राधिका आणि वेदिका दोघी जुळ्या बहिणी.सातवीत शिकणाऱ्या.आज शनिवारी मुलींची शाळा लौकर सुटते, म्हणून त्यांची आई क्लिनिक बंद करून घाईघाईने घरी आली होती.
मुलींच्या आवडीचा खाऊ तिने करायला घेतला होता!इतक्यात बेल वाजली.आईने दार उघडले. बघते तर काय,दोन्ही कन्यकांच्या डोळ्यांत पाणी!आई रडवेल्या मुलींना जवळ घेत प्रेमाने म्हणाली,’हातपाय धुवून या बरं. आपण खाऊ खातांना बोलूया.’
मुली आत पळाल्या. आईला कळेना काय झालं असेल.स्वयंपाक घरात टेबलाशी मुली येऊन बसल्या. खायला सुरुवात केली,पण अजूनही चेहरे खिन्न होते.कुकरच्या शिट्टीचा फुसफुस आवाज बंद होऊन शिट्टी व्हावी,तशी वेदिका एकदम म्हणाली,”आई,तुझं आयुर्वेद सायन्स आऊटडेटेड आहे का गं?” तिला जोडूनच राधिका म्हणाली,”हो ना,राहीची दीदी आता विदेशात जाणार आहे,तर म्हणाली कशाला मी ही आऊट डेटेड डिग्री घेतली असेल!काssही उपयोग नाही.”पुन्हा दोघींचे डोळे पाणावले.
पाण्याचे ग्लास त्यांच्याकडे सरकवत आई म्हणाली,”अगं मुलींनो,आयुर्वेद आऊट डेटेड नाहीये.आपण त्याच्या बाबतीत अप डेटेड नाही आहोत.आपण आज पासून सुरुवात करूया!आज संध्याकाळी मी तुम्हाला जगातल्या पहिल्या सर्जनची गोष्ट सांगते!”
मुलींनी आनंदून विचारलं, “नाव काय गं त्याचं?”
आई म्हणाली, “सुश्रुत.”
————————–
खूप वर्षांपूर्वी, इसवीसनाच्याही सहाशे वर्षे आधी, सुश्रुताचा जन्म झाला. आईचे नाव माधवी आणि वडिलांचे नाव विश्वामित्र! पण हे विश्वामित्र म्हणजे शकुंतलेच्या गोष्टीतले ऋषी नाही बरं. नाव तेवढं सारखं आहे. सुश्रुताची आई, माधवी. हिचे वडील दिवोदास हे काशी राज्याचे राजे होते. पण ते नुसतेच राजा नव्हते तर एक निपुण वैद्य, म्हणजे डॉक्टर होते. सुश्रुताचे बालपण गंगेच्या काठी आजोबांच्या घरीच गेले. विरोचक,औपधनेव आणि वैतरणी हे त्याचे मित्र.सगळे भरपूर खेळत असत.
एकदा विटीदांडू खेळतांना विटी एक खोबणीत अडकली. पायाखाली दगड घेऊन विरेचकाने ती दोन बोटांनी काढण्याचा प्रयत्न केला.दगड सरकला आणि अधांतरी विरेचकाची बोटे खोबणीत अडकली.क्षणभरात तो खाली पडला आणि बोटांना रक्ताची धार लागली. बघतो तो काय,तर्जनीचा तुकडा तुटून तो लोंबकळत होता!मुले धावत त्याच्याकडे आली.सुश्रुतही मित्राकडे धावत आला.
क्षणाचाही विलंब न लावता सुश्रुताने तो तुटून लोंबकळणारा तुकडा शांतपणे परत जागेवर ठेवला.आपले उत्तरीय फाडून त्याच्या पट्ट्या केल्या.जवळच्या झाडाची छोटी फांदी घेऊन,ती मधोमध विभागली. तिच्या बोटाएवढ्या तुकड्याने तर्जनीला आधार दिला व पट्टयांनी बोट गुंडाळून टाकले.आजोबा जखम झाली की नेहमी लावतात ती प्रतिबंधी वनस्पति शोधली, दगडावर ठेचून तिचा गोळा केला व त्यांतील रस जखमेमध्ये सोडला.
त्याचे मित्र त्याच्या या हालचालींकडे आणि आत्मविश्वासाकडे मुग्ध होऊन बघू लागले.तो सांगेल ती मदत करू लागले. मग धीर देऊन विरोचकला दिवोदासांकडे नेले.त्यांनी जखमेची पहाणी केली.ते म्हणाले,”कुणाकडे नेले होते याला?”मुले म्हणाली,”कुठेच नाही.तुमच्या सुश्रुतानेच पट्टी केली.”
काशीराज दिवोदासांनी लहानग्या नातवात लपलेला कुशल शल्य चिकित्सक ओळखला.
उपनयन संस्कारानंतर वाराणसीतील एका पाठशाळेत सुश्रुत जाऊ लागला.वेद, उपनिषद, शास्त्र यांसोबतच क्षत्रियोचित शस्त्रास्त्र शिक्षणही त्याने मिळवले.
मोकळ्या वेळात सुश्रुत तलवार, भाले, चिलखत तयार करण्याच्या कार्यशाळेत रमत असे.लहान खेळण्यांसारखी शस्त्रे तयार करीत असे. कारागीरांना नवल वाटे. पुढे याच सुश्रुताने शल्यकर्माची १२१ उपयुक्त साधने घडवली. आपल्या आजोबांप्रमाणेच मानवी शरीराच्या आतील संस्थांविषयी त्याला कुतूहल होते.
गंगेच्या काठावर जी गावे असतात, तेथील परंपरेनुसार मृत माणसाला प्रवाहात सोडले जाते. वहात वहात ती प्रेते काठावरील झाडांच्या मुळ्यांत अडकून रहात.कधी प्रवाहाने त्वचा निघून जाई. तर कधी प्रेत फुगून बसे.
सुश्रुत आणि त्याच्या मित्रांनी एका एकांत किनाऱ्यावर एक कुटी बांधली होती.त्यात ते अशा प्रेतांना अभ्यासण्यासाठी ठेवत असत. यातूनच पुढे सुश्रुताने शवविच्छेदनाची प्रक्रिया शोधून काढली. शरीरस्थान लिहिले. मानवी शरीरात धमन्या किती, शिरा किती, अस्थि किती, जॉईट्स किती, vital points आणि स्नायु किती असे सगळे लिहून ठेवले!
आता सुश्रुत मोठा झाला. आजोबांसोबत रुग्ण सेवा करू लागला.
त्याकाळी खूप लढाया होत असत. त्यात जीव वाचलेले पण शरीराची हानी झालेले खूप सैनिक असत.असेच एका लढाईत नाक कापले गेलेला एक सैनिक सुश्रुताकडे आला. जखम भरली होती पण चेहरा विद्रुप झाला होता. या नाकाचे काही करता येईल का??
सैनिकाच्या नाकाची आणि एकूण आरोग्याची नीट तपासणी करून त्याला दुसऱ्या दिवशी यावयास सांगितले. मग आजोबांशी चर्चा करून पुढे काय करायचे ते सुश्रुतांनी ठरवले.
दुसऱ्या दिवशी सैनिक आल्यावर त्याला स्वतंत्र कुटीत नेण्यात आले. त्याला वेदनाशामक काढा पिण्यासाठी दिला, आणि त्याच्या नाकाची जखम खरवडून ताजी केली.सुश्रुतांसोबत आणखी दोन परिचारक होते.त्यांनी अग्निकर्म केलेले शल्य शस्त्र दिले.सैनिकाच्या गालाचा छेद घेऊन, एक तुकडा कापण्यात आला.तो नाकाच्या जागी बसवला. त्या सैनिकाच्या नाकपुडीत कमळाचा देठ घालून श्वसनाची सुविधा करून दिली. गालाच्या जखमेत औषधी द्रव्ये घालून पट्टी करण्यात आली. नाकालाही नीट झाकून घेतले.
आणि काय आश्चर्य!! काही काळातच त्याचे नाक आणि गाल पूर्ववत झाले. या शल्यचिकित्सेमुळे सुश्रुतांचे नाव ज्याचे त्याचे तोंडी झाले. दुरदुरुन त्यांचेकडे अशा प्रकारचे रुग्ण येऊ लागले. त्याच बरोबर काही वैद्य, जे आपल्या स्थानी चिकित्सा करत, शंका विचारू लागले, सल्ला घेऊ लागले!
आपल्या नातवाचे ज्ञान व नावलौकिक पाहून दिवोदास यांनी आजूबाजूच्या सर्व राज्यांतील नामांकित वैद्यांना निमंत्रणे धाडली.आणि मग वाराणसी मध्ये शल्यचिकित्सेची पहिली विद्वत् परिषद भरली.या परिषदेसमोर सुश्रुतांनी आपण केलेले संशोधन मांडले. जाणत्या वैद्यांचे अनुभव कथन झाले.ज्ञानाचे आदान प्रदान झाले.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शल्यकर्मासाठी उपयुक्त अशा १२१साधनांचे प्रदर्शन व माहिती मांडली होती. शरीराच्या प्रत्येक भागाचा छेद घेता येईल अशा तऱ्हेने यांची रचना होती. पोलाद धातूचा वापर केला गेला होता. जगातील पहिला रक्त रोधक चिमटा (Haemostat) हा देखील त्यात होता.
अनेक वेळा शस्त्रक्रिया करताना रोग्याचा मृत्यू होत असे. त्यासाठी जन्तु संसर्ग टाळण्याचे उपाय, संक्रमण प्रतिबंधी औषधी आणि उपकरणांची शुद्धी या विषयी सुश्रुतांनी सर्वांना माहिती दिली.
एकाच वेळी ते आता संशोधक, अध्यापक आणि वैद्य अशी तिहेरी भूमिका पार पाडू लागले..
सुश्रुतांची कीर्ती आता सर्वत्र पसरली. त्यांच्या पद्धतीची शल्यकर्माची साधने प्रमाणित मानली जाऊ लागली. या विषयातील त्यांचे ज्ञान व अनुभव वाढू लागला.शिष्य तयार होऊ लागले.त्यांतील काही शिष्यांनी हे ज्ञान संकलित करण्याची विनंती केली. त्या प्रमाणे सुश्रुतांनी ग्रंथरचना केली.या ग्रंथाचे नाव ‘सुश्रुत संहिता’ होय.
हा शल्यकर्म प्रधान ग्रंथ आहे.यात एकूण १८६ अध्याय आहेत.या संहिते मध्ये आरोग्य विषयक सर्वच बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाचे बधिरीकरण करण्याची पद्धत पण यात आहे.
शस्त्रकर्म करण्याच्या साधनांचा परिचय,त्यांचे कार्य,त्यांना संक्रमण प्रतिबंधी करण्याच्या पद्धती इ सर्व या ग्रंथात तपशीलवार दिले आहे.
चिकित्सालय म्हणजे दवाखाना,कुठे असावा,कसा असावा,तो रोज औषधी द्रव्यांच्या धुरीने निर्जंतुक कसा करावा हे अशी सर्व माहिती ,सुश्रुत या संहितेत सांगतात.
प्रत्यक्ष शल्य चिकित्सा करण्यापूर्वी, वैद्याने शिक्षण घेताना मानवी शरीराचे अवयव व आंतर रचना याचा अभ्यास करणे गरजेचे असते. त्या साठी सुश्रुतांनी प्राकृतिक मृत्यू आलेले शव ,कुशांच्या(गवत)ताटीवर वेलींनी बांधून वाहत्या पाण्यात काही काळ ठेऊन ,विच्छेदन योग्य कसे करावे,अवयव रसायन द्रव्यात ठेऊन कसे टिकवावे याचीही माहिती दिली आहे.
रुग्णाला कृत्रिम रक्तपुरवठा करणे, गर्भावस्थेतील मातेवर शस्त्रक्रिया करणे, त्वचा रोपण,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विषबाधा झाली असता होणाऱ्या व्याधींसाठीची शस्त्रक्रिया, जळवांचा वापर, शस्त्रक्रियेनंतरच्या समस्या व त्यावरील उपाय असे सर्व काही एकाच ग्रंथात पहावयास मिळते.
——
असे होते जगातले पहिले सर्जन सुश्रुत! आईने गोष्ट संपवली. मुली खूप कुतूहलाने, आनंदाने सगळं ऐकत होत्या.एव्हाना त्या खोलीत बाबा आणि आजी पण येऊन बसले होते. आजी संस्कृत विषयाची शिक्षिका! ती म्हणाली ,”मुलींनो, आयुर्वेदात म्हटलंय
प्रसन्नात्मेद्रियमना:स्वस्थ इत्याभिधीयते।
मन आणि शरीर दोन्ही हेल्दी हवं! चला मी बदाम दूध केलंय ते प्या आता.”
आजीच्या आदेशानुसार मुली तिच्यामागे स्वयंपाक घरात गेल्या.आईबाबांच्या डोळ्यांत आपण विचारपूर्वक निवडलेल्या, आयुर्वेदाच्या संपन्न वारश्याची ओळख मुलींना करून देणे सुरू केल्याचा, आनंद दिसत होता!!
रमा दत्तात्रय गर्गे.