वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीया ही अक्षयतृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षयतृतीयेचा सर्वांत प्राचीन उल्लेख विष्णू धर्मसूत्रामध्ये आलेला दिसतो. या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, होम, स्नान (विशेषतः समुद्रस्थान) आदी कृत्यांचे फल अक्षय म्हणजे कधीही न संपणारे किंवा कधीही नाश न पावणारे असते. यामुळेच या तिथीला अक्षयतृतीया म्हणतात. मत्स्यपुराण (६.५.१.७) वैशाख महिन्यातील ही महत्त्वाची तिथी म्हणून गणली जाते.
वैशाख मासाचे प्राचीन नाव माधव असे आहे. चैत्र व वैशाख हे दोन वसंत ऋतूचे महिने मानले जातात. तथापि, वैशाखात उन्हाळा बराच असतो. त्यामुळे या मासातील व्रत-वैकल्ये उन्हाळ्याला योग्य अशीच सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, या दिवशी (वसंत) माधव या देवतेला उद्देशून ब्राह्मणाला उदकाने (पाण्याने) पूर्ण असा कुंभ दान द्यावा असे सांगितलेले आहे. हे उद कुंभाचे दान स्वतःसाठी त्याचप्रमाणे पितरांची अक्षय तृप्ती व्हावी, यासाठीही देतात. या उद कुंभदानानंतरच लोकांनी पाणी थंड करून पिण्यास सुरुवात करावी, अगोदर पाणी प्याले, तर आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. याकरिता पितरांना थंड पाणी दिल्याशिवाय आपण थंड पाणी पिऊ नये, असा निर्बंध घालून ठेवलेला आहे.
अक्षयतृतीयेला महत्त्व येण्याचे कारण या तिथीचा साडेतीन शुभमुहूर्तांमध्ये समावेश केला गेला. या दिवसाची साडेतीन शुभमुहूर्तावर गणना होण्याचे कारण हा कृतयुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. शालिवाहन शकाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवसाची या दृष्टिकोनातूनच साडेतीन मुहूर्तांत गणना केली आहे. हे साडेतीन शुभमुहूर्त स्वयंसिद्ध असल्यामुळे कोणतेही शुभकर्म करण्यास पंचांगशुद्धी किंवा दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच वास्तुशांती, विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, नामकरण, उष्टावण, भूमिपूजन, नव्या उद्योगाचा आरंभ वगैरे गोष्टी साडेतीन मुहूर्तांचे निमित्त साधून घडू लागल्या. या साडेतीन मुहूर्तांमध्ये धर्मशास्त्रीयदृष्ट्या कोणत्या गोष्टी करण्यास मुभा आहे, हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे.
सामाजिक व कौटुंबिक विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने या दिवसाला फार महत्त्व आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला झोपाळ्यावर बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. याला ‘दोलोत्सव’ असे म्हणतात. अक्षयतृतीयेला चैत्रात बसविलेल्या या गौरीचे विसर्जन करायचे असते. कोकणात या दिवशी हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनींचे व कुमारिकांचे पाय धुऊन भिजलेल्या हरभऱ्यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांच्या हातावर चंदनाचा लेप करतात आणि त्यावरून शिरा असलेली शिंप फिरवितात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. देवीची पूजा झाल्यावर आरती करताना ‘गौरीचे माहेर’ नावाचे गाणे म्हणण्याची पद्धत आहे. या गौरीच्या स्तुतीबरोबरच माहेरची माणसे, माहेरचे वातावरण, परिस्थिती यांचेही वर्णन नितांत रमणीय आणि अस्सल आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते. आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षयतृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे. म्हणून या दिवशी मिष्टान्न करून सुवासिनीला भोजन घालण्यात येते. बायका एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जातात-येतात. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देण्याचा हा कुलाचार आहे. ब्राह्मणेतर समाजातही हा उत्सव साजरा केला जातो. त्या समाजात या दिवसाला ‘आखेती’ असेही म्हणतात.
– स्नेहल आपटे