नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हटले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.”
या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.[१]
नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.
नृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :-
- नृसिंहाची प्राचीन सिंहरूपातील प्रतिमा आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातील कोंडामठ येथील एका शिल्पपटात आहे.
- पुणे जिल्ह्यातील रांजणी गावात ब्रह्मे नावाच्या ब्राह्मणाच्या घरी नृसिंह केवळ चतुष्पाद सिंहाच्याच रूपात आहे.
- परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी येथे उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेला नृसिंह आहे.
- वेरूळच्या १५ व १६व्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. तसेच शिल्प बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथील केदारेश्वराच्या देवळात आहे.
- पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमाजवळच्या भग्न देवळाच्या गाभाऱ्यात वीरासनातील नृसिंहाची द्विभुज मूर्ती आहे. डावीकडे लक्ष्मीचे स्वतंत्र देऊळ आहे.
- सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील कोळे नरसिंहपूरगावी कृष्णा नदीकाठच्या देवळात.
- शिवाय, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अंजी, नांदेड, पुसद, पैठण, पोरवर्णी, बेळकोणी, रत्नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर, रामटेक, शेळगाव आणि, सातारा जिल्ह्यातील धोम व पाल येथे नृसिंहाची शिल्पे आहेत.
– स्नेहल आपटे