हम्पीचा गणेश

 

ससिवेकलु गणेश

हेमकूट टेकडीच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे हा सुंदर असा महागणपती. हम्पीच्या इतर स्थापत्या प्रमाणेच हा गणपतीसुद्धा हम्पीच्या सौंदर्यात भरच घालतो आहे. आपल्याकडे एखादे दैवत, एखादे मंदिर आले की त्यासोबत अतिशय सुंदर अशी एखादी तरी दंतकथा येतेच येते. या गणपतीचीही एक अशीच कथा इथे सांगतात. एकदा भरपूर भोजन झाल्यामुळे गणपतीचे पोट एवढे फुगले की ते अगदी फुटायच्या अवस्थेला पोचले. अशा वेळी गणपतीने एक सर्प पकडला आणि आपल्या फुगणाऱ्या पोटाभोवती आवळून बांधला आणि त्याचे पोट वाढायचे थांबले. या नावाचीसुद्धा अशीच एक गंमत आहे. गणपतीचे पोट मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे झाले. स्थानिक भाषेत मोहरीला ससिवेकलु असे म्हणतात, त्यामुळे हा गणपती झाला ससिवेकलु गणेश!

एकसलग पाषाणातून कोरून काढलेली ही गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. बसलेल्या स्थितीत असलेल्या या देखण्या मूर्तीला चार हात असून खालच्या उजव्या हातात सुळा आहे, तर वरच्या उजव्या हातात अंकुश, वरच्या डाव्या हातात पाश आणि खालच्या डाव्या हातात प्रसादपात्र आहे. पोटावर नागबंध दिसतो. मूर्तीभोवती सुंदर असा उघडा सभामंडप बांधलेला आहे. इथे मिळालेल्या शिलालेखानुसार सन १५०६ मधे चंद्रगिरीच्या (सध्या आंध्र प्रदेशात) कोणा व्यापाऱ्याने राजा नरसिंह दुसरा याच्या स्मरणार्थ हा सभामंडप बांधला.

समृद्ध अशा विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे शहर हम्पी. आज जरी बरेचसे शहर उद्ध्वस्त झालेले असले तरीसुद्धा विरुपाक्ष, विठ्ठल, कृष्ण ही मंदिरे आणि सर्वत्र विखुरलेले अवशेष आजही या नगरीत पाहायला मिळतात. शशिवेकालु आणि कडवेकालु असे दोन गणपती हम्पीमध्ये जवळजवळ स्थापित केलेले दिसतात. पकी शशिवेकालु गणपती हेमकूट पर्वताच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे. एकाच दगडातून कोरून काढलेली जवळजवळ आठ फूट उंचीची ही गणेश मूर्ती पाहण्याजोगी आहे.

कडवेकालु गणेश

शशिवेकालु गणेश मंदिराच्या जवळच उत्तर दिशेला कडवेकालु गणेश मंदिर आहे. बहुधा दक्षिण भारतातील ही सर्वात भव्य अशी गणपतीची मूर्ती असावी. ही मूर्ती १५ फूट उंच आहे. या मूर्तीच्या नावाची पण अशीच गंमत आहे. गणपतीची ही मूर्ती एकाच मोठय़ा दगडातून कोरून काढलेली आहे. या गणपतीचे पोट अशा रीतीने घडवलेय की ते हरभऱ्याच्या डाळीच्या दाण्यासारखे दिसते. स्थानिक भाषेत हरभऱ्याच्या डाळीला कडवेकालु म्हणतात, आणि म्हणून हा गणपती झाला कडवेकालु गणेश !

या गणपतीचे मंदिर फारच देखणे आहे. गणपतीच्या मूर्तीच्या बाजूने गर्भगृह बांधून काढले आहे. त्यासमोरील सभामंडप अत्यंत देखणा आहे. सभामंडप आणि त्यावर असलेल्या खांबांवर विविध काल्पनिक प्राण्यांची चित्रे कोरलेली दिसतात. चौकोनी खांब आणि त्यावर असलेली वैशिष्टय़पूर्ण शिल्पकला ही अगदी विजयनगर कलेची खासियत म्हणायला हवी. विविध शिल्पांनी समृद्ध असा हा सभामंडप आणि हा गणपती हम्पी भेटीत न चुकता पाहावा असा आहे.

– स्नेहल आपटे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s