मानवाची सर्वात प्राचीन साहित्य निर्मिती म्हणजे वेद. वैदिक साहित्या बद्दल गौतम धर्म सूत्रात म्हणले आहे की – सर्व धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे मूळ वेद आहेत.
वेदोऽखिलो धर्ममूलम |
प्राचीन काळापासून, भारतीयांनी वेदवाक्यांवर परम श्रद्धा ठेवली. वेद अपौरुषेय असून ते लिहिणारे ऋषी, हे वेदांचे कर्ते नसून द्रष्टे होते असे मानले जाते.
हजारो वर्ष, अनेक पिढ्यांनी वेद कंठस्थ करूनहा प्राचीन ठेवा जतन केला. अत्यंत कठीण अशा अनेक नैसर्गिक व मनुष्य निर्मित आपत्तींना तोंड देत, वैदिक परंपरा चालू राहिली, हे महदाश्चर्य आहे.
या मौखिक परंपरेत वेदपाठांमध्ये काडीचाही बदल होऊ नये म्हणून, प्रत्येक वेदाचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून अक्षरन् अक्षर मोजून ठेवण्यात आले. वैदिक संहिता – “जटा”, “माला”, “दंड”, “रेखा”, “रथ”, “ध्वज”, “शिखा” व “घन” या अष्टविकृतींमध्ये घट्ट विणल्याने हे शक्य झाले.
पूर्वी एकच वेदिक संहिता होती. यज्ञविधीच्या अनुरोधाने व्यासांनी त्या संहितेचे चार भाग करून एकेका शिष्याकडे एक एक भाग दिला. पुढे भौगोलिक कारणाने, गुरुशिष्य परंपरेने वेदांच्या विविध शाखा अस्तित्वात आल्या. मात्र कालौघात बऱ्याचशा शाखा आता लुप्त झाल्या आहेत.
प्रत्येक वेदाचे ४ विभाग पडतात –
संहिता | मुलमंत्र व सुक्त. प्रत्येक सुक्ताला एक देवता, एक छंद व एक ऋषी |
ब्राह्मण | या ग्रंथात यज्ञातील विधी कसे करायचे याची माहिती मिळते. हा यज्ञ पूर्वी कोणी केला, का केला व त्याला काय फळ मिळाले या बद्दलच्या कथा व आख्याने देखील ब्राह्मण ग्रंथात वाचावयास मिळतात.
ब्राह्मण वाक्य १० प्रकारची आहेत – हेतू: (का करायचे), निर्वाचन (etymology), निंदा (का करायचे नाही), प्रशंसा (का करायचे), संशयो (confusion असेल तर काय करायचे), विधी (instructions), परक्रिया (आणखी कोणी केला त्याची कथा), पुराकल्प (पूर्वी कोणी केला त्याची कथा), व्यावधारणकल्पना (काळ व संख्या) व उपमान (उपमा देणे) |
आरण्यक | अरण्यात जाऊन केलेले चिंतन, या ग्रंथात तत्वज्ञान रूपात पाहायला मिळते. इथे कर्मकांड सोडून ज्ञानकांडाकडे वाटचाल सुरु होते. काही वेदात अरण्यके दिसत नाहीत, तिथे कदाचित उपनिषदांपर्यंत जाण्यासाठी मधल्या पायरीची गरज भासली नसावी. |
उपनिषद | हा वेदांचा अंतिम भाग असून, याला वेदांत असे देखील म्हणतात. या मध्ये मुख्य तत्त्वज्ञान येते. गुरूंच्या जवळ, पायाशी बसून शिकणे अपेक्षित. केवळ अविद्येत रमलेल्या मानवाला विद्येच्या रस्त्याने नेऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हा उपनिषदांचा हेतू आहे. ज्याला विद्येची तहान आहे, तोच हे शिकण्यास पात्र आहे. येथे वर्ण – जाती – स्त्री – पुरुष असा भेदभाव नाही.
उपनिषदांची संख्या ५०० पर्यंत सांगितली जाते. पैकी १० प्रमुख आहेत – ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, ऐतरीय, बृहदारण्यक |
ऋग्वेद
ऋग्वेदाच्या शकल, बाष्कल, शांखायन, आश्वलायन, मांडूकायन आदी २१ शाखा होत्या. त्यापैकी आता शाकल व बाष्कल या दोनच उपलब्ध आहेत. बाष्कल शाखेत शाकल शाखेपेक्षा ८ सूक्त अधिक आहेत.
ऋग्वेद संहितेचे विभाजन दोन प्रकारे केले आहे – मंडल व अष्टक. मंडल मध्ये – १० मंडल, ८५ अनुवाक व १०१७ सूक्त आहेत. तर अष्टक मध्ये – ८ अष्टक, ६४ आध्याय व २०८ वर्ग आहेत.
यजुर्वेद
वैशंपायन कडून याज्ञवाल्क्य ऋषींनी यजुर्वेद शिकला. परंतु त्यांच्यामध्ये काही वाद झाले, तेंव्हा वैशंपायनने आपली वेदविद्या परत मागितली. याज्ञवाल्क्यने यजुर्वेदाचा त्याग केला व नवीन विद्येसाठी सूर्याची उपासना केली. सूर्याने वाजी रूपाने याज्ञावाल्क्यला याजुर्वेदाची नवीन संहिता शिकवली. ही संहिता वाजसनेयी या नावाने जाणली जाते. तर वैशंपायनचे वडील बंधू तैत्तिरीय ऋषींनी जुन्या यजुर्वेदाचा प्रचार केला म्हणून ती शाखा तैत्तिरीय या नावाने ओळखली जाते.
वाजसनेय यजुर्वेदात केवळ मंत्रांचा संग्रह आहे म्हणून तो शुक्ल यजुर्वेद या नावाने देखील ओळखला जातो. तर तैत्तिरीय यजुर्वेदात संहितेत मंत्रांबरोबर ब्राह्मण भागाचे मिश्रण आहे म्हणून तो कृष्ण यजुर्वेद म्हणूनही ओळखला जातो.
सारस्वतपाठ व आर्षेयपाठ प्रचलित असून, पाठांतरासाठी प्रतीकपाठ, सकलमंत्रपाठ व अनुषंगिकपाठ वापरले जातात. शुक्ल यजुर्वेदात ४० आध्याय आहेत.
सामवेद
सामवेदात ७० / ८० मंत्र सोडता सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. सामवेदाचे अस्तित्व रुग्वेदामुळे असल्याने, ऋचा व सामन् हे माता – पुत्र समजले जातात. ऋग्वेदाच्या ८ व्या व ९ व्या मंडलातीलच रुचांचे प्रमाण अधिक आहे.
देवतांना प्रसन्न करण्यासाठी साम गायन केले जात असे. भारतीय संगीताचे मूळ साम वेदात आढळते. ७ स्वर प्रचलित होते. त्यांची नवे – कृष्ट (म), प्रथम (ग), द्वितीय (रे), तृतीय (सा), चतुर्थ (ध), मंद्र (नि), अतिस्वर्य (प) लेखनात स्वरांचा निर्देश १ ते ७ आकड्यांनी केला जातो. पैकी १ – ५ हेच अंक सर्वत्र आढळतात. ३ सप्तक – उदात्त, स्वारीत व अनुदात्त वापरले जात.
सामागायानाचे ४ प्रकार – ग्रामागेयगान, अरण्यगान, उहागान व रहस्यगान. ऋचा लयीत बसवण्यासाठी मंत्रांमध्ये बदल केले जात असत. जसे अधिक ‘ई’, कधी शब्द फोडणे, ऱ्हस्व – दीर्घात बदल, शब्द गाळणे अथवा पुन्हा घेणे किंवा नसलेला शब्द घालणे.
अथर्ववेद
ऋग्वेद काळात रचला गेला असला तरी, अथर्ववेदाला वेद म्हणून उशिरा मान्यता मिळाली. श्रौत यज्ञात विनियोग नसल्यामुळे, किंवा सामान्य लोकांशी संबंधित असल्यामुळे असावे. इतर नावे – अथर्वान्गीरस, ब्रह्मवेद, क्षात्रवेद
दोन प्रकारचे मंत्र – घोर – रोग, हिंस्र पशू, शत्रू इत्यादींना विरोध. व अघोर – कुटुंबात, गावात शांती, शत्रूशी सख्य, स्वास्थ्य, दीर्घायुष्य इत्यादी मिळवण्यासाठी.
वेदांग
वेदांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी, व वेदांचा अर्थ नीट कळण्यासाठी, वेदांगांचा अभ्यास आवश्यक आहे. वेदांबरोबर ६ वेदांगांचे अध्ययन होत असे.
- शिक्षा – उच्चारण शास्त्र. (Phonetics and Phonology). शिक्षा ग्रंथ वेदशाखेशी जोडलेले नसून, सामान्य वर्णोच्चार शास्त्र यामध्ये येते. पाणिनीय शिक्षा, स्वरव्यंजन शिक्षा, भारद्वाज शिक्षा, नारदीय शिक्षा, याज्ञवाल्क्य शिक्षा आदि ६५ शिक्षा ग्रंथ उपलब्ध असून, त्या पैकी पाणिनीय शिक्षा सर्वात प्राचीन आहे. त्या पूर्वीचे शिक्षा ग्रंथ उपलब्ध नाहीत. शिक्षांच्या आधारावर, प्रत्येक शाखा निहाय प्रातिशाख्य ग्रंथ तयार झाले. वेदपाठच्या उच्चारणासंबधी नियम यामध्ये येतात. ऋक् प्रातिशाख्य, तैत्तरीय प्रातिशाख्य, वाजसनेय प्रातिशाख्य, अथर्व प्रातिशाख्य, शौनकीय प्रातिशाख्य आदि, त्या त्या वेदाचे उच्चारण नियम देतात.
- व्याकरण – भाषेचे नियम सांगणारे ग्रंथ. पाणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ ४००० सूत्रात संस्कृतचे व्याकरण सांगतो. या मध्ये आधीचे १२ ग्रंथाचे संदर्भ दिले आहेत.
- कल्प – वैदिक धर्माच्या कर्मकांडाचे उत्तम प्रकारे ज्ञान होण्यासाठी ही सूत्रे उपयुक्त आहेत. या मध्ये प्रत्येक वेदाशी निगडीत –
- गृह्यसूत्रे – घरगुती यज्ञ. संस्कारांसाठीचे होम. गृह्याग्नीवर करावयाचे छोटे यज्ञ.
- श्रौतसूत्रे – वैदिक यज्ञ, श्रौताग्नी वर करावयाचे यज्ञ.
- धर्मसूत्रे – समाजात वावरण्याचे नियम
- शुल्बसूत्रे – यज्ञकुंडांच्या बांधकामाबद्दलचे नियम. भूमितीचे fundamentals येतात.
- छंद – वेदांतील मंत्र ज्या छंदांमध्ये बद्ध केले आहेत, त्या छंदांबद्दलचे शास्त्र. वेदातील जास्तीत जास्त वापरलेलं गेलेले छंद आहेत – गायत्री, अनुष्टुप आणि त्रिष्टुप. पिंगलाचे छंदशास्त्र हा ग्रंथ छंदांची उकल करून सांगतो.
- निरुक्त – या ग्रंथामध्ये शब्दांचे मूळ (Etymology) व त्यावरून त्याचा अर्थ सांगितला आहे. यास्काचार्यांचा निरुक्त ग्रंथ.
- ज्योतिष – यज्ञ कोणत्या वेळेला करावेत हे कळण्यासाठी सूत्रे. काल, देश आणि दिशा ज्याला समजते, तोच वेद समजू शकतो. लगधाचे वेदांग ज्योतिष, अथर्वण ज्योतिष आदि ग्रंथ उपलब्ध आहेत.
संदर्भ –
- भारतीय धर्म व तत्त्वज्ञान – श्री. भा. वर्णेकर
- बालबोध संग्रह: – Study Text from Sri Kanchi Kamakoti Peetham
– दीपाली पाटवदकर