भुवनेश्वर मंदिरांचे शहर

ऒडिशाचा ऐतिहासिक वारशाचा भौतिक पुरावा हा इ.स.पू. ३ र्‍या शतकापासून म्हणजेच अशोकाच्या काळापासून बघायला मिळतो. पण वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उत्खननावरुन येथे १०-१५ हजार वर्षांपूर्वी असलेल्या मानवी वस्त्यांचे पुरावे मिळाले आहेत.ओडिशा मंदिरांची ही सफर भुवनेश्वरमधील इतर मंदिरांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. भुवनेश्वरमधील ही मंदिरे अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. या मंदिरांच्या स्थापत्यात अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात. कालानुरुप या स्थापत्यशैलीमध्ये झालेले बदल आपल्याला बघायला मिळतात. या मंदिरांवर कुठलेही टपाल तिकीट नसले तरीही त्यांचा आढावा घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

ओडिशा स्थापत्यशैलीची सुरुवात ५ व्या शतकात झालेली होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नेश्वर या नावांनी असलेल्या मंदिराचा एक समूह भुवनेश्वरमध्ये आहे. या सर्व मंदिरांमधील शत्रुघ्नेश्वर हे मंदिर सर्वात प्राचीन आहे. शत्रुघ्नेश्वर मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मण व भरत ही मंदिरे आहेत. पण या दोन्ही मंदिरांची बरीच पडझड झालेली आहे. या तीनही मंदिरांच्या समोरील बाजूस रामेश्वर हे मंदिर आहे. पण त्याच्या स्थापत्यशैलीवरुन ते नंतरच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज बांधता येतो.

लिंगराज मंदिराच्या परिसरात बिंदुसागर तलावाच्या भोवती अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. अनेक मंदिरे ही खाजगी जागेतही आहेत. या सर्व मंदिरांमधील काही मंदिरे म्हणजे मुक्तेश्वर, परशुरामेश्वर, वेताळ, सिध्देश्वर ही शैव मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमधे अनंत वासुदेव हे एकमेव वैष्णव मंदिर आहे.

 

परशुरामेश्वर मंदिर

हे मंदिर ६ व्या शतकात बांधले गेले. हे मंदिर पश्चिमाभिमूख असून हे मंदिर आत्ताच्या जमिनीच्या पातळीपासून थोडे खाली आहे. गर्भगृहावर शिखर म्हणजेच रेखा देऊळ असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ओडिशा शैलीतील मंदिरांमधे गर्भगृहाच्या समोर भोगमंडप असतो व त्यावर पॅगोडाच्या आकाराचे शिखर असते. या शिखराला ओडिशा शैलीमधे पिढा देऊळ असे संबोधले जाते. परशुरामेश्वर मंदिरात गर्भगृहासमोर आयताकृती मंडप असून त्यावर शिखर नाही. मंडपाचे छप्पर उतरते आहे. मंडपाच्या भिंतींना जाळीच्या खिडक्या आहेत. मंदिर हे शिवाचे असून या मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर सप्तमातृका व गणपतीचे सुंदर शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक कोनाडे (देवकोष्ट) आहेत. या देवकोष्टांमधे कार्तिकेय व गणपतीची शिल्पे आहेत. याच बरोबर बाहेरील भिंतींवर अनेक प्राण्याची व उपासकांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराच्या परिसरातच एक सहस्त्रलिंगही आहे. ऒडिशा मधे लकुलीश या शिव भक्ताने स्थापन केलेल्या पाशुपत पंथाचा प्रभाव होता. परशुरामेश्वर मंदिरावर लकुलीशाचे शिल्पांकन आढळते.

 

वेताळ मंदिर

वेताळ देऊळ हे परशुरामेश्वर या मंदिराच्या नंतरच्या कालखंडात बांधले गेले. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे त्याचे शिखर. दक्षिणेकडील मंदिरांना गोपुरे असतात. त्याच पध्दतीचे हे शिखर आहे. या शिखराला खाकरा शिखर असे म्हणले जाते. या मंदिराला इंग्रजी T आकाराचा मंडप असून त्यावर कुठलेही शिखर नाही. या मंदिराच्या प्राकारात आणखी चार लहान मंदिरे आहेत. या मंदिराचे नाव वेताळ असले तरी गर्भगृहात चांमुडा देवी आहे. या मंदिरावरही लकुलीशाची प्रतिमा कोरलेली आहे.

 

मुक्तेश्वर मंदिर

एका प्राकारात असलेले ह्या मंदिरावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेले मकरतोरण. या मंदिरामधे पूर्ण विकसीत झालेली ऒडिशा शैली बघायला मिळते. या मंदिराच्या मागील बाजूस एक पाण्याचे कुंड आहे. मुक्तेश्वर मंदिराच्या शेजारीच सिध्देश्वर मंदिर आहे.

 

अनंत वासुदेव मंदिर

बिंदूसागर तलावाच्या काठाशीच अनंत वासुदेव हे एकमेव विष्णूचे मंदिर आहे. मंदिराचे विधान (Plan) हा लिंगराज मंदिराप्रमाणेच आहे. या मंदिरात एका बाजूस मोठी पाकशाळा असून त्यात मंदिरात चढवण्यात येणारा भोग किंवा प्रसाद बनवला जातो. मातीच्या मडक्यांमधे भाताचे विविध प्रकार, भाज्या यापासून हा प्रसाद बनवला जातो.

 

राजा राणी मंदिर

११ व्या शतकात भुवनेश्वरच्या पूर्व भागात राजा राणी हे मंदिर बांधले गेले. एकांम्र पुराणात या मंदिराचे नाव इंद्रेश्वर असे आले आहे. या मंदिराचे शिखर हे पारंपारीक ओडिशा शैलीतील नसून ते नागर शैलीतील शेखरी शिखर आहे. मात्र गर्भगृहासमोरील जगमोहनावर मात्र पिढा देऊळ आहे. हे मंदिर बहुधा दोन वेगवेगळ्या कालखंडात बांधले गेले असावे कारण मंदिराच्या स्थापत्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. सध्या मंदिराच्या गर्भगृहात कुठलीही मूर्ती नाही. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर असे दिग्पाल कोरलेले आहेत. याचबरोबर भास्करेश्वर हे शिलास्तंभावर बांधलेले मंदिरही भुवनेश्वरच्या पूर्व भागात आहे.

 

६४ योगिनींचे मंदिर

भुवनेश्वरमधील या मंदिरांबरोबरच ओडिशातील एका वैशिष्ठ्यपूर्ण मंदिराचा उल्लेख करणे गरजेचे आहे. भुवनेश्वरपासून २० कि.मी. अंतरावर हिरापूर येथे चौसष्ट योगिनी नावाचे मंदिर आहे. शाक्त संप्रदायातील तंत्रमार्गी उपासकांचे हे मंदिर आहे. भारतात जी थोडी योगिनींची मंदिरे आहेत त्यातील हिरापूर हे एक महत्वाचे मंदिर आहे. ६४ योगिनींचे आणखी एक मंदिर मध्य प्रदेशातील रानीपूर येथे आहे. ६४ वेगवेगळ्या योगिनींच्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराची रचना गोलाकार असते व मध्यभागी शिव किंवा भैरवाची स्थापना केलेली असते. मंदिराच्या गोलाकार भागात ६४ देवकोष्टांमधे ६४ योगिनींच्या मूर्ती असतात. हिरापूर येथील मंदिराचा व्यास ९ मीटर आहे. हे मंदिर इ. स. ९ – १० व्या शतकात बांधले गेले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s