णुवर्धन याने इ. स. ११२१मध्ये हळेबिडू या सुंदर गावात राजधानी वसवली. तसेच अनेक सुंदर मंदिरे बांधली. या मंदिराचे काम साधारण इ. स. ११६०पर्यंत सुरू होते. होयसळ राजवटीत कर्नाटकातील या परिसरात ९५८ ठिकाणी सुमारे १५०० मंदिरे बांधली गेली. त्यातील अनेक ठिकाणां माहिती आपण याआधीच्या लेखांमध्ये घेतली आहे. जेम्स सी. हॉर्ल या संशोधकाने दक्षिण भारतातील वास्तू, मंदिरे आणि शिल्पकलेचा सखोल अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात हळेबिडू व बेलूरचे सुंदर वर्णन केले आहे. त्यामुळे अनेक परदेशी पर्यटकही येथे भेट देतात.
होयसळेश्वर मंदिर : या मंदिरात शिवपार्वती, श्री गणेश, उत्तर व दक्षिण नंदी आणि दुर्गा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच रामायणाचे देखावे कोरलेले असून, मंडपावरील छत, तसेच बाहेरच्या सर्व भिंतींवर शिल्पकला ओतप्रोत भरली आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर अत्यंत बारीक नक्षीदार शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. त्यामध्ये वरून खाली वेगवेगळ्या स्तरांवर शिल्पपट्ट्या आहेत. तसेच हत्ती, सिंह, निसर्ग, घोडे, हिंदू ग्रंथ, नर्तक, पौराणिक दृश्ये, मगरी आणि हंस व इतर प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पपट्ट्या जवळजवळ २०० मीटर लांबीच्या आहेत. त्यात रामायण आणि भागवतातील प्रसंग दर्शविले आहेत. तसेच मंदिराच्या बाह्य भिंतीवर हिंदू महाकाव्यांचे चित्रण केलेले आहे. मधील मोठ्या पॅनल्सवर देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. महाकाव्यांशी संबंधित असलेल्या या पट्ट्या आश्चर्यकारक आहेत.
बाहेरील भिंतीवर दरबारातील दृश्ये, भैरव, भैरवी, समुद्रमंथन, १२व्या शतकातील संगीतकारांसह वाद्ये, शुक्राचार्य, कच, देवयानी यांच्या पौराणिक कथा, लक्ष्मी, उमा-महेश्वर, वामन-बाली-त्रिविक्रमा आख्यायिका, इंद्राची पौराणिक कथा, वीरभद्र, योगमुद्रेतील शिव अशी अनेक शिल्पे आहेत. शिवमंदिराच्या आग्नेयेकडील बाहेरील भिंतीवर नर्तक-नर्तिकाआहेत, तर ईशान्य बाजूवर भागवत, कृष्णाची लीला, कृष्ण जन्म, त्याचे सवंगड्याबरोबरचे खेळ, युधिष्ठिर व शकुनी द्यूताचा खेळ, कीचकवध इत्यादी प्रसंग कोरलेले आहेत. एका भिंतीवर भीष्मपर्व, द्रोणपर्व, अर्जुनाचा द्रोणाचार्यांवर विजय, तसेच नर्तक-संगीतकार यांची शिल्पे आहेत. महाभारतामधील कृष्णपर्वासह अर्जुन, नर्तकांनी पांडवांचा विजय उत्सवपूर्वक साजरा केला ते दृश्य, मोहिनी आख्यान, शिव पार्वतीच्या विवाहामध्ये नृत्य करणारे नर्तक ही शिल्पेही एका भिंतीवर आहेत. मंदिरांच्या अनेक आर्टवर्क पॅनल्समध्ये कलाकारांची नावे, स्वाक्षऱ्या दिसून येतात
केदारेश्वर मंदिर : हे मंदिर प्रसिद्ध होयसळेश्वर मंदिरापासून जवळच आहे. हे शिवमंदिर होयसळ राजा वीर बल्लाळ दुसरा व त्याची पत्नी केतलादेवी यांनी ११७३ ते ११२० दरम्यान बांधले. सरकारने हे मंदिर राष्ट्रीय महत्त्वाचे एक स्मारक म्हणून संरक्षित केले आहे. कला इतिहासकार अॅडम हार्डी यांच्या मते, मंदिर इसवी सन १२१९पूर्वी बांधण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम कोरीव काम करता येण्याजोग्या सोपस्टोन प्रकारच्या पाषाणात करण्यात आले आहे. या दगडाचा वापर १२व्या आणि १३व्या शतकात मोठ्या प्रमाणात केला जात असे. होयसळ पद्धतीच्या मंदिरात आतील बाजूला गाभाऱ्यांच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग न ठेवता बाह्य बाजूने पाच ते सहा फूट रुंदीच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. त्यामुळे भिंतीवरील शिल्पकला पाहता येते. हे मंदिरही कलेने भरलेले आहेच. आतील छतावर मध्यभागी गोलाकार असलेले नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. केदारेश्वर मंदिर आणि होयसळश्वर मंदिर या दोन्ही स्थळांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळणे प्रस्तावित आहे.
जैन मंदिर: ११व्या ते १४व्या शतकादरम्यान होयसळ राज्याची राजधानी असलेल्या हळेबिडू पारिसरामध्ये जैन लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. केदारेश्वर व होयसळेश्वर मंदिराबरोबरच तीन जैन मंदिरांची उभारणीही येथे करण्यात आली. राजा विष्णुवर्धन जैन होता. परंतु त्याने हिंदू संत रामानुजचार्य यांच्या प्रभावाखाली वैष्णव धर्मात प्रवेश केला; मात्र त्याची पत्नी शांतलादेवीने मात्र जैन धर्म सोडला नाही. जैन मंदिरांपैकी पार्श्वनाथ मंदिर हे त्यातील सुंदर नवरंग हॉल आणि खांबावरील उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. १८ उंचीची पार्श्वनाथाची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य. यक्ष आणि पद्मावतीची इतर सुंदर शिल्पे येथे आहेत. जवळच संग्रहालय आहे. तेथे अनेक पुरातन वस्त्यांचा ठेवा जपून ठेवला आहे.